दिलासा! पांढराबोडीतील प्रतिबंध काही प्रमाणात हटविले

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 मे 2020

नेल्सन मंडेला हॉस्टेल, मद्रासी मंदिर चौक, बाजीप्रभू चौक जलकुंभ, हिलटॉप पब्लिक स्कूल, ओम सेल्स कार्पोरेशन, अंबाझरी गार्डन चौक, कॅम्पस कंपाउंड या परिसरातील प्रतिबंध हटविण्यात आले.

नागपूर : पांढराबोडी येथील काही भागातील निर्बंध हटवून आयुक्तांनी नागरिकांना दिलासा दिला. गणेशपेठ हुडको क्वार्टर्स, कुशीनगर परिसरातही निर्बंध हटविण्यात आले. 

पांढराबोडीतील प्रतिबंध हटविण्यासाठी आमदार विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात नागरिकांनी आंदोलन केले. ठाकरे यांनी आयुक्त मुंढे यांच्याविरोधात मुख्यमंत्र्यांकडे तक्रारही केली. अखेर या भागातील काही नागरिकांना आज आयुक्तांनी दिलासा दिला.

शेतीविषयक मार्गदर्शनाचा नवा फंडा! घुमवा एक फोन आणि विचारा शंका

धरमपेठ झोनअंतर्गत सुदामनगरी, पांढराबोडी परिसरातील काही भागातील निर्बंध आयुक्तांना हटविले. नेल्सन मंडेला हॉस्टेल, मद्रासी मंदिर चौक, बाजीप्रभू चौक जलकुंभ, हिलटॉप पब्लिक स्कूल, ओम सेल्स कार्पोरेशन, अंबाझरी गार्डन चौक, कॅम्पस कंपाउंड या परिसरातील प्रतिबंध हटविण्यात आले.

मात्र, पांढराबोडी पोलिस चौकी, शिवसेनेचे कार्यालय, संजयनगर कॅम्पस रोड, कॅम्पस रोड, सुदामनगर सार्वजनिक शौचालय, मुंजेबाबा आश्रम ले-आउट, जयनगर पांढराबोडी हा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून कायम ठेवण्यात आला आहे. धंतोली झोनअंतर्गत प्रभाग 17 मधील गणेशपेठ हुडको क्वार्टर्स येथील रुग्णाचा दुसरा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला. त्यामुळे या परिसरातील प्रतिबंध मागे घेण्यात आले.

मंगळवारी झोनमधील प्रभाग एकमधील कुशीनगर येथील कोरोनाबाधित रुग्णाचा दुसरा चाचणी अहवाल निगेटिव्ह आढळून आला. त्यामुळे या भागातील बोदले यांचे घर, फर्निचर गोदाम, विष्णू ढोणे यांचे घर, कापसे क्‍लिनिक, वीरेंद्र वर्मा यांचे घर, कविता शाहू यांचे घर, या परिसरातील निर्बंध हटविण्यात आले. परंतु, मुन्नारे यांचे घर, नरेश तुमाने यांचे घर, सहदेव धमगाये व हेमराज बडोले यांच्या घरापर्यंतच्या भागात प्रतिबंध कायम आहे. 

हावरापेठ परिसर सील 
धंतोली झोनअंतर्गत प्रभाग 33 मधील हावरापेठ परिसरात बुधवारी कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला. त्यामुळे आयुक्तांनी हावरापेठ परिसरातील काही भाग सील करण्याचे आज आदेश काढले. उत्तर-पश्‍चिमेस मधुकर तळवेकर यांचे घर, रमेश मेहर यांचे घर, ओमप्रकाश भक्ते यांचे घर, साई संकल्प इमारत या संपूर्ण परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Some restrictions removed;Consolation to Pandharabodi citizens