*सकाळ इम्पॅक्ट! तब्बल २२ किमी पायपीट करणाऱ्या सुनीलला सायकल भेट; मदतीसाठी सरसावले अनेक हात*

नरेंद्र चोरे
Saturday, 10 October 2020

सुनीलची कहाणी दैनिक 'सकाळ'ने शुक्रवारच्या अंकात ठळकपणे प्रसिद्ध केल्यानंतर अनेकांनी त्याच्यासाठी मदतीचा हात पुढे केला. 'सकाळ'मधील वृत्त वाचून नागपूर क्रीडा पत्रकार संघटनेच्या (एसजेएएन) पदाधिकाऱ्यांनी सुनीलला सायकलच्या दुकानात नेऊन त्यास नवी कोरी सायकल भेट दिली. याशिवाय लकडगंज पोलिस ठाण्याचे ठाणेदार नरेंद्र हिवरे यांनीही त्याला दोन महिन्यांचे राशन देण्याचा निर्णय घेतला.

नागपूर : दररोज पाच तास आणि तब्बल २२ किमीची पायपीट करून रात्रपाळी ड्युटी करणारा गरीब सुरक्षारक्षक सुनील ठाकूर याच्या मदतीसाठी असंख्य हात सरसावले आहेत. कुणी सायकल भेट दिली, तर कुणी आर्थिक व धान्याच्या स्वरूपात मदत करून सामाजिक बांधिलकीचा परिचय दिला. 
बेसा येथे राहणारा ४५ वर्षीय सुनील धंतोलीच्या एका कार्यालयात सुरक्षारक्षक म्हणून काम करतो. सुनीलजवळ सायकल नसल्यामुळे तो रोज बेसा ते धंतोली हे २२ किलोमीटर अंतर पायी चालतो. गेल्या चार-पाच महिन्यांपासून त्याचा हा नित्यक्रम ऊन-पावसातही सुरूच आहे. पगार जेमतेमच असल्यामुळे इच्छा असूनही तो सायकल घेऊ शकत नव्हता. त्यामुळे ड्युटी करण्यासाठी पायपीट करणे, हा एकमेव पर्याय त्याच्यासमोर होता. स्वाभिमानी बाणा असलेल्या सुनीलने आपल्या परिस्थितीचा गवगवा केला नाही. शिवाय सायकलीसाठी कुणापुढेही हातही पसरले नाही. उल्लेखनीय म्हणजे ड्युटीवर येताना तो रस्त्यावरच्या बॉटल्स, प्लास्टिक व रद्दी उचलून आणतो. त्यातून मिळणाऱ्या पैशात चहापाणी व नाश्ता करतो. बारा तासांची ड्युटी आणि २२ किमीचा मॅरेथॉन प्रवास करून प्रचंड थकवा जाणवतो, घामाघूम होतो. तरीही आराम न करता तो दुसऱ्या दिवशी पुन्हा नव्या दमाने कर्तव्यावर हजर होतो. 

 

हेही वाचा : कसे मिळणार अल्प मानधनात चांगले प्रशिक्षक? 
 

सुनीलची कहाणी दैनिक 'सकाळ'ने शुक्रवारच्या अंकात ठळकपणे प्रसिद्ध केल्यानंतर अनेकांनी त्याच्यासाठी मदतीचा हात पुढे केला. 'सकाळ'मधील वृत्त वाचून नागपूर क्रीडा पत्रकार संघटनेच्या (एसजेएएन) पदाधिकाऱ्यांनी सुनीलला सायकलच्या दुकानात नेऊन त्यास नवी कोरी सायकल भेट दिली. याशिवाय लकडगंज पोलिस ठाण्याचे ठाणेदार नरेंद्र हिवरे यांनीही त्याला दोन महिन्यांचे राशन देण्याचा निर्णय घेतला. तसेच आवश्यकता असल्यास नोकरीचीही ऑफर दिली. सामाजिक कार्यकर्त्या अमृता अडावदे, नंदनवन येथील 'सकाळ'च्या वाचक ज्योती वांढरे, डॉ. हितेंद्र मैंद, दृष्टी कम्युनिकेशन्सचे संजय चिंचोळे, कृष्णदेव सोनी यांच्यासह अनेकांनी 'सकाळ' कार्यालयात फोन करून सुनीलच्या मदतीसाठी हात पुढे केला. वृत्त प्रकाशित केल्याबद्दल सुनीलने 'सकाळ'सह मदत करणाऱ्यांनाही धन्यवाद दिले.  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: SJAN Gifted Bicycle to Security Guard