सावलीही मला ‘या’ उन्हाने दिली, ‘ते’ गझलनवाजांच्या गायकीचे झाले ‘हमसफर’

विजयकुमार राऊत
Friday, 6 November 2020

गझल गायकीच्या प्रांतातील महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्यक्तिमत्त्व गझलनवाज भीमराव पांचाळे त्यांच्या संशोधनासाठी प्रेरणादायी ठरले. त्यांच्या गायकीवर कलावंत प्रा. राहुल भोरे यांनी ‘फिदा’ होऊन मोठ्या परिश्रमातून प्रबंध लिहून गझलप्रेमाचा उतराई होण्याचा प्रयत्न केला. राहुल यांना भीमरावांच्या गझल गायकीवर प्रबंध लिहावासा वाटला आणि त्यांनी ‘डॉक्टरेट’ मिळवून तसे करूनही दाखविले.

नागपूर :       पालवीने दिली, ना फुलाने दिली
                  सावलीही मला, या उन्हाने दिली!!

युवा गझलकार प्रफुल्ल भुजाडेंच्या गझलेच्या ओळी राहुल भोरे या हरहुन्नरी कलावंताला तंतोतंत लागू होतात. त्याचे कारण असे आहे की, राहुलची चिकित्सक बुद्धी आणि गझलेला वाहिलेली अपार निष्ठा. गझल गायकीच्या प्रांतातील महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्यक्तिमत्त्व गझलनवाज भीमराव पांचाळे त्यांच्या संशोधनासाठी प्रेरणादायी ठरले. त्यांच्या गायकीवर कलावंत प्रा. राहुल भोरे यांनी ‘फिदा’ होऊन मोठ्या परिश्रमातून प्रबंध लिहून गझलप्रेमाचा उतराई होण्याचा प्रयत्न केला. राहुल यांना भीमरावांच्या गझल गायकीवर प्रबंध लिहावासा वाटला आणि त्यांनी ‘डॉक्टरेट’ मिळवून तसे करूनही दाखविले. भीमरावांच्या चाहत्यांसाठी ही एक अभिमानाची बाब नक्कीच ठरेल.

अधिक वाचाः आरोग्य केंद्राविना नागरिकांच्या `आरोग्याशी खेळ मांडला’ !

अन् झाले ‘ते’ गझलयात्रेचे ‘हमसफर’
हातगाव (नांदेड) येथील राहुल भोरे भंडाऱ्याला संगीताचे सध्या प्राध्यापक आहेत. गझलेचा हा निस्सीम चाहता भंडाऱ्याच्या मैफिलीदरम्यान भीमरावांना भेटला आणि त्यांच्यावर पीएच.डी. करण्याची इच्छा व्यक्त केली. दिवंगत डॉ. अनिल नितनवरे यांनी या ‘चिंगारी’ला हवा दिली. भीमरावांचा विनम्र स्वभाव आणि साधे राहण्याची वृत्ती, यामुळे भीमरावांची प्रबंध लिहिण्यासाठी पूर्वीपासून नकारघंटाच होती म्हणा! आपले आयुष्य आणि गझलकार्य हे काही कुणी ‘डॉक्टरेट’ करावी एवढे नाही, असे मला वाटायचे, असे खुद्द भीमरावच मान्य करतात. गझलप्रांतात एवढ्या मोठ्या उंचीवर गेलेल्या भीमरावांचा अभिनिवेश व ‘पैतरेबाजी’त न रमण्याचा एकूण स्वभाव त्यांच्या चाहत्यांना माहीत आहेच . तरीही राहुल यांनी हट्ट सोडला नाही. भीमरावांचा सतत पिच्छा पुरवला. आष्टगाव, मुंबई, नागपूर, नांदेड जिथे जिथे भीमराव असतील, तिथे राहुल भोरे हे जायचे. तासन् तास चर्चा व्हायच्या. गझलची निवड, गझलचा आशय व स्वरबद्धता, उपशास्त्रीय संगीताचा गझलचा दर्जा, आशयप्रधान गायकीच्या अनुषंगाने राग-रस-भाव यांचा विचार, त्यानुसार करावयाचे चिंतन व रियाज अशा विविध बाबींवर संवाद सुरू झाला.

