धक्कादायक ! नागपूर जिल्ह्यात या आजारांनीही काढले डोके वर...

गुरूदेव वनदुधे/सुधीर बुटे
Wednesday, 9 September 2020

हिवताप व हत्तीरोगाला  नियंत्रणात  ठेवण्याकरिता युनिसेफ व WHO कडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जात होता. परंतू आरोग्य विभागाकडून निधीअभावी नाममात्र फवारणी व रक्ताचे नमुने घेतले जात होते. केंद्र व राज्य सरकारकडून भरीव निधीची तरतूद न करता हेतूपुरस्पररित्या दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे कोरोना या संसर्गजन्य रोगासोबत ग्रामीण भागातील नागरिकांना हिवताप, हत्तीरोग, डेंगी, काविड, गॅस्ट्रो या रोगांचा उद्रेक होऊन मृत्यूला समोरे जावे लागते की काय, असा प्रश्‍न ग्रामीण भागातील जनता करू लागली आहे.

पचखेडी (जि.नागपूर): जगात कोविड १९ या संसर्गजन्य रोगाची लागण मोठ्या प्रमाणात झाली. नागपूर शहराच्या व्यतिरिक्त ग्रामीण भागात देखील याची मोठ्या प्रमाणात शिरकाव झाला आहे.  या रोगासोबतच ग्रामीण भागात हिवताप, हत्तीरोग, डेंगी, काविळ, गॅस्ट्रो या रोगाची सुद्धा पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात लागण सुरू झाली आहे. परंतू कोरोना व्यतिरिक्त या साथरोगांना आळा घालण्यासाठी आजच्या घडीला काहीही उपाययोजना दिसत नसल्यामुळे नागरिकांत संताप व्यक्त करण्यात येत आहे.

कुठे गेली फवारणी?
गेल्या १५ वर्षापासून ग्रामीण भागात डीडीटी अथवा लॅम्बडा या औषधाची फवारणी फार प्रमाणात होत होती. परंतू सध्या फवारणी होत नसल्यामुळे हिवताप व हत्तीरोग निर्मूलनार्थ कार्यरत असलेल्या हंगामी फवारणी व आरटीवर्कर यांना कामापासून मुकावे लागत आहे. हिवताप व हत्तीरोगाला  नियंत्रणात  ठेवण्याकरिता युनिसेफ व WHO कडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जात होता. परंतू आरोग्य विभागाकडून निधीअभावी नाममात्र फवारणी व रक्ताचे नमुने घेतले जात होते. केंद्र व राज्य सरकारकडून भरीव निधीची तरतूद न करता हेतूपुरस्पररित्या दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे कोरोना या संसर्गजन्य रोगासोबत ग्रामीण भागातील नागरिकांना हिवताप, हत्तीरोग, डेंगी, काविड, गॅस्ट्रो या रोगांचा उद्रेक होऊन मृत्यूला समोरे जावे लागते की काय, असा प्रश्‍न ग्रामीण भागातील जनता करू लागली आहे. या व्यतिरिक्त बैल, शेळी यावर लंपी स्किन रोगाची लागण झाल्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरीवर्ग भयभीत झाला आहे.

अधिक वाचाः कुत्र्याला म्हटले ‘हाडंऽऽऽऽ’, मालकाला वाटली शिवी, आणि मग घडले महाभारत

रिक्त पदांचा घोळ कायम
राज्य शासनाच्या वतीने सन २०१६ यावर्षी आरोग्य विभागातील गट-क आणि 'ड' च्या पदाकरिता आरोग्य सेवकांच्या रिक्त जागा भरण्याकरिता जाहिरात दिली गेली होती. परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना त्यांच्या गुणवत्तेनुसार नियुक्त्या दिल्या गेलेल्या, त्याशिवाय ९० गुण घेणाऱ्या फवारणी कर्मचारी व आरटी वर्कर यांना संपूर्ण महाराष्ट्रात रिक्त असलेल्या जागेवर सामावून घेण्याकरिता तत्कालीन आरोग्यमंत्री व तत्कालीन विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी बैठक घेऊन हा प्रश्न निकालात काढण्याकरिता पाठपुरावा केला होता. तत्कालीन आरोग्यमंत्री व  तत्कालीन विरोधी पक्षनेते हे सध्या महाविकास आघाडीच्या मंत्रीमंडळात मंत्री म्हणून कार्यरत असले तरी हा प्रश्न मंत्रालय स्तरावर अजूनही प्रलंबित आहे.

