तो ड्युटीसाठी दररोज चालतो २२ किमी पायी!

नरेंद्र चोरे  
Friday, 9 October 2020

बेसा येथे राहणारा ४५ वर्षीय सुनील काही महिन्यांपर्यंत हल्दीराममध्ये सुरक्षारक्षक म्हणून नोकरी करीत होता. बऱ्यापैकी पगार मिळत असल्याने त्याचा परिवार खुश होता. मात्र अचानक कोरोना आला आणि त्याचे उदरनिर्वाहाचे साधनही हिरावून नेले. काही दिवस बेरोजगार राहिल्यानंतर परिस्थितीचे चटके बसू लागले.

नागपूर  : आजच्या काळात नागपूरसारख्या शहरात एखादा व्यक्ती ड्युटीसाठी दररोज पाच तास आणि २२ किमी पायी चालतो, असे सांगितले तर त्यावर कुणी सहसा विश्वास ठेवणार नाही. मात्र हे न पटणारे वास्तव आहे. धंतोलीच्या एका कार्यालयात सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत असलेला सुनील ठाकूर सायकल नसल्यामुळे रोज बेसा ते धंतोली हे अंतर पायी चालत आपल्या कुटुंबाचा सांभाळ करीत आहे. सुनीलचा हा केविलवाणा संघर्ष जितका विचार करण्यास भाग पाडणारा आहे, तितकाच प्रेरणादायीही म्हणावा लागेल.

बेसा येथे राहणारा ४५ वर्षीय सुनील काही महिन्यांपर्यंत हल्दीराममध्ये सुरक्षारक्षक म्हणून नोकरी करीत होता. बऱ्यापैकी पगार मिळत असल्याने त्याचा परिवार खुश होता. मात्र अचानक कोरोना आला आणि त्याचे उदरनिर्वाहाचे साधनही हिरावून नेले. काही दिवस बेरोजगार राहिल्यानंतर परिस्थितीचे चटके बसू लागले. कशीबशी नोकरी मिळाली, पण पगार जेमतेमच असल्यामुळे इच्छा असूनही तो सायकल घेऊ शकत नाही. 

ठळक बातमी - जेवताना पोळी कधी आणि किती खावी? जाणून घ्या आहारतज्ज्ञ डॉ. कविता गुप्ता यांच सल्ला
 

घरी जुनी दुचाकी आहे, पण पेट्रोलसाठी पैसे नाहीत. त्यामुळे ड्युटी करण्यासाठी पायपीट करणे, हा एकमेव पर्याय त्याच्यासमोर होता. सायकलीसाठी कुणापुढेही हात न पसरविता सुनील गेल्या चार-पाच महिन्यांपासून दररोज ऊन-पावसात बेसा ते धंतोली असा २२ किमी मॅरेथॉन पायदळ प्रवास करीत आहे. जाण्या-येण्यात तब्बल पाच तास जातात. शिवाय बारा तासांची रोज रात्रपाळी ड्युटी.

सुनील ड्युटीवर येताना रस्त्यावरच्या बॉटल्स, प्लास्टिक व रद्दी उचलून आणतो. त्यातून मिळणाऱ्या पैशात चहापाणी व नाश्ता करतो. ड्युटी व २२ किमीचा प्रवास करून प्रचंड थकवा जाणवतो, घामाघूम होतो. तरीही आराम न करता तो दुसऱ्या दिवशी पुन्हा नव्या दमाने कर्तव्यावर हजर होतो. सेक्युरिटीमध्ये साप्ताहिक सुटी नसते. एखादी सुटी घेतली तर पैसे कटतात. त्यामुळे कितीही अर्जंट काम असले तरीदेखील ड्युटीवर यावेच लागते, असे सुनील म्हणतो. 

सहा हजारांत भागत नसल्याने सुनीलची पत्नीही एका शोरूममध्ये नोकरी पत्करून परिवाराला आर्थिक हातभार लावत आहे. किराया, टॅक्स, इलेक्ट्रिक बिल, मुलाचे शिक्षण, कर्जाचे ओझे, हा सर्व आटापिटा करताना सुनील व त्याच्या परिवाराची चांगलीच घालमेल होत आहे. पण नशिबाचे भोग समजून तो भविष्यात कधी तरी दिवस पालटतील, या आशेने हलाखीच्या परिस्थितीवर मात देण्याचा प्रयत्न करतो आहे. 

संपादन  : अतुल मांगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Security guard Sunil Thakur walks daily for his job