बापरे हे काय... टेलर मोहल्यातील संसारच फाटलेय, जाणून घ्या संपूर्ण वास्तव

A time of famine on two hundred poor families due to corona
A time of famine on two hundred poor families due to corona

नागपूर  : इंग्रजांच्या काळात वसलेल्या व टेलर मोहल्ला म्हणून प्रसिद्ध असलेल्या छावणी (सदर) भागात कित्येक वर्षांपासून अनेक गोरगरीब परिवार दिवसरात्र मेहनत करून आपले पोट भरतात. रेडिमेडच्या जमान्यात आधीच संकटात सापडलेल्या टेलरिंग व्यवसायाला कोरोनाने चांगलाच मार दिला. तीन- चार महिन्यांच्या लॉकडाउनने धंदा ठप्प झाला असून, अनेक परिवारांवर उपासमारीची वेळ आणली आहे.

दीड-दोनशे वर्षांपूर्वी इंग्रजांच्या काळापासून छावणी परिसरातील अनेक परिवार परंपरागत व्यवसाय करून आपापले पोट भरत आहेत. पुरुष मंडळीच नव्हे, महिलाही या व्यवसायात सक्रीय आहेत. दिवसभर घाम गाळल्यानंतर मोठ्या मुश्किलीने शे-पाचशेची कमाई होते. सर्व काही ठिकठाक सुरू असताना अचानक कोरोना आला. सोबतच संकटंही घेऊन आला. ऐन लग्नसराईच्या तोंडावर लॉकडाउन लागल्याने तीन-चार महिने खूपच कठीण गेल्याचे गेल्या पाच दशकांपासून व्यवसाय करणारे छत्री समाज क्रेडिट को. ऑप. सोसायटीचे अध्यक्ष सुरेश सिंगुवार यांनी सांगितले.

अनेक जण कर्जात बुडाले

समाजबांधवांच्या व्यथा मांडताना सिंगुरवार म्हणाले, लॉकडाउन लागल्यापासून आमची परिस्थिती खूपच खराब आहे. या काळात एका पैशाचीही कमाई न झाल्याने सारेच जण आर्थिक अडचणीत आहेत. जवळच्या जमापुंजीवर आतापर्यंत कसेबसे दिवस ढकलले. मात्र किराया, किराणा, भाजीपाला, इलेक्ट्रिक बिल, टॅक्स भरताना अनेकांची फरफट होत आहे. बहुतांश परिवार अर्थिकदृष्टया कमकुवत असून, कुणाकडेही बँक बॅलन्स नाही. अनेक जण कर्जात बुडाले आहेत.

सरकारकडून मदतीची अपेक्षा


 "रोज कमवा आणि रोज खा'' अशी सर्वांचीच अवस्था आहे. या कठीण काळात समाजातील काही सधन व्यक्ती व राजकीय पक्षांनी आर्थिक व पैशाच्या स्वरूपात थोडीफार मदत केली. खरं तर आम्हाला सरकारकडून मदतीची अधिक अपेक्षा होती. आम्ही आमदार, खासदार व शासकीय अधिकाऱ्यांना निवेदने देऊन अनुदानाची मागणी केली. दुर्दैवाने कुणीही आमच्या भावना जाणून घेतल्या नसल्याची खंत सुरेश सिंगुवार यांनी व्यक्त केली.
 

रेडिमेडमुळे व्यवसाय डबघाईस


सिंगुवार म्हणाले, फॅशन अन रेडिमेडचा जमाना आल्यापासून आमचा व्यवसाय पूर्णपणे डबघाईस आलेला आहे. ग्राहक नसल्यामुळे कामे कमी झाली आहेत. एखाद दुसराच ग्राहक येतो. केवळ लग्नसराई आणि दिवाळीच्या काळातच बऱ्यापैकी कमाई होते. कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता, यंदाच्या दिवाळीवरही संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे शासनाने आर्थिक मदत देऊन समाजबांधवांना दिलासा द्यावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

 
युवापिढी द्विधा मनःस्थितीत


शिंपी समाजात मुळात शिक्षणाचा अभाव आहे. केवळ पाच ते दहा टक्केच मुले उच्च शिक्षित आहेत. शिक्षण कमी असल्यामुळे
त्यांच्या मुलांना परंपरागत व्यवसाय करण्याशिवाय दुसरा पर्याय उपलब्ध नाही. पण मायबापांची दयनीय अवस्था पाहून ते चिंतीतही आहेत. वारसा चालवायची की नाही, या द्विधा मनःस्थितीत ही मुले आयुष्य जगताहेत. 

संपादन : अतुल मांगे  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com