अहो, सीडीसाठी बाहेर जाऊ नका... काय सुरू आहे दंत महाविद्यालयात?

केवल जीवनतारे
गुरुवार, 23 जानेवारी 2020

दंतोपचारासाठी विदर्भातूनच नाही तर विविध राज्यांतूनही रुग्ण येथे येतात. खेड्यातून रेफर केलेले रुग्ण असतात. वर्षभरात सव्वा ते दीड लाख रुग्णांची नोंद बाह्यरुग्ण विभागात होते. यातील पन्नास टक्‍क्‍यांपेक्षा जास्त रुग्णांना एक्‍स-रे काढावेच लागतात. ओपीजी तसेच एलएस एक्‍स-रेसाठी तीनशे रुपयांपेक्षा अधिक शुल्क वसूल केले जाते.

नागपूर : गरीब, खेड्यातील, झोपडपट्ट्यांतील दंतरोगांचे दुर्धर तसेच असह्य वेदनादायी दंत व्याधींशी झुंजणारे पाचशेवर रुग्ण शासकीय दंत महाविद्यालयात उपचारासाठी येतात. खासगी रुग्णालयात उपचाराची ऐपत नसल्याने सरकारी दंत रुग्णालयाशिवाय त्यांना पर्याय नसतो. मात्र, येथेही गरीब रुग्णांची लूट होत असते. या गरीब रुग्णांकडून होणारी लूट अफलातून मार्गाने होत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. 

पाचशेपैकी सुमारे शंभरावर रुग्णांना दातांचे एक्‍स-रे काढण्यासाठी येथील डॉक्‍टर लिहून देतात. एक्‍स-रे काढण्यासाठी सुरुवातीलाच पैसे भरावे लागतात. यानंतर "फिल्म' तर मिळत नाही; त्याऐवजी "सीडी' दिली जाते. सीडीदेखील रुग्णांनाच खरेदी करावी लागते. एक्‍स-रेसाठी पैसे भरले, त्याचे काय? अशा प्रक्रारे रुग्णांवर आर्थिक भुर्दंड दिला जात असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

असे का घडले? - 14 डिसेंबरला शाळेत गेली सानिया... नंतर आली ही बातमी

दंतोपचारासाठी विदर्भातूनच नाही तर विविध राज्यांतूनही रुग्ण येथे येतात. खेड्यातून रेफर केलेले रुग्ण असतात. वर्षभरात सव्वा ते दीड लाख रुग्णांची नोंद बाह्यरुग्ण विभागात होते. यातील पन्नास टक्‍क्‍यांपेक्षा जास्त रुग्णांना एक्‍स-रे काढावेच लागतात. ओपीजी तसेच एलएस एक्‍स-रेसाठी तीनशे रुपयांपेक्षा अधिक शुल्क वसूल केले जाते. एक्‍स-रे काढण्यासाठी 25 रुपयांपासून तर चारशे रुपयांपर्यंतचा खर्च येतो.

मागील दोन वर्षांपासून एक्‍स-रे काढल्यानंतर "फिल्म' देण्याचा प्रकार जवळजवळ बंद पडला आहे. त्याऐवजी "सीडी'द्वारे निदान दिले जाते. रुग्णांनाच 30 रुपये अतिरिक्त द्यावे लागतात. पूर्वी एक्‍स-रे काढले की, फिल्मसाठी अतिरिक्त पैसे मोजावे लागत नव्हते. मात्र, आता सीडीचा अतिरिक्त बोजा हा रुग्णांवर आला आहे. याशिवाय सीडी डॉक्‍टरांकडे उघडली नाही तर त्याची प्रिंट काढून आणावी लागते. त्या प्रिंटच्या खर्चाचा बोजा रुग्णावर बसतो. अशा प्रकारे शासकीय दंत महाविद्यालयात छुप्या मार्गाने रुग्णांची लूट होत आहे. 

'सीडी'ही शासकीय दंत महाविद्यालयातच मिळेल

एक्‍स-रे काढल्यानंतर सीडी खरेदी करून आणा, अशी सूचना रुग्णांना दिली जाते. सीडीसाठी बाहेर रुग्ण जात असल्यास त्याला याच विभागातून सूचना मिळते. "अहो, सीडीसाठी बाहेर जाऊ नका. शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाच्या काउंटरवर सीडी विकत मिळेल.' एका सीडीसाठी 30 रुपये मोजले जातात. अशा प्रकारे दहा रुपयांच्या सीडीसाठी 30 रुपये खर्च करावे लागतात. सीडी ओपन झाली नाही तर प्रिंटचा पर्याय येथे उपलब्ध आहे. असा अफलातून प्रकार सुरू असून दोन वर्षांपासून ही लूट सर्रासपणे सुरू आहे. 

हा एकप्रकारचा घोटाळाच 
गरिबांसाठी शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय हाच एकमेव पर्याय आहे, हे माहीत असल्यानेच दंत प्रशासनाकडून दंतची तिजोरी भरण्याचा हा अफलातून प्रकार मागील दोन वर्षांपासून सुरू आहे. शासकीय दंत महाविद्यालयातील एकप्रकारचा हा घोटाळाच आहे. रुग्णांची लूट न थांबविल्यास अधिष्ठाता, विभागप्रमुख यांची तक्रार वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, संचालक डॉ. तात्याराव लहाने, दंतचे सहसंचालक डॉ. विवेक पाखमोडे यांच्याकडे करण्यात येईल. 
- चंद्रहास राऊत, 
संपर्कप्रमुख, शिवसेना, नागपूर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Robbery of the poor at Government Dental College