बघा कोण दाखवतयं सीबीएसईच्या आदेशाला ठेंगा

Schools reject NCERT Books
Schools reject NCERT Books

नागपूर, : सीबीएसई शाळांनी "राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेची'द्वारे (एनसीईआरटी) तयार करण्यात आलेली पुस्तकेच वापरावी, असे आदेश केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई)काढले होते. या आदेशाला खुद्द शहरातील शाळांनी दुसऱ्याही वर्षी ठेंगा दाखविला आहे. शहरातील 90 टक्के शाळांनी "एनसीईआरटी'च्या पुस्तकांना नकार देत, खासगी प्रकाशकांचेच पुस्तक सर्रासपणे वापरत असल्याचे चित्र आहे.

राज्यासह देशातील बहुतांश सीबीएसई शाळा एनसीआरटीईच्या पुस्तकांशिवाय इतर विविध पब्लिकेशनच्या पुस्तकांचा अभ्यासक्रम शिकविताना उपयोग करतात. या पुस्तिका एनसीईआरटीच्या तुलनेत बऱ्याच महागड्या असतात. त्याचा फटका पालकांना बसतो. शाळांकडून पालकांना जाणीवपूर्वक खासगी प्रकाशकांची पुस्तके घेण्याची सक्ती केल्या जाते. यावर लगाम लावण्यासाठी सीबीएसईने शाळांनी केवळ एनसीईआरटीच्या पुस्तके खरेदी करण्याचे आदेश दिले. त्याही पूर्वी महाराष्ट्र शासनाने 11 जून 2004 शासन निर्णय जारी करून शाळांमधील शैक्षणिक साहित्य विक्रीवर बंदी आणत एनसीईआरटीची पुस्तके वापरण्याचे निर्देश दिले आहेत.

सीबीएसईच्या परिपत्रकानंतरही शाळांमध्ये एनसीईआरटीची नव्हे तर खासगी प्रकाशकांची पुस्तकेच घेण्यास भाग पाडले जाते. विशेष म्हणजे सध्या टाळेबंदीत विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाचे धडे देण्यात येत असताना, त्यातही एनसीईआरटीच्या पुस्तकांचा समावेश आहे. दुसरीकडे एनसीईआरटीची पुस्तके मिळत नसल्याची ओरड करुन या पुस्तकांची सक्ती करून एका उद्योजकाला सर्व व्यवसाय देऊन इतर खासगी प्रकाशकांना देशोधडीला लावले जात असल्याचाही सूरही काही प्रकाशक आणि पुस्तक विक्रेत्यांकडून आळवला जात आहे. मात्र, शाळा, प्रकाशक आणि दुकानदारांच्या अभद्र युतीमुळे पालक नागवला जात आहे. पालकांच्या मते जी पुस्तके 100 रुपयांच्या आत मिळतात तीच खासगी प्रकाशकांकडून 250 ते 300 रुपयाला विकली जातात.

शाळांद्वारे एनसीईआरटीच्या बाबतीत मुद्दामहून गैरसमज पसरवले जात असून पालकांच्या मनातही तशीच भीती निर्माण केली जात आहे. खासगी प्रकाशकांकडून ज्याप्रमाणे डिसेंबर जानेवारीमध्येच बोलणी करून पुस्तके मागवली जातात. तशीच बोलणी एनसीईआरटीची पुस्तके विकणाऱ्या दुकानदारांकडून का बरे केली गेली नाही, हा प्रश्‍न मात्र अनुत्तरितच राहतो.

नवोदय विद्यालयातून उत्तीर्ण होऊन यूपीएससी किंवा इतर अनेक क्षेत्रात यश मिळविणारे विद्यार्थी एनसीईआरटीच्याच पुस्तकातून शिकतात हे येथे उल्लेखनीय. दरम्यान, यासंदर्भात काही शाळांच्या शिक्षकांशी संवाद साधला असता, एनसीईआरटीची पुस्तके पुढल्या वर्षीपासून शिकविण्यात आणणार असल्याचे स्पष्ट केले. ही पुस्तके वेळवर मिळत नसल्यानेच खासगी प्रकाशकांची पुस्तके वापरावी लागत असल्याचे स्पष्ट केले.


ऑनलाइन साहित्य उपलब्ध


एनसीईआरटीद्वारे सर्वच साहित्य ऑनलाइन उपलब्ध करुन देण्यात आलेली आहेत. याउपर व्हीडिओ आणि ऑडिओ क्‍लीप्स संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. मात्र, शाळांकडून "हम करे सो कायदा' या भावनेनेच शिकविण्यावर भर देण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com