शासनाने हे करावे-
आरोग्य खात्यातील रिक्त पदे भरत  असताना २०१६ मध्ये ९० गुण घेऊन उत्तीर्ण झालेल्या फवारणी कामगार व आर.टी. वर्कर यांना त्यांना रिक्त असलेल्या जागेवर त्वरित आरोग्यसेवक (पु.) पदावर नियुक्त्या  देऊन ग्रामीण भागात रक्त नमुने गोळा करणे, हिवताप, हत्तीरोगाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता गोळ्यांचे वाटप करणे, पाणी नमुने गोळा करणे, ही कामे आर.टी. वर्कर/ हंगामी फवारणी कर्मचारी व आरोग्य सेवकांकडून करून घ्यावी. त्यासोबतच ग्रामीण भागात राहणाऱ्या नागरिकांचे घर, बैलांचे कोठे पाणी साचून राहात असलेल्या सर्व स्थळांचे निर्जंतुकीकरण करण्याकरिता डी.डी.टी किंवा लॅम्बडा या औषधांची हंगामी फवारणी कर्मचाऱ्यांकडून करून रोजगार उपलब्ध करून द्यावा.
अधिक वाचाः शेवटी ५० हजार रुपये दिल्यानंतरच रुग्णालयाकडून मिळाला कोरोना रुग्णाचा मृतदेह
 

काटोल तालुक्यात डेंगीच्या रुग्णांत वाढ
काटोलः तालुक्यात व शहरात  डेंगीचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणएत दिसून येत आहे. काटोल शहरातील काही भागामध्ये प्रामुख्याने डेंगीचे बालरुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. बऱ्याच रुग्णांना भरती करावे लागत आहे. बरेच रुग्ण डेंगीवर मात करीत असल्याची माहीती  कारांगळे बाल रुग्णालयाचे डॉ.अमोल करांगळे  यांनी दिली.

‘डेंगी’झाल्यास हे करा उपाय-
डेंगी हा संसर्गजन्य आजार नाही. ‘एडीज इजिप्ती’ नावाचा मादी  डास चावल्याने डेंगी होतो. अति ताप, अंगदुखी, डोके दुखणे, मळमळ व उलट्या, अंगावर लालसर पुरळ येणे ही डेंगीची प्रमुख लक्षणे लहान मुलांमध्ये आढळून येतात. अति जास्त ताप, सतत उलट्या, हातपाय थंड पडणे, सुस्तपणा, नाक व तोंडावाटे रक्तस्त्राव ही डेंगीची गंभीर लक्षणे लहान मुलामध्ये आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. कारण यानंतरची पायरी म्हणजे ‘डेंगी शॉक सिंड्रोम’ आहे, अशी माहिती डॉ.अमोल करांगळे यांनी दिली.त्यांनी सांगितले की डेंगीला घाबरण्याचे कारण नाही. फक्त काही उपाय करणे आवश्यक आहे. जसे डासापासून बचाव, सकाळ संध्याकाळ दरवाजे व खिडक्या बंद ठेवणे, घरी व आजूबाजूला, अंगणात खराब भांड्यामध्ये, मडक्यात तसेच कुलरमध्ये पाणी जमा न होऊ देणे त्याच प्रकारे लहान मुलांना हात पाय झाकून राहील असे कपडे वापरणे, हे काही उपाय डॉ.अमोल करांगळे यांनी सांगितले.

संपादनःविजयकुमार राऊत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shocking! In Nagpur district, even these diseases are removed on the head ...