धक्कादायक... अल्पवयीन मुलांना ‘भाईगिरी’चे वेड; फेमस होण्यासाठी टोळीत सहभाग

अनिल कांबळे 
Wednesday, 28 October 2020

शहरातील कुख्यात गुंड संतोष आंबेकर, राजू बद्रे, सुमित चिंतलवार, पाजी, सरदार, खान ब्रदर्स, बाल्या या गुंडांमुळे उपराजधानीला गुन्हेपूर अशी ओळख मिळाली. गुन्हेगारी जगतात दबदबा निर्माण केल्यास दहशत निर्माण होते.

नागपूर : उपराजधानीत गुन्हेगारांच्या अनेक टोळ्या कार्यरत आहेत. या टोळ्यांत सहभागी होण्यासाठी १६ ते १८ वयोगटातील युवावर्ग धडपड करीत आहेत. या युवकांना ‘भाईगिरी’चे वेड लागले असून, गुन्हेगारी जगतात फेमस होण्यासाठी टोळीचा सदस्य बनत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील कुख्यात गुंड संतोष आंबेकर, राजू बद्रे, सुमित चिंतलवार, पाजी, सरदार, खान ब्रदर्स, बाल्या या गुंडांमुळे उपराजधानीला गुन्हेपूर अशी ओळख मिळाली. गुन्हेगारी जगतात दबदबा निर्माण केल्यास दहशत निर्माण होते. गुंडगिरीत नाव कमावल्यास खंडणी, वसुली, हप्ता, प्रोटेक्शन मनी आणि चंदा या माध्यमातून बक्कळ पैसा कमावता येतो, अशी धारणा झाल्यामुळे १६ ते २१ या वयोगटातील मुले गुन्हेगारी जगताकडे वळत आहेत. 

झोपडपट्टी वस्ती, व्यसनाधीन आई-वडील किंवा विभक्त कुटुंबात जगणारी मुले लवकर वाईट संगतीत येऊन व्यसनाधीन होतात. झटपट पैसा कमवण्यासाठी गुन्हेगारीकडे वळतात. लूटमार, वाटमाऱ्या, चोरी, चेनस्नॅचिंग, घरफोडी असे मार्ग पत्करतात. त्यातूनच त्यांचे मन गुन्हेगारीत टॉपवर असलेल्या भाई किंवा दादाकडे वळते.

शस्त्रांचा खेळ

शहरातील अनेक टोळ्यांतील सदस्यांकडे पिस्तूल, देशीकट्टा आहेत. त्यामुळे गुन्हेगारीत जम बसविण्यासाठी टोळीच्या सदस्यांकडे देशीकट्टा असतो. चित्रपटांतील भाईगिरीचे सीन पाहून पिस्तुलाचे आकर्षण वाढते. प्राथमिक सदस्यत्व मिळालेल्या युवकांना चाकू-तलवार किंवा गुप्ती भेट देण्याची परंपरा आहे. याच कारणामुळे शहरात शस्त्रांच्या तस्करीचे प्रमाण वाढत आहे.

पोलिसांनी दाखवावे गांभीर्य

रस्त्यावरून भरधाव आणि दुचाकीवर तीन ते चार जणांनी ओरडाआरडा करीत जाणे, महिलांची छेडछाड, वाटसरूंना त्रास देणे या गोष्टीही वाढल्या आहेत. या सगळ्या बाबींकडे पोलिस प्रशासनाने देखील गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. शाळा, महाविद्यालय व महत्त्वाचे चौकात नेहमी दिसणाऱ्या अशा मुलांची चौकशी करणे आवश्‍यक आहे. अन्यथा अशा अल्पवयीन मुलांकडून पुढील काळात मोठे गुन्हे घडण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

जरीपटका प्रकरणामुळे पोलिसच अडचणीत

गेल्या महिन्यात अल्पवयीन आरोपींना घटनास्थळावर पायी घेऊन जात असताना व्हीडिओ व्हायरल झाल्याने जरीपटका पोलिस चांगलेच अडचणीत आले होते. ही अल्पवयीन मुलांची टोळी होती. मात्र त्यांच्यावर लूटमार, घरफोडीचे गुन्हेही दाखल होते. केवळ अल्पवयीन असल्याचा लाभ घेत पोलिस निरीक्षकासह सहा कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत.

 
पालकांनी पोलिसांना सहकार्य करावे
विधीसंघर्षग्रस्त बालकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून शिक्षण, प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्यांच्यात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी पोलिस विभाग प्रयत्न करीत आहे. सामान्य जीवन जगण्यासाठी तज्ज्ञांकडून त्यांचे समूपदेशन केले जाते. त्यांच्या पालकांनाही पोलिसांना सहकार्य करावे
- सुनील फुलारी, पोलिस सहआयुक्त. नागपूर पोलिस. 

संपादन  : अतुल मांगे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: the struggle of youth to join criminal gangs