...आणि एका स्वप्नपरीने सेल्फीच्या नादात असा गमावला जीव

Anchal Wankhade
Anchal Wankhade
Updated on

नागपूर : काळ आला की कोणतेही कारण पुरेसे ठरते आणि मृत्यू घाला घालतो. अगदी व्यक्‍ती स्वत:च्या घरी आपल्या प्रिय व्यक्‍तींबरोबर असली तरी मृत्यू त्या सगळ्यांमधून अलगद उचलून नेतो. म्हणतात ना मृत्यू यायचा असेल तर ठेच लागूनही येतो. अगदी अशीच टना नुकतीच घडली आणि काही क्षणात होत्याचे नव्हते झाले. कधी स्वप्नातही मनाला शिवली नसेल अशारितीने आंचलला मृत्यूने गाठले.

बारावीत 92 टक्‍के गुण घेत घवघवीत यश मिळवल्यामुळे दिवसभर आनंदात असलेल्या युवतीला स्टूलवर चढून सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही. आरशासमोर सेल्फी घेत असताना तिचा पाय घसरला आणि स्टूलमध्ये अडकला. त्यामुळे ती डोक्‍याच्या भारावर पडली. डोक्‍याला गंभीर मार बसल्यामुळे युवतीचा मृत्यू झाला. ही घटना हुडकेश्‍वर पोलिस ठाण्याच्या हद्‌दीत घडली. आंचल मोरेश्‍वर वानखडे (वय 17, रा. संभाजीनगर, नरसाळा) असे मृत युवतीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंचल वानखेडे ही नारायणा विद्यालयात इयत्ता बारावीत शिकत होती. तिला आईवडील आणि एक लहान बहीण आहे. अभ्यासात अत्यंत हुशार असलेल्या आचलने शिक्षणाचे महत्त्व जाणले होते. अभ्यासात अतिशय हुशार असलेल्या आंचलला बारावीत 92 टक्‍के गुण मिळाले. तिच्या ज्ञानाचा लख्ख प्रकाश इतरांनाही प्रेरणादायी ठरला. आंचलला एमबीए करण्याची इच्छा होती. त्यासाठी ती पुण्याला जाणार होती. तत्पूर्वी तिला दीक्षाभूमी येथील आंबेडकर कॉलेजमध्ये पदवीपर्यंतचे शिक्षण घ्यायचे होते.

ती आपला आनंद कुटुंब आणि मित्र मैत्रिणींशी वाटून घेत होती. आंचल निकाल लागल्यापासून आनंदाच्या भरात नाचत-बागडत होती. रविवारी दुपारी आंचलने छानशी तयारी केली. त्यानंतर मोबाईलमध्ये जवळपास 20 ते 25 सेल्फी काढले तिला स्टूलवर उभे राहून सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही. सेल्फी काढताना ती डोक्‍याच्या भारावर पडून जखमी झाली. रूग्णालयात नेण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला. काही क्षणापूर्वी आनंदात असलेल्या आचलचा दुसऱ्याच क्षणी श्वास थांबला, यावर आईचा विश्वासच बसेना. आईने हंबरडा फोडला. आचलच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न रंगविणाऱ्या आई-वडीलांच्या जीवनात काळोख निर्माण झाला. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्‍त केली जात आहे.

सेल्फीने केला घात
अभ्यासामुळे आचलने स्वत:कडे कधी लक्ष दिले नाही. मात्र, बारावीतील यशाने ती निवांत झाली होती. घटनेच्या दिवशी तिला वाटले आपण तयारी करावी आणि मोबाईलने छानसे फोटो काढावेत. यासाठी ती तयारी होऊन फोटो काढत होती तोच तिचा पाय टेबलमध्ये अडकला आणि ती डोक्‍याच्या भारावर खाली पडली. आचलला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तिची प्राणज्योत मालवली. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.  

संपादन - स्वाती हुद्दार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com