छत्रपतींच्या राज्यव्यवस्थेची ब्ल्यूप्रिंट शासनकर्त्यानी अभ्यासावी : भय्याजी जोशी 

Bhayyaji Joshi
Bhayyaji Joshi

नागपूर : राज्यव्यवस्थेचे मूर्तीमंत उदाहरण म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकाळाकडे पाहता येते. त्यांनी राज्याची व्यवस्था कशी चालवावी याची एक ब्ल्यूप्रिंट तयार केली आहे. आज शासन करणाऱ्या प्रत्येकाने त्यांच्या राज्यव्यवस्थेचा अभ्यास करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी केले. 

छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक (हिंदू साम्राज्यदिन) सोहळ्यात ते बोलत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे दरवर्षी या सोहळ्याचे जाहीर आयोजन करण्यात येते. यंदा संचारबंदीच्या पार्श्‍वभूमीवर सरकार्यवाह भय्याजी जोशी यांचे ऑनलाईन उद्बोधन झाले. सरकार्यवाह म्हणाले, शासन करताना भेदभाव न झाल्यास जनता विश्‍वास करते. छत्रपतींच्या राज्यव्यवस्थेत कधीही भेदभाव झाला नाही म्हणून आजही त्यांच्या राज्यव्यवस्थेवर जनतेचा विश्‍वास आहे. महिलांवर अत्याचार करणाऱ्यांवर, शेतकऱ्यांचा छळ करणाऱ्यांवर त्याकाळी कठोर शासन व्हायचे. छत्रपतींच्या अष्टप्रधान मंडळातील एका मंत्र्यावर न्याय व्यवस्थेची पूर्ण जबाबदारी होती. कोणत्याही सामान्य व्यक्‍तीवर अन्याय होणार नाही याची त्याकाळात पूर्णत: काळजी घेतल्या जायची. 

श्रीरामाने ज्याप्रमाणे रावणाचा नाश केला, श्रीकृष्णाने धर्मसंस्थापनेसाठी आयुष्य व्यतित केले त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू साम्राज्याच्या निर्मितीसाठीच स्वत:चे संपूर्ण जीवन समर्पित केले असल्याचे यावेळी भय्याजी जोशी म्हणाले. हिंदू साम्राज्य चालविताना छत्रपती शिवाजी महाराजांचा व्यक्तिगत स्वार्थ आडवा आला नाही. मातृभूमीसाठी आणि हिंदू राज्यासाठी त्यांनी जीवनभर संघर्ष केला. विशेष म्हणजे तीनशे किल्ल्यांतील एकही किल्लेदार त्यांचा नातलग नव्हता. कारण छत्रपती शिवाजी महाराज कायमच गुणवत्ता पाहून जबाबदाऱ्या निश्‍चित करायचे. त्यांनी कधीही नातेसंबंध बघितले नाहीत. स्वराज्य सुरक्षित राहावे इतकीच त्यांची इच्छा होती. 

राज्याचे नेतृत्व करणाऱ्याला परिस्थितीचे आकलन करता आले पाहिजे, तितका आत्मविशास व साहस त्याच्यात असणे गरजेचे आहे. लक्ष गाठण्यासाठी मनात श्रद्धा असावी लागते. प्रारंभिक जीवनात जीजाबाईवर त्यांची श्रद्ध होती. व्यक्‍ती जोपर्यंत श्रद्ध ठेवत नाही तोपर्यंत तो पुरुषार्थ गाजवू शकत नाही असे जोशी म्हणाले. 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची वेळ आली तेव्हा ते तयार नव्हते. आजच्या स्थितीत स्वत:हून राज्यभिषेक करून घेत असेल तरी अनुचित समजल्या जात नाही. शिवाजी महाराजांनी स्वत:चा राज्याभिषेक करवून घेतला नाही. साम्राज्याला हिंदू राजा गरजेचा आहे असा आग्रह गागाभट्ट यांनी धरला म्हणून आईभवानीचा आशीर्वाद असे मानून ते शिवाजी महाराज गादीवर बसले असे भय्याजी जोशी म्हणाले. 

छत्रपती व औरंगजेबची तुलना अशक्‍य 
लोक छत्रपती व औरंगजेबची तुलना करतात. मात्र छत्रपती शिवाजी महाराज व औरंगजेबची तुलना होऊ शकत नाही. एकीकडे स्वत:च्या वडिलांना, मुलांना कारागृहात टाकणारा औरंगजेब होता तर दुसरीकडे निस्वार्थपणे राज्यव्यवस्था चालविणारे छत्रपती शिवाजी महाराज होते. जगात कोणताही राजा नाही ज्यांना योगी संबोधल्या गेले. परंतू छत्रपती शिवाजी महाराजांना श्रीमान योगी संबोधल्या जाते असे जोशी म्हणाले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com