कोरोना काळातही झाली ‘या’ तालुक्यात एक लाख ८० हजार क्विंटल कापसाची विक्रमी खरेदी

file
file


जलालखेडा (जि.नागपूर)   : मागील वर्षीच्या खरीप हंगामात निघालेल्या कापसाचे भाव आधीपासूनच कमी होते. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कापसाचे भाव खुल्या बाजारात वाढू शकले नाही. यामुळे शेतकऱ्यांना त्यांचा कापूस विक्री करताना अनेक अडचणी तर आल्याच, पण काहींना त्यांचा कापूस भावाने व्यापाऱ्यांना विकावा लागल्यामुळे आर्थिक नुकसानही सहन करावे लागले. यानंतर ही बऱ्याच शेतकऱ्यांचा कापूस विक्री करायचा शिल्लक होता. त्यामुळे नरखेड येथे आधी एकच असलेले सीसीआयचे केंद्र अपुरे पडत असल्यामुळे पुन्हा एक सीसीआय व एक कापूस पणन महासंघाचे खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. या तीन केंद्रावर नरखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून नरखेड तालुक्यातील ६७०० शेतकऱ्यांचा १ लाख ८० हजार क्विंटल कापसाची विक्रमी खरेदी करण्यात आली. विशेष म्हणजे नागपूर जिल्ह्यात कमी वेळात सर्वात जास्त खरेदी नरखेड तालुक्यातील खरेदी केंद्रावर करण्यात आली.

शासकीय हमीभावाने खरेदी
कृषी उत्पन्न बाजार समिती नरखेड अंतर्गत दरवर्षी भारतीय कापूस निगम लिमिटेडच्या मार्फत हमीभावाने कापसाची खरेदी करण्यात येते. त्यामुळे कोविड १९ च्या प्रदुर्भावापूर्वी मार्च २०२० पर्यंत दरवर्षीप्रमाणे खुल्या पद्धतीने सीसीआयच्या मार्फत सुमारे १६२० शेतकऱ्यांकडील ४० हजार क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली होती. त्यानंतर मात्र लॉकडाउन झाल्याने कापूस खरेदी बंद करण्यात आली होती. कापूस खरेदी करण्यास परवानगी मिळाल्यानंतर कापूस खरेदीकरिता एकाचवेळी गर्दी होऊ नये म्हणून ६८५० शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली होती. परंतू एकाच केंद्रावर इतक्या शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करणे शक्य नव्हते व नवीन कापूस खरेदी केंद्र सुरु करण्यात अनेक तांत्रिक अडचणी होत्या. पण नरखेड कृषी उत्पन्न बाजार समितीने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे पाठपुरावा सुरु ठेवल्यामुळे गृहमंत्री देशमुख यांच्या प्रयत्नाने हा तिढा सुटला व नरखेड तालुक्यासाठी दोन नवीन खरेदी केंद्र सुरु करण्यात आले.

अधिक वाचा : शहरानंतर आता ग्रामीण भागातील बाधितांची संख्या धडकी भरवणारी....

 लॉकडाउनमुळे झाली खरेदी संथगतीने
 लॉकडाउनमुळे सुरुवातीला फक्त  २० ते २५ शेतकऱ्यांकडील कापूस खरेदी सुरु करण्यात आली. इंशा कॉटेक्स नरखेड व केशव कॉटन धोत्रा मोहदी येथे सुरु असलेल्या कापसाची खरेदी लॉकडाउनमुळे संथगतीने सुरु असल्यामुळे शेतकऱ्यांना खूप दिवस प्रतीक्षा करावी लागत होती. पण सीसीआयचे एक वाढीव खरेदी केंद्र जलालखेडा व कापूस पणन महासंघाचे एक केंद्र मोगरा येथे कापूस खरेदी करण्यास मंजूर मिल्यानंतर कापूस खरेदीची गती वाढली. खरेदी केंद्रावर कोरोनासंबंधाने विशेष काळजी घेऊन सामाजिक दुरावा राहावा, यासाठी बाजार समितीच्या अवरमध्ये कापसाच्या गाड्या बोलावून तेथून टोकन देऊन एकावेळी मोजक्या गाड्या खरेदी केंद्रावर पाठविण्यात आल्या.

सुटीच्या दिवसीही खरेदी सुरु
नरखेड बाजार समितींतर्गत मोगरा येथील केंद्रावर एका दिवशी सर्वात जास्त ११० गाड्या, नरखेड केंद्रावर १०७ गाड्या, तर सर्व तीनही केंद्र मिळून एका दिवशी २०८ विक्रमी गाड्या मोजण्यात आल्या. त्यामुळे सर्व केंद्र मिळून दररोज सरासरी १०० ते १५० गाड्या, सुटीच्या दिवशी केंद्र सुरु ठेऊन मोजणे शक्य झाल्या. लॉकडाउननंतर नोंदणी झालेल्या ५१०० शेतकऱ्यांकडील १ लाख ४० हजार क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली.

अधिक वाचा  :    मासिक पाळीच्या वेदना दूर करतो हा खास चहा

अगदी कमी वेळात झाली खरेदी
हंगाम २०१९-२० मध्ये शासकीय हमीभाव योजनेंतर्गत सुमारे ६७०० शेतकऱ्यांकडील १ लाख ८० हजार ७०० क्विंटल एवढी विक्रमी कापूस खरेदी कमी वेळात करण्यात आला. खासगी जिनिंगची ४६३०० क्विंटल खरेदी मिळून एकूण २ लाख २७ हजार क्विंटल कापूस खरेदी करण्यात आल्याची माहिती बाजार समितीचे सभापती बबनराव लोहे यांनी दिली. उपसभापती पांडुरंग बानाईत, संचालक अमोल आरघोडे, मोतीलाल खजुरिया, वामन खवशी, मुशीर शेख, कोठीराम दाढे, संदीप बालपांडे, नामदेव बरडे, वनिता वंजारी यांच्या मार्गदर्शनाने व सहकार्याने बाजार समितीचे सचिव सतीश येवले, सहायक निबंधक श्रीमती बालपांडे, सीसीआयचे नरखेड केंद्रप्रमुख व ग्रेडर अभिजित वानखेडे, जलालखेडा येथील केंद्रप्रमुख व ग्रेडर दिलीप कांबळे, कापूस पणन महासंघाचे उपव्यवस्थापक उत्तमराव ठाकरे, ग्रेडर पंकज चव्हाण, राम कणखर, बाजार समितीचे निरीक्षक शेषराव राउत, कोषापाल राधेश्याम मोहरीया, लेखापाल सुरेश आटोने, मिस्त्री पुरुषोत्तम दातीर, लिपिक सुनील कडू, दिलीप जोध, अशोक जिचकार, रुपमाला चरपे, अमोल ठाकरे, खरेदी यंत्रणेमध्ये असलेले सर्व कर्मचारी, सर्व जिनिंग युनिटचे संचालक, जिनिंगमध्ये काम करणारे सर्व मजूर यांनी कोरोनाच्या संकटकालिन परिस्थितीत निडर होऊन नियमित अथक परिश्रम केले.  
     
संपादन  : विजयकुमार राऊत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com