आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत नागपूरच्या रौनकने मिळवून दिले अर्मेनिया ईगल्सला विजेतेपद 

नरेंद्र चोरे
Monday, 28 September 2020

मी गेल्या तीन वर्षांपासून प्रो-चेस लीगमध्ये खेळत आहे. मात्र उपांत्यफेरीपलिकडे मजल मारता आली नाही. एकवेळा तरी ही स्पर्धा जिंकावी, अशी माझी मनापासून इच्छा होती. यावेळी ते स्वप्न पूर्ण झाले. आजचा दिवस माझ्यासाठी खरोखरच 'स्पेशल' आहे.

नागपूर  : नागपूरचा युवा ग्रँडमास्टर रौनक साधवानीने ऑनलाइन प्रो-चेस लीग स्पर्धेतील चमकदार कामगिरी अंतिम फेरीतही कायम ठेवत आपल्या अर्मेनिया ईगल्स संघाला विजेतेपद मिळवून दिले.
विजेतेपदासाठी रविवारी उशीरा झालेल्या निर्णायक लढतीत अर्मेनिया ईगल्सने बलाढ्य सेंट लुईस आर्कबिशॉप्स संघाचा ९.५ विरुद्ध ६.५ गुणांनी पराभव केला. आर्कबिशॉप्स संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. चायना पांडाजने तिसरे स्थान मिळविले. विजेत्या संघाला २० हजार डॉलर्सचा पुरस्कार देण्यात आला. ही पुरस्कार राशी विजेत्या संघातील खेळाडूंना विभागून दिली जाणार आहे. अर्मेनिया ईगल्स संघात रौनकशिवाय इराणचा ग्रँडमास्टर परहम माघसुडलू आणि अर्मेनियाचे ग्रँडमास्टर हाईक मार्टिरोस्यान व ग्रँडमास्टर टिग्रन पेट्रोसियान या दिग्गजांचा समावेश आहे. १४ वर्षीय रौनक संघातील सर्वात कमी वयाचा खेळाडू होता. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी पात्र ठरलेला तो एकमेव भारतीय बुद्धिबळपटू होता, हे उल्लेखनीय.

 

हेही वाचा : नागपूर जिल्ह्यात तयार होणार ऑलिंपिक दर्जाचे खेळाडू

 

सेंटर पॉइंट शाळेचा विद्यार्थी असलेल्या रौनकने ऐतिहासिक विजयावर आनंद व्यक्त केला. प्रतिक्रिया व्यक्त करताना रौनक म्हणाला, मी गेल्या तीन वर्षांपासून प्रो-चेस लीगमध्ये खेळत आहे. मात्र उपांत्यफेरीपलिकडे मजल मारता आली नाही. एकवेळा तरी ही स्पर्धा जिंकावी, अशी माझी मनापासून इच्छा होती. यावेळी ते स्वप्न पूर्ण झाले. आजचा दिवस माझ्यासाठी खरोखरच 'स्पेशल' आहे. या यशाने आत्मविश्वासही वाढणार आहे. उल्लेखनीय म्हणजे, ज्या अपेक्षेने मला संघात संधी देण्यात आली, ती अपेक्षा पूर्ण करण्यात यशस्वी ठरलो याचे अधिक समाधान आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raunak Help His Team to Win International Chess Championship