शाळा नव्हे, शिक्षण सुरू करा ; आयुक्त मुंढे यांचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 जून 2020

तुकाराम मुंढे यांनी शहरातील खासगी शाळा संचालक, सचिव व मुख्याध्यापकांशी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. शहरातील सुमारे एक हजार शाळांच्या प्रतिनिधींनी आयुक्तांसोबत चर्चेत सहभाग घेतला. या वेळी आयुक्तांनी शाळांच्या प्रतिनिधींना विशेष "टिप्स' दिल्या. सर्व शाळांनी येत्या 26 जूनला शाळा व्यवस्थापन समितीची सभा घेण्याचे निर्देश दिले.

नागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शाळा सुरू करणे धोक्‍याचे ठरेल. कोरोनाच्या काळात विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी ऑनलाइन शिक्षण सुरू करावे. मात्र, शाळा सुरू करण्यास परवानगी नाही, असे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज स्पष्ट केले. शाळांनी पालकांना एकाच वेळेस शुल्क भरण्यास सक्ती न करता त्यांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून टप्प्याटप्प्याने शुल्क वसूल करावे, अशा सूचना केल्या.

नवीन शैक्षणिक सत्र सुरू करण्यापूर्वी शाळांद्वारे करावयाच्या तयारीसंदर्भात आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहरातील खासगी शाळा संचालक, सचिव व मुख्याध्यापकांशी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. शहरातील सुमारे एक हजार शाळांच्या प्रतिनिधींनी आयुक्तांसोबत चर्चेत सहभाग घेतला. या वेळी आयुक्तांनी शाळांच्या प्रतिनिधींना विशेष "टिप्स' दिल्या. सर्व शाळांनी येत्या 26 जूनला शाळा व्यवस्थापन समितीची सभा घेण्याचे निर्देश दिले. शाळा सुरू करण्यापूर्वी प्रत्येक वर्गखोली, प्रसाधनगृह, दारे, खिडक्‍या सर्वांचे निर्जंतुकीकरण करावे. स्वच्छता, हात धुणे, मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंगबाबत विद्यार्थ्यांना व पालकांना माहिती द्यावी, असे ते म्हणाले.

वाचा- नागपुरात एकाच दिवशी रुग्ण बरे होण्याचा उच्चांक; एवढ्या जणांनी केली कोरोनावर मात

25 टक्के विद्यार्थ्यांकडे मोबाईल नाही

पहिली ते पाचवीपर्यंतच्या 54 टक्‍के विद्यार्थ्यांकडे ऍण्ड्रॉइड मोबाईल व सेट टॉप बॉक्‍सची व्यवस्था आहे. 22.41 टक्‍के विद्यार्थ्यांकडे दोन्ही व्यवस्था नाहीत. इयत्ता सहावी ते आठवीच्या 65 टक्‍के विद्यार्थ्यांकडे दोन्ही व्यवस्था आहेत. तर, 32 टक्‍के विद्यार्थी वंचित आहेत. माध्यमिक गटात इयत्ता नववी ते बारावीच्या 72 टक्‍के विद्यार्थ्यांकडे दोन्ही सुविधा आहेत. तर, 21.37 टक्‍के विद्यार्थ्यांकडे नाहीत, असे सर्वेक्षणातून पुढे आले.

स्वयंसेवी संस्थांची मदत घेणार

प्रत्येक शाळेमधील ज्या विद्यार्थ्यांकडे ऑनलाइन शिक्षणाची सुविधा उपलब्ध नाही, त्यांना शिक्षणाशी जोडण्याचे आवाहन आहे. इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे हे अत्यंत महत्त्वाचे वर्ष आहे. या विद्यार्थ्यांसह इतरही विद्यार्थ्यांना ऑनलाइन व इतर पद्धतीने शिक्षण देण्यासाठी स्वयंसेवी संस्था व स्वयंसेवकांचे सहकार्य घेण्याबाबत प्रयत्न सुरू आहे, असेही आयुक्तांनी सांगितले.

महत्त्वाचे मुद्दे
-शाळा सुरू करावी लागली तर एका वर्गात 20पेक्षा जास्त विद्यार्थी नसावेत.
-जास्त वर्गखोल्या नसतील तर सम-विषम तारखांना एकेका वर्गाला शाळेत बोलवावे.
-दहावी, बारावीचे वर्ग जुलै, सहावी ते आठवीचे वर्ग ऑगस्ट तर तिसरी ते पाचवीचे वर्ग सप्टेंबरमध्ये सुरू होतील.
-शाळा दररोज सॅनिटाइज्ड करणे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: start education not Schools ; Says Tukaram Mundhe