नागपूरमध्ये सोमवारपासून संस्कृत महोत्सव; राज्यपाल भगत सिंग कोश्यारी करणार उद् घाटन

मंगेश गोमासे
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

विद्यापीठातर्फे दरवर्षी संस्कृत क्षेत्रात असामान्य योगदान देणा-या संस्कृत वि़द्वानाला तसेच संस्कृत संस्थेला ‘संस्कृत सेवा सन्मानाने’ गौरविले जाते. यावर्षी संस्कृत क्षेत्रातील विद्ववान, राष्ट्रीय संस्कृत संस्थानचे पूर्व कुलगुरू तसेच आंतरराष्ट्रीय संस्कृत संघाचे माजी अध्यक्ष प्रो. व्ही. कुटुंबशास्त्री यांना ‘‘प्राच्यविद्यावाचस्पती’’ या उपाधीने आणि 25 वर्षांपासून संस्कृत भारती संस्थेतर्फे प्रकाशित होणा-या संभाषण संदेश संस्कृत पत्रिकेला ‘‘गीर्वाणवाणीसपर्यापुरस्कार’’ स्वरूपात संस्कृत सेवा सन्मान प्रदान केला जाणार आहे.
 
नागपूर : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या विस्तार सेवा मंडळातर्फे संस्कृत महोत्सव 2020 सोमवारी (ता.३) ऑनलाइन माध्यमातून साजरा केला जाणार असल्याची माहिती कुलगुरू प्रो. श्रीनिवास वरखेडी यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरवर्षी श्रावण पौर्णिमेला संस्कृत दिन साजरा केला जातो.

कुलगुरू प्रो. श्रीनिवास वरखेडी म्हणाले, संस्कृत महोत्सवाचे आयोजन भारताचे हृदयस्थान असलेल्या नागपुरात होत असून, याद्वारे संस्कृत भाषेचा प्रचार-प्रसार व्यापक व प्रभावी रितीने सर्वत्र होईल. महोत्सवाचे उद् घाटन महाराष्ट्राचे राज्यपाल आणि कुलपती भगत सिंग कोश्यारी यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत उपस्थित राहतील. याशिवाय राष्ट्रीय संस्कृत संस्थानचे माजी कुलगुरू प्रो. व्ही. कुटुंबशास्त्री यांच्यासह विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. श्रीनिवास वरखेडी, कुलसचिव प्रो. विजयकुमार उपस्थित राहतील. कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे विस्तार सेवा मंडळ संचालक प्रो. कृष्णकुमार पाण्डेय यांच्या निर्देशाखाली आकर्षक व नवीन रूपात हा संस्कृत महोत्सव आयोजित केला जात आहे.

कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर प्रथमच हा महोत्सव ऑनलाइन माध्यमातून साजरा होणार आहे. महोत्सवाच्या उद्घाटन समारोहात 200 हून अधिक संस्था आणि 10000 हून अधिक संस्कृतप्रेमी ऑनलाइन उपस्थित राहणार आहेत. संस्कृत महोत्सवाच्या माध्यमातून संस्कृत भाषा प्रचार-प्रसार आणि प्राचीन ज्ञानभांडाराचा परिचय होण्यासाठी संस्कृत चळवळ चालविली जाणार आहे. समारोहात विद्यापीठ आणि संस्कृत भारती यांच्या संयुक्त विद्यमाने सायन्स इन संस्कृत (संस्कृते विज्ञानम्) हा ग्रंथ प्रकाशित होणार आहे.

सविस्तर वाचा - पुरातत्त्व संशोधक डॉ. श्रीपाद चितळे यांचे निधन

विद्यापीठातर्फे दरवर्षी संस्कृत क्षेत्रात असामान्य योगदान देणा-या संस्कृत वि़द्वानाला तसेच संस्कृत संस्थेला ‘संस्कृत सेवा सन्मानाने’ गौरविले जाते. यावर्षी संस्कृत क्षेत्रातील विद्ववान, राष्ट्रीय संस्कृत संस्थानचे पूर्व कुलगुरू तसेच आंतरराष्ट्रीय संस्कृत संघाचे माजी अध्यक्ष प्रो. व्ही. कुटुंबशास्त्री यांना ‘‘प्राच्यविद्यावाचस्पती’’ या उपाधीने आणि 25 वर्षांपासून संस्कृत भारती संस्थेतर्फे प्रकाशित होणा-या संभाषण संदेश संस्कृत पत्रिकेला ‘‘गीर्वाणवाणीसपर्यापुरस्कार’’ स्वरूपात संस्कृत सेवा सन्मान प्रदान केला जाणार आहे.

पत्रकारपरिषदेला संस्कृत महोत्सवाचे समन्वयक आणि विस्तार सेवा संचालक प्रो. कृष्णकुमार पाण्डेय, राज्य समन्वयक डॉ. प्रसाद गोखले, कुलसचिव प्रो. विजयकुमार, जनसंपर्क अधिकारी डॉ. रेणुका बोकारे उपस्थित होते.
 
संपादन - स्वाती हुद्दार

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sanskrut Mahotsav from Monday in Nagpur