राहुल भोरे यांना ‘आचार्य’ पदवी
डॉ. शुभदा मांडवगडे यांच्यासारख्या सहृद आणि गझलप्रेमी गाइड त्यांना मिळाल्या. २०१५ पासून या कामाला लागलेल्या राहुल यांनी ३५० पानांचा ‘गझलनवाज भीमराव पांचाळे यांच्या शास्त्रीय, उपशास्त्रीय संगीताचा चिकित्सक अभ्यास : एक योगकार्य’ हा शोधप्रबंध पूर्ण केला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने २०१९ साली  राहुल भोरे यांना ‘आचार्य’ पदवीने सन्मानित केले आणि राहुल खऱ्या अर्थाने गझलयात्रेचे ‘हमसफर’ झाले.
अधिक वाचाः बेपत्ता 'वीर' 12 तासांत आढळला; घुग्घुस ते नागपूर प्रवासाचे गूढ गुलदस्त्यात

भीमरावांच्या गायकीला ‘सलाम’ !
राहुल यांना बालपणापासून भीमरावांनी गायीलेल्या गझला ऐकण्याचा जणू छंदच होता. यातून त्यांना प्रमाणबद्ध गझललेखन आणि गझल गायकीतील बारकावे समजू लागले होते. भीमरावांच्या गझला ऐकून गझलेच्या प्रवासातील वाटेकरू होण्याचा ध्यास त्यांच्या मनाने घेतला. त्यासाठी राहुल भोरे यांनी परिश्रम घेतले आणि प्रबंध पूर्ण केला. गझल गावी कशी, ती भीमरावांकडून कुणी शिकून घ्यावे, असे प्रमाणपत्र देऊन गझलसम्राट सुरेश भट यांनी भीमरावांच्या गायकीला ‘सलाम’ केला होता. अस्सल गझलगायनात मराठीत भीमरावांचा कुणीच हात पकडू शकत नाही, असे राहुलही मान्य करतात. मराठीत गझलगायन एकेकाळी साहित्याच्या तथाकथित मुख्य प्रवाहाकडून नाकारल्या गेलेल्या मराठी गझलला विद्यापीठीय स्तरावर मान्यता मिळणे तसेच मराठी गझलेच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह लावणाऱ्यांना सणसणीत उत्तर मिळणे, ही निश्चितच आनंदाची आणि समाधानाची बाब आहे.

स्वप्नातही वाटले नाही !
आपण डॉक्टर व्हावे असे, कधीच मनात आले नाही. आपण डॉक्टरेट करावी, असे वाटले; पण ते जमले नाही. आपल्यावर कुणी पीएच.डी. करेल असे तर स्वप्नातही वाटले नाही. राहुलला त्याच्या पुढील आयुष्यात भरभरून यश मिळो, हीच सदिच्छा.
-भीमराव पांचाळे
गझलनवाज

विद्यार्थ्यांना ‘प्रॅक्टिकली’ ज्ञान आत्मसात करता येईल !
भविष्यात या विषयाला पुस्तकाचे स्वरूप देऊन विद्यापीठ स्तरावर अभ्यासक्रमात स्वीकृती मिळविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्यातून अभ्यासक किंवा विद्यार्थ्यांना गझल गायकीतील बारकावे अभ्यासता येतील. त्यामुळे विद्यार्थ्यांना ‘प्रॅक्टिकली’ ज्ञान आत्मसात करता येईल.
-राहुल भोरे
प्राध्यापक व गझलगायक
 
संपादनःविजयकुमार राऊत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The shadow also gave me 'Ya', 'Te' became the ghazal singer's 'Humsafar'.