ग्रामीण भागातील शाळेची घंटा १४ डिसेंबरपासून; प्रशासनाचे एकमत 

schools in rural area starting from 14 december
schools in rural area starting from 14 december

नागपूर : कोरोना संसर्गामुळे या संपूर्ण सत्रात बंद असलेल्या ग्रामीण भागातील शाळा सुरू करण्याबाबत जिल्हा प्रशासनातील वरिष्ठांनी निर्णय घेतला आहे. विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये आज पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, विभागीय आयुक्त डॉ.संजीव कुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी याबाबत सूतोवाच केले असून १४ डिसेंबर पासून ग्रामीण भागातील शाळा सुरू करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी तसेच मृत्यूदर कमी करण्यासाठी उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये आज सोमवारी करण्यात आले होते. या बैठकीला आरोग्य, शिक्षण, सार्वजनिक स्वच्छता, पोलिस यंत्रणेतील सर्व वरिष्ठ उपस्थित होते. जिल्ह्यातील सर्व शिक्षकांच्या कोरोना संदर्भातील चाचण्या पूर्ण झाल्या असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी स्पष्ट केले.

तसेच शाळा सुरू करण्यासाठी आवश्यक असणारी पूर्वतयारी देखील पूर्ण झाली असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी शिक्षकांनी अतिशय सकारात्मकपणे शाळा सुरू करण्यासाठी सहकार्य करण्याचे स्पष्ट केल्याचे सांगितले. कोरोना संदर्भातील परिस्थिती नियंत्रणात असताना विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, अशी सार्वत्रिक भावना असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडे ऑनलाईन सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे कोरोना संदर्भातील आरोग्य यंत्रणेने दिलेले सर्व सुरक्षा नियम,अटी पाळून विद्यार्थ्यांना पुन्हा शाळांमध्ये शिक्षण देणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. 

नागपूर जिल्ह्यामध्ये शिक्षकांच्या मोठ्याप्रमाणात तपासण्या पूर्ण झाल्या आहेत. जिल्ह्यात २९६१ प्राथमिक शाळा असून १२५० माध्यमिक शाळा आहेत. ग्रामीण भागातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये १ लक्ष ३४ हजार ५२७ विद्यार्थी प्राथमिक शिक्षण घेत आहेत.

शहरातील शाळांचा निर्णय डिसेंबर अखेर

मनपा क्षेत्रातील शाळा डिसेंबर अखेरीस सुरू करण्यात येतील, अशी माहिती महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिली. त्यामुळे डिसेंबर अखेरीस किंवा एक जानेवारीपासून नागपूर शहरातील महानगरपालिका हद्दीतील शाळा देखील सुरू होतील, असे संकेत त्यांनी यावेळी दिले. मनपा क्षेत्रांमध्ये जवळपास ५९३ शाळा असून जवळपास १ लाख ४२ हजार २२० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

संपादन - अथर्व महांकाळ 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com