नागपूरच्या या 'लेडी डॉन'ने केली अनेक पोलिस अधिकाऱ्यांची "शिकार"

अनिल कांबळे
बुधवार, 10 जून 2020

प्रीती दासच्या तरूण मैत्रिणीसुद्धा तिच्या कारमध्ये सामाजिक सेवेसाठी हजर राहत असल्याची चर्चा असल्यामुळे अनेक पोलिस अधिकाऱ्यांनी "तेरी भी चूप-मेरी भी चूप' अशी भूमिका घेतली आहे. तर एक राजकीय पदाधिकारी खुल्या मनाने समोर आला आहे.

नागपूर : अनेकांसोबत ठेवलेले मैत्रीपूर्ण संबंध आणि काळेधंदेरूपी पाप लपविण्यासाठी प्रीती दास पोलिसांच्या धाकाने शहरभर पळत आहे. तिला कुणीही आसरा देण्यासाठी तयार नाही. शेवटी तिने एका मोठ्या राजकीय पदाधिकाऱ्याला तडतोड करण्याची अट ठेवून पाठीशी घालण्यासाठी तयार केले आहे. त्यामुळे आता तो राजकीय पदाधिकारी प्रीती दासच्या काळ्या धंद्याला पाठिंबा देत असल्याची चर्चा आहे.
 
विश्‍वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उपराजधानीतील नवीन लेडी डॉन या नावाने ओळखली जाणाऱ्या प्रीती दासने आतापर्यंत अनेक वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी जवळीक साधली. त्यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करून त्यांची "खास' बनली. त्यानंतर तिने आपले "खरे रूप' दाखविण्यास सुरुवात केली. शहरातील जवळपास सर्वच पोलिस स्टेशन, महिला समूपदेशन केंद्र आणि भरोसा सेलमध्ये प्रीती दासची दादागिरी वाढली.

कोण आहे प्रीती दास?

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची "खास' असल्यामुळे तिने पोलिस कर्मचाऱ्यांना हातचे खेळणे बनविले. त्यानंतर कोणतेही प्रकरण हाताशी धरून लाखोंमध्ये "सेटलमेंट' करण्यात हातखंडा निर्माण केला. प्रॉपर्टी मॅटर, बलात्कार, विनयभंग आणि घरगुती हिंसाचार प्रकरणात प्रीती पोलिसांच्या नावावर स्वतः पैसे घेत होती. प्रीती दास पोलिस ठाण्यात दिसल्यास कुठेतरी "काळेबेरे' असल्याची चर्चा पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये होत असे. प्रीती दासच्या तरूण मैत्रिणीसुद्धा तिच्या कारमध्ये सामाजिक सेवेसाठी हजर राहत असल्याची चर्चा असल्यामुळे अनेक पोलिस अधिकाऱ्यांनी "तेरी भी चूप-मेरी भी चूप' अशी भूमिका घेतली आहे. तर एक राजकीय पदाधिकारी खुल्या मनाने समोर आला असून त्याने प्रीती दासला पोलिस प्रकरणातून वाचविण्याची जबाबदारी घेतल्याची चर्चा आहे.

कुठे लपली आहे प्रीती
लग्नाचे आमिष दाखवून एका युवकाला तब्बल 14 लाखांनी गंडविणाऱ्या प्रीतीविरूद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर ती फरार झाली आहे. मात्र, ती शहरातील एका राजकीय पदाधिकाऱ्याच्या घरात असल्याची चर्चा शहरभर आहे. मात्र, नागपूर पोलिस तिला अटक करण्यात मागेपुढे पाहत आहेत. तिला अटक केल्यास अनेक पोलिस अधिकाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्‍यात येण्याची चर्चा आहे. पोलिस आयुक्‍त डॉ. उपाध्याय यांच्याकडे तक्रार आल्यानंतर त्यांनी गांभीर्याने घेतल्यामुळेच प्रीती दासचा भंडाफोड झाला आहे.

संबंधित बातमी : वय वर्षे वीस, घरी बागायती शेती तरी केल्या तब्बल ३० चोऱ्या... वाचा ही अजब कहाणी

पोलिस अधिकाऱ्याला लुटले
प्रीतीने एका पोलिस अधिकाऱ्याला जेवण करण्यासाठी घरी बोलावले होते. तो अधिकारीही तिच्या बंगल्यावर गेला. मात्र, काही दिवसांतच त्या अधिकाऱ्याच्या पत्नीला प्रीतीशी मैत्री असल्याची माहिती मिळाली. तिने नागपुरात येऊन प्रीतीची ऐशीतैशी केली होती. मैत्री तोडण्यासाठी त्या पोलिस अधिकाऱ्याला तीन लाख रूपये आणि एका प्लॉटचा सौदा करावा लागला होता, अशी पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये चर्चा आहे.

स्वयंभू कार्यकर्त्यांमध्ये खळबळ
प्रीती दाससारख्या अनेक महिला स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्त्या आहेत. काही जणी सेक्‍स रॅकेटवर छापा घालण्यासाठी पोलिसांच्या नेहमी सोबत असतात. त्यातून त्या मलाई खात असतात. एकीने तर मोठ्या राजकीय पदाधिकाऱ्याला हाताशी धरून थेट घरमालकालाच विनयभंगाच्या गुन्ह्यात अडकवून घर हडपले आहे. तर पोलिस ठाण्यातील भूखंड विक्री प्रकरणात पीआयकडे लाखोंची रक्‍कमही पोहचवली आहे. तर काही सामाजिक कार्यकर्त्या भरोसा सेलमध्ये कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारी आल्यानंतर त्यामधून लुटमार करण्यासाठी सज्ज असतात. तर एक महिला सेक्‍स रॅकेट, लॉज, आणि हॉटेलमधून पोलिसांच्या नावावर वसुली करीत आहे. तर काही आमदार-खासदार आणि पोलिस अधिकाऱ्यांसोबत फोटो काढून पोलिसांवर इम्प्रेशन मारत आहेत.

हेही वाचा : रेल्वेस्थानकांवर उभी असलेली ही शेकडो वाहने कोणाची?

पुन्हा करू शकते ब्लॅकमेलिंग
पोलिसांनी अटक केल्यानंतर ती बड्या नेत्यांचे, त्यांच्या कार्यकर्त्यांचे तसेच पोलिस अधिकाऱ्यांचे नाव कोणत्याही प्रकरणात घेऊ शकते. त्यामुळे तिला अटक केल्यास राजकीय नेते, पुढारी आणि पोलिसही अडचणीत सापडतील, अशी धाकधूक आहे. प्रीती दास गुन्ह्यात कुणाचे नाव न घेण्यासाठी अनेकांकडून लाखो रूपये उकळू शकते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Preety Dass relations with many Nagpur cops