पोलिस दलातील वरिष्ठ अधिकारी नाराज! काय आहे नेमका बदल्यांचा ‘पेच’

अनिल कांबळे
Thursday, 27 August 2020

कोरोना महामारीमुळे वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या व पदोन्नतीला ब्रेक लागला आहे. त्यानंतरही महाविकास आघाडी सरकारमध्ये एकवाक्यता नसल्यामुळे अद्याप बदल्यांचा तिढा सुटलेला नाही. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्यात ताळमेळ नसल्याने कोणाची बदली कुठे करावी? याबाबत निर्णय घेण्यास अडचणी निर्माण होत आहेत

नागपूर : राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून वातावरण तापले असून सलग कार्यकारी पदावर पोस्टींग करावी असा हट्ट मोजके अधिकारी करीत आहेत. याच हट्टापायी राज्यात बदल्यांचा पेच निर्माण झाला आहे. अनेक वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना महामारीमुळे वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या व पदोन्नतीला ब्रेक लागला आहे. त्यानंतरही महाविकास आघाडी सरकारमध्ये एकवाक्यता नसल्यामुळे अद्याप बदल्यांचा तिढा सुटलेला नाही. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्यात ताळमेळ नसल्याने कोणाची बदली कुठे करावी? याबाबत निर्णय घेण्यास अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळेच पोलिस अधिक्षक, पोलिस उपायुक्त ते अतिरिक्त पोलिस महासंचालक दर्जाच्या पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यावरून राज्यात तणाव निर्माण झाला आहे. अशातच कार्यकारी पदावर नियुक्त असलेल्या काही आयपीएस अधिकाऱ्यांनी पुन्हा कार्यकारी पदावरच बदलीचा हट्ट धरला आहे. तर काहींनी थेट पक्षश्रेष्ठींची भेट घेऊन क्रीम पोस्टींगसाठी ‘सेटींग’ लावली आहे. बदल्यांचा तिढा अद्याप न सुटल्याने आतापर्यंत तीनदा तारीख बदलण्याची नामुष्की सरकारवर आली आहे. आता ५ सप्टेंबरला सरकारचे एकमत झाल्यास बदल्या होण्याची शक्यता आहे.

मुदत वाढ नकोच
आयपीएस अधिकाऱ्यांना मुदतवाढ देण्याची प्रथा नव्याने सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक अधिकाऱ्यांवर अन्याय होतो आहे. पोलिस अधिक्षक आणि आयुक्त पदावरून पुन्हा त्याच पदावर बदलीचा अधिकाऱ्यांना हव्यास असतो. त्यामुळे मलाईदार पदावर चिटकून राहण्याची प्रवृत्ती निर्माण होते आहे.

आस्थापना मंडळ निरूपयोगी !
बदल्यांसंदर्भात निर्णय घेण्यासाठी पोलिस महासंचालकाच्या अध्यक्षतेखाली आस्थापना मंडळ कार्यरत असते. मात्र आता बदल्यांचे सर्व निर्णय गृहमंत्र्यांसह राजकीय पक्षातील नेते, आमदार-खासदार आणि पक्षकश्रेष्ठीच घेत असल्याचे उघड झाले आहे. पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये कोट्यवधीची उलाढाल होत असल्याचे आरोपही अलीकडे झाले आहेत.

सविस्तर वाचा - खुषखबर! लवकरच सुरू होणार राज्यातील जीम, विधानसभा अध्यक्ष नाना पटोलेंनी दिली ग्वाही

कनिष्ठ अधिकारी उपेक्षित
पोलिस उपनिरीक्षक ते निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदली आणि बढतीचे निर्णय घेण्याचा अधिकार पोलिस महासंचालकांना आहे. तरीही राज्यभरातील पीआय ते पीएसआय अधिकाऱ्यांच्या बदल्या व बढत्या रखडून ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे कार्यकाल पूर्ण होऊनही अधिकाऱ्यांना मन मारून काम करावे लागते आहे.

संपादन - स्वाती हुद्दार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Senior police officers are angry with department