esakal | झाड केले कमी उंच, फळे झाली टंच!
sakal

बोलून बातमी शोधा

simple management technique help to increase orange production

झाडांना मजुरांच्या सहायाने चारही दिशांनी खाली खेचत मध्यभागी जास्त सूर्यप्रकाश पोचेल अशी व्यवस्था केली. यामुळे झाडाच्या मध्यभागातून नवीन फांद्या फुटल्या. या फांद्यांना पुढे जाऊन फळे लागली.

झाड केले कमी उंच, फळे झाली टंच!

sakal_logo
By
प्रशांत राॅय

नागपूर : झाड सरळ वाढतंच चाललंय. फळं बी कमीचं हायेत. इचार केला झाडाच्या मधातून आणखी फांद्या फुटल्या अन्‌ त्याला फळं लागली तर? मनात आल्याबरोबर प्रयोग सुरू केले. निसर्गाची कमालच म्हणा की नंतरच्या हंगामातच मध्यभागातील फांद्यांची संख्या वाढली. त्यांना फळेही लगडली. महत्त्वाचं म्हणजे यासाठी एक पैसाही खर्च झाला नाही, संत्राउत्पादक प्रवीण बेलखेडे आपल्या अनुभवांबद्दल सांगत होते. 

आमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्‍याच्या संत्रापट्ट्यात राहणारे बेलखेडे आधीपासून शेतीबाबत चिकित्सक असून निरीक्षणावर त्यांचा भर आहे. संत्राबागेतील अडचणी, समस्या वाढवून ताण घेण्यापेक्षा त्यावर सरळसोपा मार्ग कसा काढता येईल, यावर त्यांचा भर. काही हंगामापासून उत्पादनात फारशी वाढ होत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. परिणामी उत्पन्नवाढीचा मार्गही खुंटला.

रोज संत्राबागेत जाऊन ते झाडांची, फळांची पाहणी करायचे, निरीक्षण करायचे. रोग नाही, आजार नाही मग उत्पादन न वाढण्याचे काय कारण असावे, या प्रश्‍नाने ते चिंतित होते. असेच एकदा संत्राबागेत मजुरांसमवेत चर्चा करताना त्यांच्या लक्षात आले की, संत्राझाडे उभी वाढतच चालली आहेत. झाडाच्या मध्यभागात पानांचा मोठा घोस असल्यामुळे पुरेसा सूर्यप्रकाश पोचत नाही. मग काय त्यांनी तत्काळ काही झाडांवर प्रयोग करण्याचे ठरविले. यासाठी काही अनुभवी शेतकरी, कृषितज्ज्ञ, जाणकारांसोबत चर्चा केली. त्यानंतर निवडक झाडांची निवड केली. त्यांची उंची मर्यादित ठेवली.

झाडांना मजुरांच्या सहायाने चारही दिशांनी खाली खेचत मध्यभागी जास्त सूर्यप्रकाश पोचेल अशी व्यवस्था केली. यामुळे झाडाच्या मध्यभागातून नवीन फांद्या फुटल्या. या फांद्यांना पुढे जाऊन फळे लागली. अशाप्रकारे एकाच झाडापासून अधिकाधिक उत्पादन मिळवण्याचे त्यांचे प्रयत्न यशस्वी ठरले. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर संचारबंदीमुळे यंदा आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे. परंतु, येत्या हंगामाच्या दृष्टीने बेलखेडे यांनी तयारी सुरू केली असून दर्जेदार संत्राच्या निर्यातीतून विस्कटलेली आर्थिक घडी पुन्हा वसविण्याचा त्यांचा निर्धार आहे. 

बेलखेडे यांची व्यवस्थापन पद्धती 
-झाडाची उंची 12 ते 15 फुटांपर्यंत मर्यादित 
-सूर्यप्रकाश थेट झाड्याच्या मध्यभागी पोचतो 
-मध्यभागात फांद्याची वाढ सुरू होते 
-या फांद्यांना आकर्षक, दर्जेदार फळे लागतात 
-प्रतिझाड फळे वाढल्याने उत्पन्न, उत्पादन वाढते 

उभे राहून हाताने तोडा संत्रा 
काही अन्य पद्धतींच्या अयोग्य काढणीयोग्य पद्धती ज्यामुळे फांद्या, फळे आणि पानांना इजा होते ती टाळता येते. झाडावर काही रोग, आजार, कीटक, कृमी आहे की नाही, हे नियमित निरीक्षणातून दिसून येते. विशेष म्हणजे झाडांची उंची 12 ते 15 फुटांपर्यंत आणल्याने मजुरांना उभे राहूनच फळे तोडणी करता येतात. 

दलालांच्या जुगाडाने विनानोंदणी कापूस गाड्यांची खरेदी, नोंदणी केलेले शेतकरी वेटिंगवरच

शेतकरी खरे संशोधक 
शेती करताना येणाऱ्या अडचणी, समस्या यांचा विचार करून त्यावर उपाययोजना करणारे शेतकरी हेच खरे संशोधक, शास्त्रज्ञ आहेत. शेतीमध्ये लहान वाटणाऱ्या बाबींतून मोठे परिणामकारक बदल घडवता येतात. गरज आहे ती फक्त निरीक्षणाची, उपाययोजनांबाबत योग्य विचार करण्याची. 
-प्रवीण बेलखेडे, संत्रा उत्पादक 

फांद्यांसह फळसंख्येत वाढ 
ट्रेनिंग, प्रुनिंगपेक्षा ही पद्धत वेगळी आहे. मुळात झाडाच्या मध्यभागी भरपूर सूर्यप्रकाश पोचता करून तेथील फांद्या व फळांची संख्या वाढविणे हा या मागचा हेतू आहे. यासाठी अतिरिक्त खर्च येत नाही. घरातील सदस्य किंवा मजुरांच्या माध्यमातून ही पद्धती यशस्वी करता येते. 
-आर. एम. वासनकर, कृषी अधिकारी