कुणीतरी विचारा त्यांना! रस्ते, नाल्या बांधकामाचा दर्जा काय?

अमर मोकाशी
Sunday, 25 October 2020

दिवाळी जवळ असल्याने कामांची देयके मिळविण्यासाठी घाई गडबडीने कामे उरकण्याचा कंत्राटदारांचा प्रयत्न आहे.  हे करीत असताना बांधकामाच्या गुणवत्तेला मात्र तिलांजली दिली जात आहे.

भिवापूर (जि.नागपूर): शहरातील विविध वार्डांत  रस्ते व नाल्यांची कोट्यावधींची बांधकामे सुरू आहेत. या कामांच्या गुणवत्तेबाबत नागरिकांची ओरड आहे. परंतु 'कमिशनवर' बारीक नजर ठेवणाऱ्या नगर पंचायत प्रशासनाला  कामांच्या गुणवत्तेकडे लक्ष द्यायला वेळ नाही. शहरातील काही मोजके वार्ड सोडल्यास बहुतांश वार्डांत सिमेंट रस्ते व भूमिगत नाल्यांची बांधकामे युद्धस्तरावर सुरू आहेत.

कर्मचारी कामांकडे फिरकून बघत नाहीत
दिवाळी जवळ असल्याने कामांची देयके मिळविण्यासाठी घाई गडबडीने कामे उरकण्याचा कंत्राटदारांचा प्रयत्न आहे.  हे करीत असताना बांधकामाच्या गुणवत्तेला मात्र तिलांजली दिली जात आहे. बांधकामाच्या निश्चित केलेल्या प्राकलनांना केराची टोपली दाखवीत कमी पैशात काम पूर्ण करुन अधिकाधिक नफा कमविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. यात त्यांना नगर पंचायत प्रशासनाकडून पुरेपूर मदत मिळताना दिसते. नगर पंचायतचे अधिकारी अथवा कर्मचारी या कामांकडे फिरकून बघत नाहीत. कामांची गुणवत्ता, त्यात वापरले जाणारे सिमेंट, गिट्टी, वाळू, लोखंड, नालीत टाकावयाच्या सिमेंट पायल्या आदींचा दर्जा व प्रमाण याकडे नगर पंचायत प्रशासनाचे लक्ष नाही. त्यामुळे कंत्राटदारांची ‘चांदी’ आहे. कामांची प्राकलने तयार करणे, प्रत्यक्ष कामे सुरू असताना त्यावर देखरेख ठेवणे, पूर्ण झालेल्या कामांचे ‘एमबी’ तयार करणे. यासाठी प्रशासनाकडून नागपूर  येथील एका खासगी एजंसीची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याकरीता त्या एजंसीला मोठी रक्कम देण्यात येते. परंतु नगर पंचायतकडून करावयाच्या कामांची केवळ प्राकलने तयार करण्याव्यतिरिक्त इतर कामे या एजंसीकडून होताना दिसत नाहीत.

अधिक वाचाः पुजारी, साहित्यविक्री करणारे हताशपणे म्हणतात, विठ्ठलाऽऽऽ ! कोणता ‘धंदा’ करू पोटासाठी?
 

सिमेंट, वाळू व गिट्टीचा मेळ जुळेना !
प्राकलनानुसार रस्त्यांचे काँक्रेटिंग करताना ते एम ३० च्या रेशोत व्हायला हवे. एक बॅग सिमेंट मागे तीन ते चार घमेले वाळू व सहा ते सात घमेले गिट्टी असे प्रमाण असायला पाहिजे. परंतु येथे एक बॅग सिमेंटमध्ये १२ ते १४ घमेले गिट्टी तर १० ते १२ घमेले वाळूचा सर्रास वापर बघायला मिळतो. काँक्रेटिंगचे काम सुरू असताना कुणी बाहेरील व्यक्ती पाहणीकरीता आलीच तर, या प्रमाणात बदल करुन ते ८ घमेले गिट्टी व ६ घमेले वाळू असे करण्यात येते. कंत्राटदाराकडून मजुरांना तशा सुचना आधीच दिलेल्या असतात. वार्ड क्रमांक १० व ४ मध्ये रस्त्यांचे काँक्रेटिंग सुरू असताना याच फंड्याचा वापर केला गेला. या ठिकाणी बांधकामात माती मिश्रीत गिट्टीची उपयोग होत असल्याचेही आढळून आले.

नाल्या बांधकामाची गुणवत्ता?
  नाली बांधकाम करताना किमान दोन ते तीन फुट नाली खोदून झाल्यावर जीएसबीचे पक्के काम करायला हवे. त्यानंतर त्याची व्यवस्थित दबाई करून सिमेंट पायल्या टाकल्या जातात. येथे मात्र वेगळेच चित्र आहे. एक ते दीड फुट नाली खोदली की त्यात एक ते दीड इंचापर्यंत जीएसबीचे काम केले जाते. त्याची व्यवस्थित दबाई न करताच त्यावर सिमेंट पायल्या ठेवल्या जातात. काही ठिकाणी तर जिएसबीचे काम न करताच पायल्या टाकल्या जात आहेत. वार्ड क्रमांक १७ मध्ये अनेक ठिकाणी हा प्रकार दिसून आला. वार्ड क्रमांक १० व ४ मध्ये नाली बांधकामाची पाहणी केली असता अनेक ठिकाणी रस्ता खाली व सिमेंट पायल्या वर असे दृश्य आढळून आले.

अधिक वाचाः  तुझ्या दर्शनाला देवा, झालो मी अधीर ! भाविकांची आर्त हाक
 

 अभियंत्यांची सारवासारव
   रस्ते व नाल्यांच्या बांधकामात सुरु असलेल्या  गैरप्रकाराबाबत, विशेषतः वार्ड क्रमांक ४, १० च १७ मधील कामांबाबत नगर पंचायतचे बांधकाम अभियंता जगदिश पटेल यांच्याकडे विचारणा केली असता, गैरप्रकार करणाऱ्या कंत्राटदाराविरुद्ध कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले. बांधकामाविषयी नागरिकांनी यापूर्वी नगर पंचायतकडे  अनेकदा  तक्रारी केल्या आहेत. याकडे लक्ष वेधून, त्यावर काय कारवाई केली गेली, असा प्रश्‍न उपस्थित केला असता, अभियंता पटेल उत्तर देऊ शकले नाही.

संपादनःविजयकुमार राऊत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Someone ask them! What is the quality of construction of roads and nallas?