कोरोनाच्या बंदोबस्तासाठी रेल्वेस्थानकावर अत्याधुनिक यंत्रणा... वाचा कोणती?

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 जून 2020

रेल्वेच्या तिकीट काऊंटरवर काचा असल्यातरी बोलणे आणि तिकीट देण्यासाठी विशिष्ट ठिकाणी काचा कापलेल्या असतात. या केंद्रांवर सतत गर्दी असल्याने अनेकदा तिकीट देणाऱ्या बुकिंग क्‍लर्कचे बोलणे बाहेरच्या प्रवाशाला ऐकूही येत नाही. त्यामुळे जवळ येऊन मोठ्याने बोलावे लागते. बोलताना थुंकी उडून विषाणुचा संसर्ग होण्याची दाट शक्‍यता असते. कोरोना काळात हे संभाषण फारच धोकादायक ठरणारे आहे. जोखीम दूर करण्यासाठी "टु वे माईक सिस्टीम' परिणामकारस सिद्ध होत आहे.

नागपूर : एकमेकांपासून भौतिक अंतर राखणे हेच कोरोनाच्या लढ्यातील परिणामकारक शस्त्र आहे. पण, रेल्वेचे तिकीट घेताना प्रवासी आणि बुकिंग क्‍लर्कचा थेट संपर्क येत होता. यातून बुकिंग क्‍लर्कसह प्रवाशांनाही संसर्गाचा धोका होता. या अडचणीवर रेल्वेने दुतर्फा संभाषण प्रणालीचा तोडगा शोधून काढला आहे. नागपूर रेल्वेस्थानकावर प्रयोगिक तत्वावर ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. त्याद्वारे क्‍लर्क आणि प्रवाशांना थेट संपर्काशिवाय संभाषण साधणे शक्‍य झाले असून दोघांनाही सुरक्षेची हमी मिळू लागली आहे.

रेल्वेच्या तिकीट काऊंटरवर काचा असल्यातरी बोलणे आणि तिकीट देण्यासाठी विशिष्ट ठिकाणी काचा कापलेल्या असतात. या केंद्रांवर सतत गर्दी असल्याने अनेकदा तिकीट देणाऱ्या बुकिंग क्‍लर्कचे बोलणे बाहेरच्या प्रवाशाला ऐकूही येत नाही. त्यामुळे जवळ येऊन मोठ्याने बोलावे लागते. बोलताना थुंकी उडून विषाणुचा संसर्ग होण्याची दाट शक्‍यता असते. कोरोना काळात हे संभाषण फारच धोकादायक ठरणारे आहे. जोखीम दूर करण्यासाठी "टु वे माईक सिस्टीम' परिणामकारस सिद्ध होत आहे.

हेही वाचा : पालक विचारताहेत, ये इलू-इलू क्‍या है?

विभागातील नागपूर रेल्वेस्थानकावरील 7 आरक्षण खिडक्‍यांवर "टु वे माईक सिस्टीम' बसविण्यात आली आहे. ही प्रणाली अत्यंत सोपी असून त्यात बाहेर आणि आत माईक व स्पिकर लागले आहे. या यंत्रणेच्या मदतीने आतील बुकिंग क्‍लर्कचे बोलणे बाहेरच्या प्रवाशाला ऐकू येते. तसेच बाहेरील प्रवाशाचे बोलणे आतील बुकिंग क्‍लर्कला ऐकू येते. पूर्वी परिसरातील आवाज संवादातील मुख्य अडथडा होता. पण, नव्या प्रणालित ही अडचणही दूर करण्यात आली आहे.

खिडकी समोर असणाऱ्या प्रवाशाचा तेवढाच आवाज आतील क्‍लर्कला स्पष्टपणे ऐकू येतो. विना अडथळा दोन्ही बाजुचे बोलणे शक्‍य असल्याने काचाला असणारे कापही बंद करण्यात आले आहे. परिणामी क्‍लर्क आणि प्रवासी एकमेकांच्या संपर्कात येत नाही आणि संसर्गाचा धोका आपसूकच कमी होतो.

विभागातील सर्वच तिकीट केंद्रांवर लागणार यंत्रणा

नागपूर रेल्वेस्थानकावर ही प्रायोगिक तत्वावर ही यंत्रणा लावण्यात आली आहे. त्याचे फायदेही दिसून येऊ लागले आहेत. यामुळे पुढच्या टप्प्यात अजनीतील तिकीट आरक्षण केंद्रासह विभागातील अन्य तिकीट केंद्रांवरही ही यंत्रणा उभारण्याचा प्रशासनाचा मानस आहे. या यंत्रणेच्या मदतीने कोरोनासारख्या जीवघेण्यात विषाणूचा संसर्ग टाळणे शक्‍य होणार आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या हितार्थ लवकरच ही यंत्रणा सर्वच केंद्रावर उभारली जाणार असल्याचे मध्य रेल्वेचे सहायक वाणिज्य व्यवस्थापक एस. जी. राव यांनी सांगितले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: railway adopt innovative system to defend corona