पुजारी, साहित्यविक्री करणारे हताशपणे म्हणतात, विठ्ठलाऽऽऽ ! कोणता ‘धंदा’ करू पोटासाठी?

सतिश तुळस्कर
Friday, 23 October 2020

गेल्या ६-७ महिन्यांपासून कोरोनाच्या उपद्रवामुळे ठाकरे सरकारने राज्यातील लहानमोठी सर्वच मंदिरे बंद करण्याचे आदेश दिले, तसेच त्याठिकाणी होणारे नित्य हरिपाठ, पूजा, आरती, भजन, कीर्तन आदी धार्मिक विधी करण्यास बंदी घातली. आज सहा महिने लोटूनही देवळे खुली झाली नसल्याने भाविक व त्यावर पूजा साहित्य विक्री करणाऱ्या दुकानदारांच्या ‘पोटोबा’ विषय जटिल होत चालला आहे.

उमरेड (जि.नागपूर): मंदिरे बंद असल्याने  केवळ हिंदूंना त्रास होत नसून मुस्लिम समाजातील विक्रेते सुद्धा आर्थिक अडचणीला तोंड देत असल्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे स्थानिक इतवारी बाजारपेठेत मुख्य रस्त्यावर हात गाडीवर पूजा साहित्याचे दुकान थाटून त्यामध्ये हळद-कुंकू, अष्टगंध, गुलाल, बुक्का, नारळ, लाल ओढण्या, हिरवा चुडा-लाल चुडा आदी साहित्य घेऊन बसलेला एक मुस्लीम पूजासाहित्य विक्रेता म्हणजे फारुक शेख. त्या व्यक्तीच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह हा पुजासाहित्य विक्रीवर अवलंबून असल्याने सध्या मंदिरे कुलूपबंद आहेत. त्यामुळे त्याचा व्यवसाय डबघाईस आलाय आणि व्यवसायात उसनवारी घेऊन गुंतविले असलेले भांडवल देखील वसूल होत नसल्याने त्याला नैराश्य आल्याचे ‘सकाळ’ प्रतिनिधीजवळ व्यक्त केले.

हेही वाचाः तुझ्या दर्शनाला देवा, झालो मी अधीर ! भाविकांची आर्त हाक
 

‘देऊळबंद’मुळे जगण्याचा प्रश्न ऐरणीवर
हिंदू धर्माची श्रद्धास्थाने म्हणचे मंदिरे. ही केवळ श्रद्धा आणि आस्थेचा विषय नसून अनेकांच्या जगण्याची उमेद देणारा आहे. मनाने खचलेल्यांना आधार देणारा आधारस्तंभ म्हणून मंदिरे भूमिका पार पाडतात.. मात्र गेल्या ६-७ महिन्यांपासून कोरोनाच्या उपद्रवामुळे ठाकरे सरकारने राज्यातील लहानमोठी सर्वच मंदिरे बंद करण्याचे आदेश दिले, तसेच त्याठिकाणी होणारे नित्य हरिपाठ, पूजा, आरती, भजन, कीर्तन आदी धार्मिक विधी करण्यास बंदी घातली. आज सहा महिने लोटूनही देवळे खुली झाली नसल्याने भाविक व त्यावर पूजा साहित्य विक्री करणाऱ्या दुकानदारांच्या ‘पोटोबा’ विषय जटिल होत चालला आहे. हल्लीच्या काळात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव कमी झाला असून सर्वत्र अनलॉक प्रक्रिया राबविण्यात आली. त्या अनुषंगाने हळूहळू सर्वच गोष्टी पूर्ववत करण्यात आल्या. इतकेच नव्हे तर दारूच्या दुकानांना उघडे करण्याची परवानगीसुद्धा देण्यात आली. कारण काय तर मोठ्या प्रमाणात महसूल प्राप्ती.मात्र दुसरीकडे हिंदू धर्माची श्रद्धास्थान असलेली मंदिरे अद्याप ‘कुलूपबंद’ आहेत, आणि सध्या देशात नवरात्रीचा सण सुरू आहे. त्यानंतर लगेच विजयादशमी आणि दिवाळी होऊ घातली आहे. तरीसुद्धा देऊळ बंदच. दरवर्षी  नवरात्रीमध्ये देवीच्या मंदिराजवळ फुलहार विक्रेते, चहा विक्रेते, फळविक्रेते, खेळणी विक्रेते, मिठाई विक्रेते यासारखी अनेक लोकं दुकाने थाटून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळवत असतात. परंतु मंदिरे कुलूपबंद असल्यामुळे सर्वांना आर्थिक फटका बसलेला दिसून येतो.

अधिक वाचाः भर रस्त्यावर आणला बाजार, लोकहो! आता बोला काय करायचे?

खायचे पडतात वांदे
दरवर्षी सणासुदीच्या काळात फुले तसेच हारांची मोठ्या प्रमाणात मागणी असते. त्यासाठी भावही चांगला असतो. परंतु यंदा गेल्या सात महिन्यांपासून मंदिरे बंद आहेत. त्यामुळे आमचा फुल आणि हारांचा व्यवसाय मंदावला. म्हणून सरकारने तातडीने मंदिरे उघडी करून आमच्या व्यवसायाला चालना देण्याचे काम करावे,अशी अपेक्षा पुष्पमाला विक्रेता खुशाल वाघमारे यांनी व्यक्त केली. काही महिन्यांपूर्वी अगरबत्तीचा छोटेखानी व्यवसाय सुरू केला. परंतु लॉकडाउनच्या काळात मंदिरे बंद पडली आणि अगरबत्ती व्यवसाय ठप्प पडला. सणासुदीच्या काळात सुगंधित अगरबत्तीला प्रचंड मागणी असते. परंतु यंदा सर्व सण घरातच करावे लागल्याने व्यवसाय डबघाईस आल्याचे अगरबत्ती निर्माता निखिल चौधरी यांनी सांगितले.

पोटाची खळगी कशी भरावी?
गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही इतवारी बाजारपेठेच्या मुख्य रस्त्यावर हातगाडीवर पूजासाहित्य विक्रीचा व्यवसाय चालवीत आहोत. त्यातून मिळणारा नफा त्यावर आमचं घर, कुटुंब चालते. परंतु गेल्या सात महिन्यांपासून मंदिरे बंद असल्यामुळे उसनवारी घेऊन खरेदी केलेला माल विकणे, हे अशक्य झाले आहे. म्हणून आज अंगावर कर्ज झालेले असून पोटाची खळगी कशी भरावी, हा प्रश्न उभा आहे..
फारुख शेख
पुजासाहित्य विक्रेता

उपासमारीची वेळ आली
माझा व माझ्या आईचा उदरनिर्वाह करणे अवघड झाले आहे. कारण वडील हयात नसल्यामुळे पूजाविधी करूनच आम्ही पोटाची खळगी भरतो. लोक त्यासाठी आम्हाला थोडेफार पैसे देतात. परंतु मंदिरे बंद असल्यामुळे आम्हाला कोणीही पैसे देत नाही आणि आज उपासमारीची वेळ आली आहे. मंदिरे उघडी करून परवानगी द्यावी.
राहुल मुंजे
 मंदिरातील पुजारी

संपादनः विजयकुमार राऊत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Priests, sellers of literature say desperately, Vitthala! What do you do for a living?