साहेब, दुकान उघडण्याची परवानगी द्या! नाभिक समाजाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जून 2020

 कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सलून व ब्यूटीपार्लर व्यवसाय मार्च महिन्यापासून बंद झाल्याने मुलांचे शिक्षण, दुकानाचे भाडे, घरभाडे, वीजबिल, रोजचे दैनंदिन खर्च, घरखर्च व इतर खर्च भागविणे कठीण झाले आहे.

कामठी (जि. नागपूर) : कोरोनामुळे नाभिक समाजावर आर्थिक संकट कोसळले आहे. गेल्या मार्च महिन्यापासून हजामतीची दुकाने बंद असल्याने पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. जवळपास सर्वच दुकाने उघडली असताना आम्हीच काय घोडे मारले असा सवाल नाभिक बंधू करीत आहेत. दुकाने उघडू द्या नाही तर मरणाला कवटाळण्याची परवानगी द्या, अशी मागणी गुरुवारी या समाजाने मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात केली आहे.

जागतिक महामारी कोविड-19 मुळे संपूर्ण देश व महाराष्ट्राला "सळो की पळो' करून सोडले आहे. नाभिक समाजाने गेल्या तीन महिन्यांपासून शासनाच्या निर्देशानुसार, आपली दुकाने बंद ठेवली आहेत. परंतु, आज परिस्थिती हतबल झाली आहे.

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सलून व ब्यूटीपार्लर व्यवसाय मार्च महिन्यापासून बंद झाल्याने मुलांचे शिक्षण, दुकानाचे भाडे, घरभाडे, वीजबिल, रोजचे दैनंदिन खर्च, घरखर्च व इतर खर्च भागविणे कठीण झाले आहे. त्यामुळे आर्थिक व मानसिक परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने नाभिक समाजावर उपासमारीची वेळ आली आहे. असे असले तरी नाभिक समाजाने शासनास सहकार्य करून आपले व्यवसाय आजपर्यंत बंद ठेवले आहे.

वाचा- "झुंड' सिनेमाच्या खऱ्या नायकाची "कोरोना'ग्रस्तांसाठी मदत

नाभिक एकता मंचच्या वतीने शासनास मागील दोन महिन्यांपासून जिल्ह्यातील नाभिक एकता मंचच्या सर्व कार्यकारिणीद्वारे निवेदन देऊन नाभिक सलून व्यावसायिकास मदत करण्याची मागणी करण्यात आली होती. परंतु, शासनाने या निवेदनाची दखल घेतली नाही. नाभिक एकता मंचच्या वतीने वारंवार पत्र देऊन शासनास स्मरण करून देण्यासाठी निवेदन देण्यात आले आहे.

त्यामध्ये शासनाने आमच्या मागणीचा विचार करून नाभिक सलून व्यवसायिकांना व्यवसाय सुरू करण्याची परवानगी व आर्थिक मदतसुद्धा आजपर्यंत केली नाही. त्यामुळे गुरुवारी संपूर्ण राज्यभर नाभिक एकता मंचच्या वतीने नाभिक समाज आपल्या व्यवसायस्थळी मास्क, सोशल डिस्टन्सिंग व शासनाने दिलेल्या सर्व नियमांचे पालन करीत मूकआंदोलन करून कामठीच्या तहसीलदारांना मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन देण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Saloon shop owner requested C.M to allow us to open saloon shops