जीर्ण सिवेज लाईनवरील घरे गडप होण्याचा धोका

राजेश प्रायकर
Tuesday, 27 October 2020

काही वर्षांपूर्वी अलंकार टॉकिज चौकात रस्ता खचला होता. त्याआधी आयएमए सभागृहापुढे तसेच अलंकार टॉकिजजवळील एका हायस्कूलजवळ लाईन खचली होती. सुदैवाने रस्त्यावर अपघात झाला नाही. मेहाडिया चौकातही खचल्यानंतर चेंबरचे काम करण्यात आले. मस्कासाथ, इतवारी या भागात ही सिवेज लाईन खचण्याच्या आतापर्यंत अनेक घटना झाल्या.

नागपूर : शहरातील ब्रिटिशकालीन सिवेज लाईन जीर्ण झाली असून ती खचल्यास त्यावरील घरे जमिनीत गडप होण्याचा धोका आहे. दाट क्षेत्रातून ही सिवेज लाईन गेली असून त्यावरील घरांत राहणारे नागरिक जीव मुठीत घेऊन वास्तव्य करीत आहेत. अजूनही महापालिका प्रशासन नव्या सिवेज लाईनबाबत गंभीर दिसत नसल्याने जीव गेल्यानंतर जाग येणार काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

अंबाझरी ते भांडेवाडीपर्यंत शहरातील सांडपाणी वाहून नेण्यासाठी इंग्रजांनी १९४५ मध्ये विटा व मातीच्या मिश्रणाने सिवेज लाइन तयार केली होती. अंबाझरी ते भांडेवाडीपर्यंत १८ ते १९ किलोमीटरची लांबीची ही सिवेज लाइन असून काही भागातून सांडपाण्याच्या विविध शाखा जोडल्यामुळे त्याची लांबी ४० किलोमीटर झाली आहे.

३० ते ३५ फूट खोल असलेली ही सिवेज लाईन आता जीर्ण झाली आहे. गेल्या सत्तर वर्षात शहराचा चेहरामोहरा बदलला असून महाल, जागनाथ बुधवारी, मस्कासाथ या दाटीवाटीच्या क्षेत्रात या सिवेज लाईनवर घरेही आहेत. यापूर्वीही ही सिवेज लाईन अनेकदा खचली आहे.

काही वर्षांपूर्वी अलंकार टॉकिज चौकात रस्ता खचला होता. त्याआधी आयएमए सभागृहापुढे तसेच अलंकार टॉकिजजवळील एका हायस्कूलजवळ लाईन खचली होती. सुदैवाने रस्त्यावर अपघात झाला नाही. मेहाडिया चौकातही खचल्यानंतर चेंबरचे काम करण्यात आले.

मस्कासाथ, इतवारी या भागात ही सिवेज लाईन खचण्याच्या आतापर्यंत अनेक घटना झाल्या. आतापर्यंत अनेक आयुक्तांनी केवळ खचलेल्या ठिकाणी भेट देऊन धुळीत पडलेला आराखडा बाहेर काढला. त्यात दुरुस्ती केली आणि नवा आराखडा पुन्हा धुळखात पडला. गेल्या चार वर्षांपासून यासंदर्भात नव्याने तयार करण्यात आलेला १२०० कोटींचा आराखडा केंद्राकडे पडलेला आहे.

नगरसेविका आभा पांडे अनेक वर्षांपासून प्रत्येक आयुक्तांपुढे ही समस्या मांडत आहेत. अर्थसंकल्पावरील सभेतही त्यांनी यासाठी तरतूद करण्याची मागणी केली. संपूर्ण सिवेज लाईन बदलण्याची गरज आहे. परंतु, केवळ प्रकल्प आराखड्याच्या औपचारिकतेवर भर दिली जात आहे. मागील आयुक्त तुकाराम मुंढे यांनीही नवा आराखडा तयार केला.

प्रदूषणमुक्तीवर महामेट्रोचा भर; मेट्रो स्टेशनवर सायकलसाठी असणार स्वतंत्र पार्किंग

त्यांनी यात केवळ दुरुस्तीवर भर दिला. संपूर्ण सिवेज लाईनच जीर्ण झाली असताना केवळ दुरुस्तीचे आराखड्यातून महापालिका नागरिकांच्या प्राणाबाबतही गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. एखाद्यावेळी घरे असेलल्या भागातील जीर्ण सिवेज लाईन खचून जिवित हानी झाल्यास जबाबदार कोण? असा प्रश्न विचारला जात आहे.

कसे वाहून नेणार सांडपाणी?
या सिवेज लाइनमधून आजही शहरातील सांडपाणी वाहत आहे. ६० ते ६५ वर्षे जुनी ही सिवेज लाइन असल्याने महापालिकेने पर्यायी सिवेज लाइन तयार करणे गरजेचे होते. ही सिवेज लाइन खचल्यास महापालिकेकडे शहरातील सांडपाणी वाहून नेण्यासाठी पर्यायी व्यवस्थाच नसल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

 
माझ्या प्रभागातील अनेक वस्त्यांतील घरे या सिवेज लाईनवर आहेत. आतापर्यंत अनेक आयुक्त सिवेज लाईन खचल्यानंतर पाहणी दौरा करून गेले. अजूनही नवीन सिवेज लाईनचा मुहूर्त निघाला नाही. ३५ फूट खोल ही सिवेज लाईन आहे. जीर्ण झाल्याने एखादे घरच गायब होण्यची शक्यता आहे. याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.
आभा पांडे, नगरसेविका.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Risk of houses collapsing on dilapidated sewage lines