"तुकाराम मुंढे आणि माझी तुलना योग्य नाही!"; नागपूरचे नवे आयुक्त राधाकृष्णन बी यांचे मत

राजेश प्रायकर
Saturday, 3 October 2020

महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांना कार्यभार स्वीकारल्यानंतर नुकताच एक महिन्याचा काळ संपला. एका महिन्यात त्यांनी शहरात कोव्हिड रुग्णांसाठी बेड्स वाढविले. प्रत्येक झोनमध्ये ॲम्बुलन्स उपलब्ध करून दिल्या. विविध ठिकाणी चाचणी करण्याची सुविधाही उपलब्ध करून दिली. एकीकडे कोव्हिडशी लढत असतानाच त्यांना महापालिकेच्या आर्थिक स्थितीच्या आव्हानांचाही सामना करावा लागत आहे. या अनुषंगाने कोव्हिड संदर्भात उपाययोजना, पालिकेची आर्थिक स्थिती सुदृढ करण्यासोबतच त्यांनी पदाधिकाऱ्यांशी समन्वयाबाबतही ‘सकाळ'सोबत खास संवाद साधला.

नागपूर : महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांना कार्यभार स्वीकारल्यानंतर नुकताच एक महिन्याचा काळ संपला. एका महिन्यात त्यांनी शहरात कोव्हिड रुग्णांसाठी बेड्स वाढविले. प्रत्येक झोनमध्ये ॲम्बुलन्स उपलब्ध करून दिल्या. विविध ठिकाणी चाचणी करण्याची सुविधाही उपलब्ध करून दिली. एकीकडे कोव्हिडशी लढत असतानाच त्यांना महापालिकेच्या आर्थिक स्थितीच्या आव्हानांचाही सामना करावा लागत आहे. या अनुषंगाने कोव्हिड संदर्भात उपाययोजना, पालिकेची आर्थिक स्थिती सुदृढ करण्यासोबतच त्यांनी पदाधिकाऱ्यांशी समन्वयाबाबतही ‘सकाळ'सोबत खास संवाद साधला.

प्रश्न : कडक लॉकडाऊन करता येत नाही, जनता कर्फ्यू नागरिकांनीच धुडकावून लावला. अशा स्थितीत कोव्हिडचे संक्रमण रोखण्यासाठी काही कडक पावले उचलण्याबाबत विचार सुरू आहे काय?

आयुक्त : संक्रमण रोखण्याची समाजातील प्रत्येक घटकाने जबाबदारीने वागण्याची गरज आहे. मास्क वापरणे, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन, हॅन्ड सॅनिटायझरचा वापर, स्वच्छता प्रत्येकाने पाळणे गरजेचे आहे. मास्क वापरत नाहीत त्यांच्यावर दंडाची कारवाई केली जात आहे. नियम न पाळणाऱ्या दुकानदारांची दुकाने सील केली जात आहेत. आता हॉटेल, बार सुरू होणार आहेत. ‘नो मास्क, नो एन्ट्री` हा नियम दुकानदार, हॉटेल, बार मालकांनी पाळणे आवश्यक आहे. अन्यथा दुकान, हॉटेल, बार सील केले जाईल.

प्रश्न : कोव्हिडसंदर्भात माजी आयुक्त तुकाराम मुंढे व तुम्ही गेल्या महिनाभरात केलेल्या उपाययोजनांच्या तुलनेचे दडपण वाटते काय?

आयुक्त : प्रत्येक अधिकारी नियमाच्या चौकटीत राहूनच काम करतो. मात्र, प्रत्येकाच्या कामाची पद्धत वेगळी असते. शहराच्या विकासासाठी, कोव्हिड हाताळण्यासाठी नियम, मार्गदर्शक तत्त्वांनुसार मी काम करीत आहे. कुठल्याही दोन अधिकाऱ्यांची तुलना करणे योग्य नाही. सर्वच अधिकारी आपापल्या परीने शहर विकास, आरोग्य सुविधांवर भर देत असतात.

प्रश्न : सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात चाचण्यांत घट होण्यासाठी काय कारण होते?

आयुक्त : चाचण्यांचे प्रमाण कमी झाले नाही. जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाकडून जी आकडेवारी देण्यात येते ती पाच वाजेपर्यंतची असते. महापालिका रात्रीपर्यंत अद्ययावत माहिती घेऊन आकडेवारी जाहीर करते. तीच दिवसभरातील योग्य माहिती असते. परंतु, पाच वाजेपर्यंतच्या आकडेवारीची माहिती प्रकाशित केले जात असल्याने चाचण्यांचे प्रमाण कमी दिसते.

प्रश्न : जनता कर्फ्यूबाबत प्रशासन व सत्ताधाऱ्यांत मतभिन्नता आहे काय?

आयुक्त : केंद्र व राज्य सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार महापालिका काम करीत आहे. जनता कर्फ्यू हा केवळ शब्द आहे. यातूनही लॉकडाउनचीच अपेक्षा केली जाते. आपल्याकडे मोठ्या प्रमाणात रोजंदारीने काम करून उपजीविका करणारे गरीब आहेत. त्यांचा विचारही करावा लागतो. पदाधिकाऱ्यांसोबत कुठलीही मतभिन्नता नाही.

कोरोनाबाबत ‘विकिपिडिया`मध्ये ‘बीग बी`वर ताशेरे!

प्रश्न : महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट आहे. ती बळकट करण्यासाठी काही योजना?

आयुक्त : कोव्हिडचा फटका पालिकेच्या वसुलीलाही बसला आहे. उत्पन्न वाढीसाठी पालिकेचे जे स्रोत आहेत त्याचा वापर करता येईल. त्यापेक्षा वेगळ्या काही योजना, उत्पन्नाचे स्रोत सुदृढ करण्यावर भर देण्यात येत आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Radhakrishnan said, comparison between Mundhe and me is not correct!