परतीचा पाऊस आभाळातून नव्हे, ढसा ढसा डोळ्यातून बरसला !

मनोज खुटाटे
Wednesday, 14 October 2020

परतीच्या पावसाचा फटका कापसाला देखील बसला. पण यातून सावरत शेतकऱ्यांनी कापूस वाचविण्यासाठी बराच खर्च केला. पण आता परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. एकीकडे या पाण्याने रब्बी पिकाला व विहिरींना लाभ होणार असला, तरी मात्र दुसरीकडे खरिप हंगामाच्या पिकांचे नुकसान होत असल्याचे चित्र आहे.

जलालखेडा (जि.नागपूर): नरखेड तालुक्यात या पावसाळ्यात पाऊस जरी सरासरी एवढाच पडला असला तरी मात्र मोठ्या प्रमाणात झड व ढगाळ वातावरण राहिल्यामुळे सर्वच प्रकारच्या पिकांचे नुकसान झाले. यात सोयाबीन, मूग, उडीद या पिकांचे तर संत्रा व मोसंबी फळ पिकांचेही नुकसान झाले. याचा फटका कापसाला देखील बसला. पण यातून सावरत शेतकऱ्यांनी कापूस वाचविण्यासाठी बराच खर्च केला. पण आता परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. एकीकडे या पाण्याने रब्बी पिकाला व विहिरींना लाभ होणार असला, तरी मात्र दुसरीकडे खरिप हंगामाच्या पिकांचे नुकसान होत असल्याचे चित्र आहे.

अधिक वाचाः ‘कृषीभूषण’ सुधाकरराव कुबडे यांचा सेंद्रिय शेतीचा प्रयोग; आत्मनिर्भर होण्याचा सल्ला
 

सोयाबीनचे १०० टक्के नुकसान
 नरखेड तालुक्यात यंदा पावसाळ्यात पावसाने उशिरा आगमन केले. त्याचबरोबर यंदा पाऊस चांगल्या प्रमाणात पण अंतराने पडला. आधीच्या पावसाने पिकाचे नुकसान होऊन सोयाबीनचे १०० टक्के नुकसान झाले आहे. नुकताच या आठवड्यात परतीच्या  पावसाने जोरदार आगमन केले. यंदा शेतकऱ्यांच्या समस्येत वाढ पडली. सध्या सुरू असलेला पाऊस हा खरिपातील पिकासाठी पोषक नव्हे तर मारक ठरत आहे. परतीच्या पावसाने चांगलाच जोर धरला आहे. खरिपातील कोरडवाहू शेतीतील कापूस फुटत आहे व आता तो ओला झाला आहे. बोंडे काळी पडत आहेत. आधीच या पावसामुळे कापसाचा दर्जा घसरला असताना पुन्हा या पावसामुळे कापसाचे नुकसान होत असल्याने हा कापूस शेतकऱ्‍यांना मातीमोल भावात विक्री करावी लागणार आहे. त्यामुळे बाजारभावात नुकसान सोसावे लागणार असल्याचे चित्र आहे.  सोयाबीन तर होणे नाही, पण त्याची कापणी करून काही तरी होईल. गुरांना कुटार तरी होईल, या आशेने शेतकऱ्यांनी सोयाबीनची कापणी केली आहे. काही वळून उभ्या आहे, तर कुठे गंजीदेखील लागली आहे. पण मागील सहा दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे कापणीचा खर्च ही शेतकऱ्यांवर बसणार आहे. तसेच सोयबीनच्या काढणीच्या कामात व्यस्त असल्याने  ट्रॅक्टर मळणीयंत्र शेतात नेणे कठीण झाले आहे. खरिपांच्या काढणीबरोबर  काही रब्बीच्या हंगामाच्या मशागतीच्या तयारीला लागला आहे . परंतू पावसामुळे मशागत लांबणीवर पडल्याने गहू, हरभरा या पिकांची पेरणी लांबणीवर पडणार असल्याचे चित्र आहे.

अधिक वाचाः दांडीबहाद्दर पोलिस कर्मचाऱ्यांना आयुक्तांचा दणका; अधिकाऱ्यांशी करायचे सेटिंग

शेतकऱ्यांनो, पाण्याचा निचरा होऊ द्या !
नरखेड तालुक्यात कपाशी हे मुख्य पीक असल्याने परतीच्या पावसाचा जोर अधिक आहे. यामुळे कपाशीला लागलेली बोंडे झडत आहेत. काही ठिकाणी बोंडे फुटून त्यावरील कापूस ओला झाल्याने कपाशीचेही नुकसान झाले आहे. अद्यापही अनेक शेतांमध्ये पावसाचे पाणी साचले आहे. सध्या सुरू असलेला पाऊस धोकादायक आहे. त्यावर उपाय म्हणजे शेतकऱ्यांनी शेतात पाणी साचू न देता त्याचा निचरा लागलीच होणे गरजेचे असल्याचे कृषी विभागाने सांगितले. पाऊस अति होत असल्याने शेतातील पिकांचे नुकसान होत आहे. पावसाची उघडीप पडली तर पिके परिपक्व होतील.

कृषी अधिकारी काय म्हणतात-
 नरखेड तालुक्यात खरिपाचा पेरा ४७ हजार हेक्‍टरवर झाला आहे. मात्र, पावसामुळे व विविध रोगांमुळे १३ हजार हेक्‍टरवरील सोयाबीन पिकांचे ८० ते १०० टक्‍क्‍यांवर नुकसान झाले आहे. उडीद,  मूग हातचा गेला आहे. कपाशीला चांगली बोंडे फुटली आहे. मात्र, अति पावसाने बोंडे सडत आहे. या परिस्थितीत कपाशीचे उत्पादन अधिक येण्याची शक्‍यता कमीच आहे. बोंडे सडू नयेत यासाठी शेतकऱ्यांनी शेतात साचलेले पाणी काढून टाकण्यासाठी उपाययोजना केल्यानंतरच कपाशीचे पिके टिकतील असे आव्हान कृषी विभागाचे तालुका कृषी अधिकारी डॉ. योगीराज जुमडे यांनी शेतकऱ्यांना केले आहे.

संपादनः विजयकुमार राऊत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The return rain fell not from the sky, but from the eye!