
नागपूर : शहरातील लॉकडाऊन आपण पूर्णतः काढलेले नाही, तर शिथिल केले आहे. लोक त्याचा गैरफायदा घेत आहेत. बाजाराचा फेरफटका मारला असता अनेक बाबी अशा दिसल्या की त्या व्हायला नको. बाधितांची संख्या वाढली आणि सोबतच मृत्युदरही वाढत आहे. दुकानांमधील आणि रस्त्यांवरील वाढती गर्दी पाहूनच मी स्वतः रस्त्यावर उतरलो आणि दंड ठोठावण्याची कारवाई केली. आपल्या समोरचा प्रत्येक व्यक्ती कोरोनाबाधित आहे, असे समजून वागण्याची आज गरज आहे. लोकांनी आताही वागणुकीत बदल केला नाही, तर नाइलाजाने लॉकडाऊन लावावे लागेल आणि तेसुद्धा संचारबंदीसह, असा कडक इशारा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज दिला.
मुंढे म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर जी स्थिती होती, ती आज दिसत नाही. मिशन बिगिन अगेन तीन जूनला सुरू झाले. यानंतरची कोरोनाबाधित आणि मरणाऱ्यांची संख्या आणि यापूर्वीची बाधितांची आणि मरणाऱ्यांची संख्या यामध्ये मोठी तफावत आहे. तीन जूनच्या पूर्वी दगावणाऱ्यांचा आकडा केवळ 11 होता. आणि पॉझिटिव्ह रुग्ण 400 च्या जवळपास होते. आज शहरातील मरणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून बाधितांचा आकडाही फुगला आहे.
बाधितांचे प्रमाण पाच पटीने तर मरणाऱ्यांचे प्रमाण तीन पटीने वाढले आहे. शहरासाठी हे निश्चितच चांगले नाही. लॉकडाऊनचे नियम दुकानदार, ऑटोरिक्षाचालक, दुचाकी, चारचाकी वाहनचालक आणि नागरिक पाळत नाहीत. त्यामुळे कोरोनाचा प्रसार दिवसागणिक वाढतो आहे. झालेला आजार लोकं लपवून ठेवत आहेत. परिणामी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग लवकर होत नाही. त्यामुळे कुणालाही कोणत्याही आजाराची लक्षणे असतील तर तत्काळ डॉक्टरांना दाखवावे लागेल. खासगी डॉक्टरांना त्यांच्याकडे आलेल्या रुग्णांची ऍन्टिजीन टेस्ट करून घेतली पाहिजे.
असे न करणाऱ्या डॉक्टरांबाबतही विचार केला जाईल. नागरिकांनी एक गोष्ट समजून घेतली पाहीजे की, लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आली आहे ती लोकांच्या आर्थिक गरजा पूर्ण व्हाव्या म्हणून. पण लोक त्याचा गैरफायदा घेत आहेत. आपल्या शहरात कोरोना आजही नियंत्रणात आहे. पण, लोकांनी बेजबाबदारपणे वागणे सोडले नाही तर हा विषाणू झपाट्याने पसरण्याची शक्यता अधिक आहे. असे झाले तर कर्फ्युसह लॉकडाऊन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असे आयुक्त तुकाराम मुंढे म्हणाले.
मुंढे यांच्या इशाऱ्यामुळे सोमवारपासून (ता.27 पासून) पंधरा दिवसांसाठी लॉकाडऊन करण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा शहरात आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनीसुद्धा यास दुजोरा दिला. लॉकडाऊनची घोषणा शुक्रवारी केली जाईल. दोन दिवसांची मुदत देऊन सोमवारपासून लॉकडाऊन केले जाईल, असे सांगण्यात येते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.