बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या बारा वर्षीय पीडितेचे अर्भक उपचारादरम्यान दगावले

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 16 April 2020

गेल्या आठवड्यात अहवाल सादर केला व मुलीचे बाळ जिवंत जन्माला येऊ शकते असे सांगितले. त्यामुळे न्यायालयाने अशा बाळांच्या संगोपनासाठी काय योजना आहे अशी विचारणा सरकारला करून 15 एप्रिलपर्यंत उत्तर मागितले होते. 

नागपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील अल्पवयीन पीडितेचे अर्भक उपचारा दरम्यान मरण पावल्याची माहिती राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली आहे. मैत्रिणीच्या वडिलांनी केलेल्या अत्याचारातून गर्भवती झाल्याने पीडितेने गर्भपात करण्याची परवानगी मिळावी म्हणून नागपूर खंडपीठामध्ये फौजदारी जनहित याचिका दाखल केली होती. 

याचिकेनुसार, पीडित मुलगी चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्‍यातील शेगाव येथील रहिवासी आहे. आरोपी योगेश रामचंद्र दोहतारे याने तिच्यावर बलात्कार केला. त्यामुळे तिला गर्भधारणा झाली असा आरोप आहे. यासंदर्भात 14 मार्च 2020 रोजी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली होती. त्यावेळी ती 23 आठवड्यांची गर्भवती होती.

जाणून घ्या - Video : लॉकडाऊनमध्ये ऑन ड्युटी असलेल्या पीएसआयला मिळाले हे गोड सरप्राईज...

उच्च न्यायालयाने मुलीची तपासणी व अहवाल सादर करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्‍टरांचे मंडळ स्थापन केले होते. त्या मंडळाने मुलीची तपासणी करून गेल्या आठवड्यात अहवाल सादर केला व मुलीचे बाळ जिवंत जन्माला येऊ शकते असे सांगितले. त्यामुळे न्यायालयाने अशा बाळांच्या संगोपनासाठी काय योजना आहे अशी विचारणा सरकारला करून 15 एप्रिलपर्यंत उत्तर मागितले होते. 

दरम्यान, 12 वर्षीय पीडितेची प्रकृती अचानक ढासळल्याने डॉक्‍टरांना अर्भक बाहेर काढण्याची वेळ आली. मुलीची प्रकृती खालावल्यामुळे डॉक्‍टरांना न्यायालयाच्या परवानगीशिवाय अर्भक बाहेर काढावे लागले. यातच अर्भकाचा मृत्यू झाल्याचे सरकारतर्फे न्यायालयाला सांगण्यात आले. न्यायालयाने राज्य सरकारला या घडामोडीवर प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचा आदेश दिला आहे. पीडित मुलीतर्फे ऍड. स्वीटी भाटिया तर सरकारतर्फे ऍड. नितीन राव यांनी कामकाज पाहिले. या प्रकरणावर न्यायमूर्ती विनय जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. 

मागच्या सुनावतीन उपस्थित केली होती शंका

मागील सुनावणीत चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या अधिष्ठातांच्या अध्यक्षतेखाली पाच तज्ज्ञ डॉक्‍टरांची समिती स्थापन करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. समितीने अहवाल दाखल करीत गर्भपात करण्यासाठी उपयोग करण्यात येणाऱ्या औषधांची माहिती न्यायालयाला दिली. मात्र, गर्भधारणा होऊन साडेपाच महिन्यांचा काळ लोटल्याने गर्भपात करण्याची प्रक्रिया अयशस्वी ठरू शकते. त्यामुळे पूर्ण वाढ न झालेले जिवंत अर्भक जन्मण्याची शक्‍यता नाकारता येत नाही, असे नमूद केले.

सविस्तर वाचा - शेतीत पेरला गहू अन्‌ हाती आले जिरे!

पीडितेची याचिकेतून विनंती

वहानगाव (ता. चिमूर, जि. चंद्रपूर) येथील बारा वर्षीय मुलगी पोटदुखत असल्याने 13 मार्च रोजी उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात आईसोबत गेली. डॉक्‍टरांच्या तपासणीत मुलगी पाच महिन्यांची गर्भवती असल्याचे निदर्शनास आले. पोलिस तपासात तिच्याच मैत्रिणीच्या बापाने हे कृत्य केल्याचे उघड झाले होते. त्यानुसार शेगाव (जि. चंद्रपूर) पोलिसांनी 14 मार्च रोजी आरोपी योगेश रामचंद्र दोहतरे (40, रा. वहानगाव) विरोधात कलम 376, 506 आणि पोक्‍सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करीत अटक केली. तर तीन एप्रिल रोजी पीडितेने नागपूर खंडपीठामध्ये फौजदारी जनहित याचिका दाखल करीत गर्भपात करण्याची परवानगी देण्याची विनंती न्यायालयाला केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The state government said the boy had died