शाळांची प्रवेशाची घाई, परंतु सत्र सुरू होणार कधी?

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 मे 2020

कोरोनामुळे जगभरात हाहाकार उडाला आहे. टाळेबंदीमुळे संपूर्ण अर्थव्यवस्था खिळखिळी झाली. मार्च, एप्रिल महिन्यात होणाऱ्या शैक्षणिक परीक्षाही झाल्या नाहीत.

नागपूर : कोरोनाचा फैलाव दिवसेंदिवस वाढत असल्याने शाळा जून महिन्यात सुरू होणार की नाही, याची शाश्‍वती सध्यातरी कोणीच देत नाही. शाळांनी ऑनलाइन प्रवेशाची प्रक्रिया सुरू केली असून प्रवेशासाठी पालकांना एसएमएस पाठविले जात आहे. परंतु शाळा कधी सुरू होणार याचीच चिंता पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांना आहे. विदर्भात दरवर्षी 26 जूनपासून सुरू होणाऱ्या शाळांचा पहिला ठोका जुलै महिन्यात वाजण्याची शक्‍यता आहे. मात्र, कोरोना धास्तीने शैक्षणिक नुकसानाची भीती आहे.

कोरोनामुळे जगभरात हाहाकार उडाला आहे. टाळेबंदीमुळे संपूर्ण अर्थव्यवस्था खिळखिळी झाली. मार्च, एप्रिल महिन्यात होणाऱ्या शैक्षणिक परीक्षाही झाल्या नाहीत. कोरोनाचा प्रसार संसर्गाने होत असल्याने परीक्षा टाळण्याशिवाय सरकारकडे पर्यायच नव्हता.

पहिली ते नववीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात प्रवेश देण्याचे आदेश सरकारने दिले. त्यामुळे गेल्यावर्षीही थोड्या प्रमाणात का होईना पण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. दोन महिन्यांपासूनची टाळेबंदी 31 मेपर्यंत राहणार आहे. मात्र, त्यानंतरही टाळेबंदीत वाढ होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. सरकार काय निर्णय घेते, याकडे पालक, विद्यार्थ्यांचे लक्ष आहे.

विलगीकरण केलेल्या शाळेला लावले होते पडदे अन्‌ रात्री झाला आवाज, मात्र...

शैक्षणिक नुकसान होणार

एकट्या नागपूर जिल्ह्यात सव्वाचारशेहून अधिक रुग्ण असून विदर्भात हजारावर आकडा आहे. काही दिवसांपूर्वी एकही रुग्ण नसणाऱ्या गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा जिल्ह्यात कोरोनाने शिरकाव केला. ग्रामीण भागात सातत्याने रुग्णांची संख्या वाढत असल्याने ही बाब धडकी भरवणारी आहे. भविष्यात संख्या वाढल्यास ठिकाणी विलगीकरणासाठी शाळा, महाविद्यालयांच्या इमारतींचा वापर होऊ शकतो. त्यामुळे शाळा नियमित वेळापत्रकानुसार सुरू होतील, अशी शक्‍यता सध्या तरी नाही. दुसरीकडे धास्तीने पालक विद्यार्थ्यांना शाळेत पाठवतील असे वाटत नाही. परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.
 

पुस्तके छापून तयार

जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तके देण्याचा उपक्रम शिक्षण विभागाकडून राबवण्यात येतो. राज्यातील विद्यार्थ्यांना लागणारी पुस्तके छापून तयार आहेत. मात्र, कोरोनाच्या धास्तीमुळे अद्याप पुस्तके आणण्यात आली नाहीत. कोरोनाचे संकट जसजसे दूर होईल तशी पुस्तके आणून प्रत्येक तालुक्‍यात पोहोचविण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात येत आहे. मात्र, या प्रक्रियेला किती वेळ लागू शकतो हे कोणीच सांगू शकत नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Schools are open in July not possible in June