सतरंजीपुऱ्यातील "पब्लीक को गुस्सा क्‍यू आता है'

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 31 मे 2020

नागपुरातही नागरिकांनी याविरुद्ध आपल्या भावना व्यक्त केल्या. प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिक तर लॉकडाउनला चांगलेच कंटाळले आहेत. त्यामुळे त्यांनी नागपूर महानगरपालिका प्रशासनाविरुद्ध राग व्यक्त केला.

नागपूर : लॉकडाउनचा कालावधी 30 जूनपर्यंत वाढविण्यात आल्याने नागरिकांचा संताप वाढला आहे. या निर्णयाचे पडसाद सोशल मिडीयावर लगेच दिसू लागले. नागपुरातही नागरिकांनी याविरुद्ध आपल्या भावना व्यक्त केल्या. प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिक तर लॉकडाउनला चांगलेच कंटाळले आहेत. त्यामुळे त्यांनी नागपूर महानगरपालिका प्रशासनाविरुद्ध राग व्यक्त केला.

गेल्या दोन महिन्यांपासून प्रतिबंधित क्षेत्रात रहावे लागत असल्यामुळे सतरंजीपुऱ्यातील नागरिकांचा संयम ढासळला.  या परिसरातील नागरिकांनी रस्त्यावर येऊन महापालिका प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त केला. नागरिकांचा संताप एवढा अनावर झाला की पोलिसही हतबल झाले. कोरोनाचे हॉटस्पॉट ठरल्याने सतरंजीपुऱ्यातील मशिद परिसर गेल्या दोन महिन्यांपासून प्रतिबंधित करण्यात आला आहे. आतापर्यंत येथील दोन हजार नागरिकांना विलगीकरणासाठी नेण्यात आले. या सर्वांना 17 मेपर्यंत परत घरी पाठविण्यात आले.

अवश्य वाचा - नागपुरात एकाच दिवशी दोघांचा मृत्यू... हा परिसर ठरला चौथा हॉटस्पॉट

परिसरात एकही कोरोनाबाधित नसल्यानेच येथील नागरिकांना घरी पाठविण्यात आले. यानंतरही प्रतिबंध का? असा सवाल करीत या परिसरातील नागरिकांनी आज रस्त्यांवर आंदोलन केले. कडेकोट बंदोबस्तात नागरिकांना डांबून ठेवले जात आहे. जीवनावश्‍यक वस्तुंसाठीही बाहेर जाऊ दिले जात नाही. साधा ताप आल्यानंतर डॉक्‍टरकडेही उपचारासाठी जाणे कठीण झाले आहे. गॅस सिलिंडर पाचशे ते सहाशे मीटरवरून उचलून आणावे लागत आहे. आणखी किती दिवस या यातना सहन करणार, असा सवाल एका नागरिकाने उपस्थित केला. यावेळी नागरिकांनी आयुक्तांविरुद्ध घोषणा दिल्या. नागरिकांच्या संतापामुळे पोलिसही हतबल झाले.

वाचा - काय आश्‍चर्य? आता ऑनलाइन जुळणार लग्नगाठी

पार्वतीनगर, काशीनगरातील प्रतिबंधित क्षेत्रात घट
पार्वतीनगरातील रुग्णासह विलगीकरणातील नागरिकांचा अहवालही निगेटिव्ह आला. त्यामुळे पार्वतीनगरातील भोस्कर यांचे घर, गिरडे डेकोरेशन, वाघमारे किराणा, बैनाबाई गजभिये, श्‍याम मंडप डेकोरेशन, दिनेश ट्रेडर्स, मौर्य सभागृह, डहाके निवास, पंकज निकोसे यांच्या घरापर्यंतच्या परिसरातील निर्बंध हटविण्यात आले. हनुमाननगर झोनअंतर्गत प्रभाग 34 मधील काशीनगर परिसरातील काही भाग मोकळा करण्यात आला. विजय वाघमारे यांचे घर, प्रभाकर शेंडे यांचे घर, अनिल कांबळे यांचे घर, पियूष कांबळे यांचे घरापर्यंतचा परिसरातील निर्बंध हटविले.

आणखी वाचा - शिक्षण विभागाने १५ जूनपासून ग्रीन झोनमध्ये शाळा सुरू करण्याचे नियोजन सुरु केले होते, पण... वाचा सविस्तर

रामेश्‍वरी रोड वसंतनगर परिसर सिल
धंतोली झोनअंतर्गत प्रभाग 33 मधील रामेश्‍वरी रोड वसंतनगर येथे गुरुवारी कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला. कोरोनाचा प्रादुर्भाव या भागात वाढू नये, यासाठी हा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला. वसंतनगरातील प्रमोद उईके यांचे घर, जयाबाई गिरडे यांचे घर, धर्मेद्र धनविजय, मयूर निकम यांचे घरापर्यंतचा परिसरात निर्बंध लावण्यात आले. त्यामुळे या परिसरात बाहेरील नागरिकांना प्रवेशबंदी असून परिसरातील नागरिकांनाही बाहेर पडता येणार नाही.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Residence of Satranjipura get angry over containment zone