...अन पंजाबच्या खेळाडूंना नागपुरातून केस कापून पाठविले ! वाचा काय घडले

file photo
file photo


नागपूर : तारीख 31 ऑक्टोबर 1984. पंजाबचा ज्युनिअर संघ नागपुरातील राष्ट्रीय सायकलपोलो स्पर्धा आटोपून पतियाळाकडे रेल्वेने रवाना होण्याच्या तयारीत होता. त्याचवेळी राजधानी दिल्लीतून तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येची दुःखद बातमी राजधानी दिल्लीतून नागपुरात येऊन धडकली. इंदिराजींच्या हत्येमागे शीख व्यक्तींचा हात असल्याची वार्ता पसरल्यानंतर शीख समुदायांविरूद्ध प्रचंड रोष निर्माण झाला. पाहता पाहता दिल्लीसह संपूर्ण उत्तर भारतात दंगली भडकल्या. मिळेल तिथे शीख व्यक्तींची हत्या सुरू झाली. जीवाच्या भीतीमुळे पंजाबचे खेळाडूही घाबरले. घरी जाणे धोकादायक असल्याने त्यांनी प्रवास टाळून नागपुरातच थांबण्याचा निर्णय घेतला. पगडी धारण केलेल्यांना टार्गेट केले जाऊ लागल्याने सर्व खेळाडूंचे केस कापण्यात आले. आणि वातावरण शांत झाल्यानंतर दोन दिवसांनी खेळाडूंना पंजाबला रवाना करण्यात आले. 


36 वर्षांपूर्वीची ही थरारक घटना पंजाबच्या युवा खेळाडूंसाठी एक वाईट स्वप्न होते. विदर्भ सायकलपोलो असोसिएशनच्या यजमानपदाखाली 28 ते 30 ऑक्टोबरदरम्यान रेशीमबाग मैदानावर मुलांची चौथी राष्ट्रीय ज्युनिअर सायकलपोलो स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेत पंजाबसह देशभरातील एकूण सोळा संघ सहभागी झाले होते. स्पर्धा आटोपल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी पंजाबचे खेळाडू रेल्वेने आपापल्या घरी जाणार होते. त्यांचे रिझर्व्हेशनही झाले होते. खेळाडू रेल्वेस्थानकाकडे जाणार तोच इंदिरा गांधी यांची हत्या झाल्याची बातमी आली. हत्येनंतर दंगल भडकल्याचे व शिखांची कत्तल सुरू असल्याचे समजल्यावर पंजाबचे खेळाडूही प्रचंड घाबरले. या तणावाच्या वातावरणात प्रवास करणे धोकादायक असल्याने आयोजकांनी संघाला डॉ. हेडगेवार भवनात थांबवून ठेवले. 


या तणावपूर्ण परिस्थितीत काय करायचे, हे कुणालाच कळत नव्हते. शीख खेळाडू पगडी घालत असल्याने प्रवासात त्यांच्या जीवाला धोका होता. तिकडे खेळाडूंच्या पालकांचाही जीव भांड्यात पडला होता. त्यांचे खेळाडूंना सारखे फोन येत होते. शेवटी खेळाडू व त्यांच्या पालकांच्या परवानगीने खेळाडूंचे केस कापण्याचा निर्णय घेण्यात आला. न्हाव्याकडून सर्व खेळाडूंचे नागपुरात केस कापण्यात आले. संघ प्रशिक्षक व व्यवस्थापकांनाही केस व दाढी कापण्यास सांगण्यात आले. अखेर परिस्थिती निवळल्यानंतर दोन दिवसांनी सर्वांना पगडी न घालता विमानाने पंजाबला पाठविण्यात आल्याचे, भारतीय सायकलपोलो महासंघाचे सचिव गजानन बुरडे यांनी सांगितले. नागपुरातून रवाना होताना खेळाडूंच्या चेहऱ्यांवर चिंतेचे भाव होते. पण त्याचवेळी संकटाच्या क्षणी दाखविलेल्या माणुसकीबद्दल त्यांनी नागपूरकरांना धन्यवादही दिले. पंजाबचे खेळाडू आपापल्या घरी सुखरूप पोहोचल्यानंतरच आयोजकांनी सुटकेचा निःश्वास टाकला.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com