गर्लफ्रेंडवर पैसे उडविण्यासाठी अवलंबला वाममार्ग, पोलिसांनी सापळा रचला आणि... 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 जून 2020

आरोपी इमरान पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्या विरुद्ध अनेक गुन्हे दाखल आहेत. तो अविवाहित असून जुगार आणि नशेच्या अधीन आहे, तर शेख शहजाद स्टील रॉडचे काम करतो.

नागपूर : गर्लफ्रेंडवर पैसे उडविण्यासाठी आणि दारूच्या पार्ट्या करण्यासाठी दोन युवकांनी थेट चोरी-घरफोडी करण्यास सुरुवात केली. चोरीच्या पैशातून मौजमस्ती करीत पुन्हा सावज शोधण्याच्या गोरखधंदा दोघांनीही सुरू केला. मात्र, यशोधरानगर पोलिसांनी दोघांनाही सापळा रचून अटक केली. शेख शहजाद अहमद शेख युसूफ (28), इमरान खान ऊर्फ सोनू दिलावर खान (24) दोन्ही रा. शिवनगर अशी अटक केलेल्या वाहन चोरांची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून मोटारसायकल जप्त केल्या. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाहुणे ले-आऊट येथे राहणारे संदीप बन्सोड (32) यांनी 27 मे 2020 च्या रात्री आपली मोटारसायकल घरासमोर पार्क करून ठेवली होती. अज्ञात चोरट्यांनी त्यांची मोटारसायकल चोरून नेली. याप्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून यशोधरानगर ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. 

अधिक माहितीसाठी - नागपूरच्या या 'लेडी डॉन'ने केली अनेक पोलिस अधिकाऱ्यांची "शिकार"

सदर गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि डम्प मोबाईल डाटासह कौशल्याचा वापर करीत माहिती काढली असता आरोपी शेख शहजाद चोरीच्या वाहनावर फिरत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी विटा भट्टी चौकाजवळ सापळा रचून त्यास पकडले. त्याच्याकडून मोटारसायकल जप्त करण्यात आली. शेख शहजादने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी आरोपी इमरान खानलाही अटक केली. दोघांनीही मिळून चोरी केलेले वाहन जप्त केले. 

यातील आरोपी इमरान पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्या विरुद्ध अनेक गुन्हे दाखल आहेत. तो अविवाहित असून जुगार आणि नशेच्या अधीन आहे, तर शेख शहजाद स्टील रॉडचे काम करतो. दोघेही एकाच वस्तीतील असल्याने त्यांच्यात चांगली ओळख आहे. त्याच्या जवळ वाहन नसल्याने तो इमरान सोबत फिरायचा. मौजमस्ती करण्यासाठी आणि गर्लफ्रेंडच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ते दोघेही चोरी करायचे.

मात्र, पोलिसांनी रचलेल्या जाळ्यात दोघेही अडकले. ही कारवाई पोलिस उपआयुक्त निलोत्पल, वरिष्ठ पोलिस निरीक्षक दीपक साखरे, पोलिस निरीक्षक एन. एन. मोहिते यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक एस. एस. दराडे, सहायक फौजदार विनोद सोलव, पोहवा संजय पिल्ले, अक्षय सरोदे, पोना महेश बावणे आणि नरेश मोडक यांनी केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Stealing to have fun with girlfriends