आरटीई प्रवेश : चुकीची कागदपत्रे देत असाल तर खबरदार! 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 जून 2020

हमीपत्रात आरटीई प्रवेशासाठी दिलेली माहिती खोटी आढळल्यास पाल्याचा प्रवेश रद्द करता येणार आहे. याशिवाय पालकांवर फसवणुकीचा गुन्हाही दाखल करता येणार आहे. 

नागपूर : राज्यात शिक्षणाचा अधिकार कायद्यांतर्गत पालकांना आता प्रवेशासाठी हमीपत्र भरून द्यावे लागणार आहे. त्यामुळे प्रवेशादरम्यान पालकांनी दिलेली माहिती खोटी आढळून आल्यास पाल्याचा प्रवेश रद्द होणार आहे. 

आरटीई प्रवेशासंदर्भात कुठल्याच तारखा जाहीर न झाल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण होते. एकीकडे राज्य सरकारने शाळा सुरू करण्याबाबत जाहीर केल्यावर पालकांच्या चिंतेत भर पडली होती. मात्र, दोन दिवसांपूर्वीच सरकारने आरटीई प्रवेशासाठी नियमावली जाहीर केली. आता एक-दोन दिवसांत प्राथमिक विभागाकडून तारखांच्या घोषणांची शक्‍यता आहे. प्रक्रिया सुरू होताच शाळांकडून पालकांना अलॉटमेंट लेटरची प्रत घेऊन बोलाविण्यात येणार आहे. यावेळी पालकांना कागदपत्रांसह शाळेत उपस्थित राहायचे आहे. शाळांकडून पालक आणि पाल्यांची मूळ कागदपत्रे आणि त्याची प्रत घेण्यात येईल. याशिवाय पालकांकडून एक हमीपत्रही भरून घेण्यात येईल. यानंतर सर्व कागदपत्रे तपासण्यासाठी पडताळणी समितीकडे कागदपत्रांची तपासणी करण्यात येणार आहे. 

हेही वाचा : ...अन्‌ तुकाराम मुंढे तावातावात सभागृहातून निघून गेले; इतिहासातील पहिलीच घटना

दरवर्षी आरटीई प्रवेशादरम्यान बऱ्याच पालकांकडून बोगस कागदपत्रांचा वापर करून प्रवेश घेण्यात येतो. यामध्ये प्रामुख्याने खोटा रहिवासी दाखला देणाऱ्यांची संख्या अधिक आहे. शिवाय किरायदार म्हणून खोट्या करारपत्राची प्रतही पालकांकडून देण्यात येते. मात्र, प्रवेश होताच ते त्या ठिकाणी रहिवासी नसल्याची बाब उघड होते. त्यामुळे अनेकदा शाळा सुरू झाल्यावर अशी प्रकरणे उघडकीस येतात. तेव्हा शाळेतून प्रवेश रद्द करता येणे अशक्‍य होते. त्यामुळे यावर्षी राज्य सरकारने पालकांकडून हमीपत्र भरून घेण्याची शक्‍कल लढविली आहे. त्यामुळे हमीपत्रात आरटीई प्रवेशासाठी दिलेली माहिती खोटी आढळल्यास पाल्याचा प्रवेश रद्द करता येणार आहे. याशिवाय पालकांवर फसवणुकीचा गुन्हाही दाखल करता येणार आहे. 

 

गेल्या वर्षी काही पालकांनी रहिवासी दाखल्याबाबत चुकीची माहिती दिल्याची तक्रार समोर आली होती. आरटीई ऍक्‍शन समितीद्वारे अशा तक्रारीवर पालकांच्या कागदपत्रांची तपासणी करून त्यात चुकीचे आढळून आल्यास त्यांचे प्रवेश रद्द करण्याची मागणी केली होती. त्यासंदर्भात शिक्षण विभागालाही अनेकदा निवेदनातून मागणी केली होती. त्यानुसार यावर्षी अशा प्रकारचे हमीपत्र भरुन द्यावे लागणार आहे. 
-शाहिद शरीफ, अध्यक्ष, आरटीई ऍक्‍शन समिती. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rules for RTE admission announced