नागपूर
नागपूर

जीवघेणा अट्टहास! धावत्या रेल्वेत चढण्याच्या नादात चुकला अंदाज अन खेचले गेले पाय; तेवढ्यात...

नागपूर ः चालत्या ट्रेनमधून उतरणे किंवा चढणे जीवघेणे ठरू शकते, याची पुरेपूर कल्पना असूनही अनेकजण ते धाडस करताना दिसतात. असाच जीवघेणा अट्टाहास करणारे दोघे रेल्वेतून पडले. रेल्वे सुरक्षा दलाच्या जबानांनी प्राणाची बाजी लावत त्यांना जीवदान दिले. शनिवारी नागपूर व वर्धा मार्गावर या घटना घडल्या. सुदैवाने प्रवाशांचे प्राण वाचले पण हा जीवघेणा अट्टाहास कशासाठी असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. 

शनिवारी रात्री नागपूर -मुंबई दुरांतो फलाट क्रमांक ८ वरून सुटण्याच्या तयारीत होती. कामानिमित्त उपराजधानीत आलेले मुंबईच्या चेंम्बूर ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षकाला याच रेल्वेतून रवाना व्हायचे होते. ते रेल्वेस्थानकावर पोहोचले डब्यात चढणार तोच रेल्वे सुरू झाली. गती कमी असल्याने सहजतेने चढता येईल असा त्यांचा कयास होता. परंतु. अंदाज चुकला आणि फलाट व रेल्वे डब्यातील अंतरातून त्याचे दोन्ही पाय आत खेचले गेले. 

कर्तव्यदक्ष आरपीएफ जवान संजय खंडारे यांनी धोका लक्षात येताच क्षणाचाही विलंब न करता झडप घालून प्रवाशाला ओढून बाहेर काढले. अन्य एका प्रवाशानेही त्यांना मदत केली. वेळीच मदत मिळाल्याने त्यांचे प्राण वाचले. हे दृष्य उघड्या डोळ्यांनी बघणाऱ्या अन्य प्रवाधांच्या काळजात धस्स झाले होते. सहायक पोलिस निरीक्षक दर्जाचा अधिकारीच असा बेजबाबदार पणाने वागत असेल तर सर्वसामान्यांचे काय, असा प्रश्न प्रवाशांच्या गर्दीतून उपस्थित करण्यात आला. 

याचप्रमाणे ०२०३६ नागपूर -पुणे सुपरफास्ट ट्रेन वर्धा स्थानकावर पोहोचली. वर्धा येथील रहिवासी वंदना डोंगरे (४०) या मुलीला सोडण्यासाठी स्टेशनवर आल्या होत्या. एस-३ डब्यात मुलीला बसवून बाहेर पडणार तोच रेल्वे सुरू झाली. बाहेर पडत असताना गाडी सुरू झाल्याचे भानही त्यांना राहिले नाही आणि त्या खाली पडल्या. 

त्या रेल्वेसह ओढत जाणार तेवढ्यात कर्तव्यावर असणारे आरपीएफ जवान निलेश पिंजरकर यांनी वेळीच धाव घेतली आणि त्यांना सुरक्षित बाहेर ओढून जीवदान दिले. या दोन्ही घाटना सीसीटिव्ही फुटेजमध्ये कैद झाल्या आहेत. सुरक्षित प्रवासाबाबत रेल्वेकडून सातत्याने जनजागृती केली जाते. यानंतरही प्रवासी बेजबाबदारीने वागत असल्याने अपघाताच्या घटना घडत असतात.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com