रिअल इस्टेटला झळाळी येणार; या सर्वेक्षणातून संकेत

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 जून 2020

रिअल इस्टेटला 35, सोने 28, ठेवी 22 तर स्टॉक एक्‍स्चेंजमध्ये 16 टक्के प्रतिसादकांनी गुंतवणुकीबद्दल सकारात्मकता दर्शवली आहे. सर्वेक्षणानुसार 50 टक्के लोक अजूनही भाड्याच्या घरात राहत असल्याचे स्पष्ट झालेले आहे.

नागपूर : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर येत्या सहा महिन्यांत रिअल इस्टेट क्षेत्राला बूस्ट मिळेल, असे संकेत एका सर्वेक्षणातून मिळू लागले आहे. प्रथमच घर खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या 73 टक्के ग्राहकांनी तयार घरे खरेदी करण्यास पसंती दर्शवली आहे. 21 टक्के ग्राहकांनी पुढील एका वर्षात तयार होणारी घरे खरेदी करण्याकडे कल असल्याचे म्हटले आहे.

हाउसिंग डॉट कॉम आणि नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट काऊन्सिल (नरेडको) यांनी कन्सर्न्ड येट पॉझिटिव्ह : द इंडियन रिअल इस्टेट कन्झ्युमरने केलेल्या सर्वेक्षणानुसार रिअल इस्टेट क्षेत्राला चांगले दिवस येतील, असे स्पष्ट झाले आहे. रिअल इस्टेटला 35, सोने 28, ठेवी 22 तर स्टॉक एक्‍स्चेंजमध्ये 16 टक्के प्रतिसादकांनी गुंतवणुकीबद्दल सकारात्मकता दर्शवली आहे. सर्वेक्षणानुसार 50 टक्के लोक अजूनही भाड्याच्या घरात राहत असल्याचे स्पष्ट झालेले आहे. 25 ते 45 वयोगटातील व्यक्तींनी तयार घरे खरेदीला पसंती दर्शवली असून ते प्रथम घर खरेदी करीत आहेत. त्यांची टक्केवारी 71 आहे. एप्रिल आणि मे 2020 मध्ये सर्व क्षेत्रात वाजवी प्रतिनिधित्वसाठी 'रॅंडम सॅम्पलिंग टेक्‍निक'द्वारे हे सर्वेक्षण करण्यात आले होते. सर्वेक्षणात 3000 हून अधिक संभाव्य घर खरेदीदारांचे मत घेण्यात आले.

बघा : संस्कृत बोलणारा वाहनचालक झाला वकील

या अहवालातूनच कोविड-19 नंतर गुंतवणूकदार रिअल इस्टेटबद्दल सकारात्मक दिसले. कोविडनंतरच्या जगात सर्वसाधारण सुविधा, व्यवसाय केंद्रे आणि अधिक मोकळ्या जागांचे महत्त्व नवीन मागणी निकषांचा मूळ गाभा राहणार असल्याचेही सर्वेक्षणातून उघड झाले आहे.

प्रॉपटायगर डॉट कॉमच्या समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी ध्रुव अगरवाल म्हणाले की, सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की, फ्लॅट्‌स शोधत असलेल्या संभाव्य घर खरेदीदारांमध्ये तरलतेची चिंता आहे. कोरोनोमुळे अनेकांनी सध्या थांबा आणि पहा अशी भूमिका घेतली आहे. परंतु, त्यातील बहुतेक लोक आगामी महिन्यांत हळूहळू बाजारात परत येऊ लागतील. हिरानंदानी समूहाचे अध्यक्ष डॉ. निरंजन हिरानंदानी यांनी सांगितले की, यापूर्वी नोटाबंदी, जीएसटी आणि रेरा यासह आर्थिक सुधारणांच्या सुनामीच्या दबावात होती. टप्प्याटप्प्याने अर्थव्यवस्था सुधारेल आणि घरांना मागणी वाढेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The real estate sector will get a boost in the next six months