लॉकडाउन उघडताच सिताबर्डीत खरेदीसाठी झुंबड

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 जून 2020

टाळेबंदीमुळे शहरातील सर्वच दुकाने बंद होती. "अनलॉक-1'ची नियमावली जाहीर झाली. शुक्रवारपासून बाजारपेठ सुरू झाली असताना सोमवारी सलग चौथ्या दिवशी बाजारातील रौनक हळूहळू परतत आहे. ग्राहकांनी येथे खरेदीसाठी गर्दी केल्याचे दिसत होते.

नागपूर:  तब्बल अडीच महिन्यांच्या टाळेबंदीनंतर "अनलॉक-3'मध्ये खासगी कार्यालय सुरू झाल्यामुळे "वर्क फॉर्म होम' करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी कार्यालयासह बाजारातही खरेदीसाठी गर्दी केली होती. दरम्यान, अत्यावश्‍यक वस्तू खरेदीकडे सर्वांचा अधिक कल असल्याचे चित्र दिसले. सम-विषम तारखेला सुरू करण्याच्या आदेशानुसार आज पूर्व आणि दक्षिण मुखी बाजारपेठा, दुकाने उघडी होती. सरकारच्या सूचनेनूसार शोरूममध्ये विना मास्क ग्राहकांना दुकानात प्रवेश दिला जात नव्हता. तसेच सॅनिटायझेशन, थर्मोमीटर व हॅण्डग्लोजची सोयही केली आहे.

टाळेबंदीमुळे शहरातील सर्वच दुकाने बंद होती. "अनलॉक-1'ची नियमावली जाहीर झाली. शुक्रवारपासून बाजारपेठ सुरू झाली असताना सोमवारी सलग चौथ्या दिवशी बाजारातील रौनक हळूहळू परतत आहे. ग्राहकांनी येथे खरेदीसाठी गर्दी केल्याचे दिसत होते. सायंकाळी पाचनंतर दुकाने सुरू ठेवू नयेत, असे आदेश असले तरी काही दुकानदारांनी नियमांची पायमल्ली करीत दुकाने सुरू ठेवली होती.

वाचा- महिलांनो कोरोनाला घाबरताय, जाणून घ्या बचावासाठी काही टिप्स

फॅशन आणि नव्या ट्रेंडची झलक दाखवणारी रेडिमेड गारमेंटची दालनेसुद्धा खुलली आहेत. दुकानात कामगार वर्ग परतला असून, साफसफाई तसेच "डिस्प्ले'साठी लावण्यात आले होते. तयार कपड्यांच्या दुकानांमध्ये व्यावसायिकांनी सजावटीला भर दिला. नागपूर विदर्भातीलच नव्हे, तर मध्य प्रदेशासाठीही महत्त्वाची बाजारपेठ असले तरी अद्याप बाजारात हवी तशी वर्दळ नव्हती. लवकरच नव्या जोमाने बाजारपेठेत उत्साह संचारेल, असा विश्‍वास व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.
लॉकडाउन सुरु असला, तरी नवीन शैक्षणिक वर्ष लवकरच सुरू होणार आहे.

सर्वसाधारणपणे जून महिन्यात राज्यात शाळा सुरू होतात. यंदा मात्र सरकारने त्याबाबत घोषणा केलेली नाही. मात्र, अनलॉक-1मध्ये शालेय वस्तूंची विक्री करणाऱ्या व्यावसायिकांना दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार शहरात स्टेशनरीची दुकाने सुरू होताच ग्राहकांनी शालेय साहित्य खरेदीस सुरुवात केली आहे. पावसाळ्यात वापरल्या जाणाऱ्या चपला खरेदीसाठी ग्राहकांचा कल दिसला. किमान पावसाळ्यात चांगला व्यवसाय होऊन नुकसान भरून निघेल, असा आशावाद व्यावसायिक व्यक्त करत होते.

कोरोनाची हळूहळू भीती कमी होऊ लागल्याने ग्राहकांनी बाजारात खरेदीसाठी गर्दी करणे सुरू केले आहे. त्यामुळे तब्बल अडीच महिन्यांनंतर आज बाजारात चैतन्य दिसले. हळूहळू बाजार पूर्वपदावर येईल.
-अश्‍विन मेहाडिया, अध्यक्ष, नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: As soon as the lockdown opens, there is a rush for shopping in Sitabardi