लॉकडाउनमुळे लालपरीचे आर्थिक चाक आणखी खोलात, तब्बल एवढ्या कोटींचे नुकसान 

ST's loss of Rs 3,000 crore in corona lockdown
ST's loss of Rs 3,000 crore in corona lockdown
Updated on

नागपूर :  लॉकडाउनमुळे लालपरीचे आर्थिक चाक आणखी खोलात रुतले आहे. लॉकडाउनच्या १५३ दिवसांच्या काळात महामंडळाचे ३ हजार ३६६ कोटींचे नुकसान झाले आहे. परिणामी, चालू आर्थिक वर्षात एसटीला ८०२ कोटींचा फटका बसण्याचा अंदाज असून, संचित तोटा ६ हजार १५५ कोटींवर जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. आर्थिक संकटामुळे प्रवासी सेवेवरही दीर्घकालीन परिणाम होणार आहेत.

सरकारी दुर्लक्षामुळे राज्याची लोकवाहिनी नेहमीच उपेक्षित राहिली. उपाययोजनेअभावी तोट्याचे दुष्टचक्र मागे लागले. २०१४-१५ पर्यंत एसटीचा संचित तोटा १ हजार ६८५ कोटीवर गेला. तोट्यात वर्षागणिक भर पडत आहे. २०१९-२० या आर्थिक वर्षात ८०२ कोटींचा तोटा सहन करावा लागला असून, एकूण संचित तोटा ५हजार ३५३ कोटींवर पोहोचला. 

जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनापासून बचावासाठी कधी नव्हे ती लालपरी जायबंदी करण्यात आली. रोजचे २२ कोटींचे उत्पन्न पुरते बुडाले. २० ऑगस्टपासून आंतरजिल्हा सेवा मर्यादित प्रवासी संख्येसह सुरू झाली. पण, एरवी रोज ६६ लाख प्रवाशांना सेवा देणारी एसटी सध्या केवळ ३.८ लाख प्रवाशांचीच वाहतूक करीत आहे. प्रवासी कमी असल्याने आजही एसटीला दररोज २१ कोटींचा तोटा सहन करावा लागत आहे. शासनाकडून अद्याप विशेष अर्थसाहाय्य न मिळाल्याने संचित तोटा वाढत आहे.

गेल्या चार वर्षांमध्ये एसटीच्या ४ हजार बसेस स्क्रॅप झाल्या. लवकरच आणखी २ हजार बसेस स्क्रॅप कराव्या लागणार आहेत. सध्या केवळ १८ हजार ५०० बसेस एसटीच्या ताफ्यात आहेत. परिणामी फेऱ्या आणि नवीन मार्गावर बसेस सुरू करता येत नाही. सदैव चणचण सोसणाऱ्या महामंडळाला गेल्या २५ वर्षात स्वतःची नवी परिवर्तन बस खरेदी करता आली नाही. 

जुन्याच बसेस असल्याने किफायतशीर सेवेवर परिणाम झाला. बसस्थानकांच्या आधुनिकीकरणाचे प्रस्ताव अडकून पडले आहेत. कर्मचाऱ्यांच्या वेतनासह अद्ययावत सेवा देण्यासाठी नव्या योजना राबविता येत नाहीत. एसटीला आता वरवरच्या नाही तर खोलवरच्या उपचाराची गरज आहे.

 
उपाययोजनेअभावी एसटीची वाताहत
खासगी बस वाहतूकदारांसोबत स्पर्धा करण्यात एसटी मागे पडत आहे. बडेजाव करीत शिवशाही, शिवनेरी, अश्वमेध बसेस सुरू करण्यात आल्या खऱ्या. पण, त्या बसेस भाडेतत्त्वावर घेण्यात आल्या. योग्य उपाययोजनेअभावी एसटीची वाताहत झाली असून, आता उपाययोजनांसाठी शासनाकडे भीक मागावी लागत आहे.
-मुकेश तिगोटे, सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस.

वर्षनिहाय संचित तोटा(कोटीत)
वर्ष संचित तोटा वार्षिक तोटा

  • २०१४-१५ १,६८५ ३९२
  • २०१५-१६ १,८०७ १२१
  • २०१६-१७ २,३३० ५२२
  • २०१७-१८ ३,६६३ १,५७८
  • २०१८-१९ ४,५४९ ८८६
  • २०१९-२० ५,३५३ ८०३
  • २०२०-२१ ६,१५५ ८०२ (संभाव्य)

२० ते २९ ऑगस्टदरम्यान एसटी वाहतूक
विभाग चालविलेल्या बसेस फेऱ्या प्रवासी संख्या

  • नागपूर ४०० १,२९० ३२,५४५
  • अमरावती ४५३ १,८९३ ४४,९८८
  • औरंगाबाद ९३२ ३,९२२ १,१०,१५२
  • नाशिक ५१६ १,६३३ ३६,१८३
  • पुणे ८०५ ३,२४७ ६७,९३९
  • मुंबई ६७७ ३,६४८ ९४,३८३

संपादन : अतुल मांगे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com