चार दिवसांची चिमकुली, नावही ठेवलेलं नाही, जन्माचा आनंद साजरा करताना दुःखाचे सावट अन्

केवल जीवनतारे
Tuesday, 15 December 2020

नागभीड येथील डॉक्टरांनी नागपुरातील एका खासगी रुग्णालयात रेफर केले पण या रुग्णालयात येणारा खर्च या कुटुंबाच्या आवाक्यात नव्हता. यामुळे अखेर आई-वडिलांनी मेडिकल गाठले. एक्‍स रे, सोनोग्राफीतून गुंतागूंत असल्याचे स्पष्ट झाले. मेडिकलमधील बालशल्यक्रिया विभागातील डॉक्टरांनी तत्काळ शस्त्रक्रिया केली.

नागपूर : अवघ्या चार दिवसांची चिमकुली... नावही ठेवलं नाही... एकीकडे जन्माचा आनंद साजरा करताना दुःखाचे सावट पसरले... बाळाची अन्ननलिका आण श्वासनलिका जुळलेली होती... दूध, पाणी पचत नव्हते... नातेवाईकांनी तर बाळाच्या जगण्याची आशा सोडून दिली होती. मात्र, देव तारी त्याला कोण मारी असं म्हणतात, तेच खरं ठरलं. मेडिकलमधील बालशल्यक्रिया विभागातील डॉक्टर देवदूत ठरले. त्यांच्या शर्थीच्या प्रयत्नातून दुर्मीळ शस्त्रक्रिया यशस्वी झाली. बाळाला नवजीवन मिळाले. सद्या मेडिकलच्या वॉर्ड क्रमांक ३ मध्ये बाळ ठणठणीत आहे. आता बाळाचे वय सहा दिवसांचे आहे.

नागभीड येथील आरोग्य केंद्रात या बाळाचा जन्म झाला. प्रिया आणि स्वप्नील असे या बाळाच्या आई-वडिलांचे नाव आहे. स्वप्नील शेतकरी आहे. शुक्रवारी (ता. ९) जन्म झाल्याचा आनंद अनुभवत असतानाच डॉक्टरांनी अन्ननलिका व श्वासनलिका एकत्र जुळल्या असल्याचे सांगितले. बाळाच्या शरीरात गुंतागुंत झाली. दूध किंवा पाणी पिल्यानंतर ते पचत नव्हते. बाहेर पडत होते.

हेही वाचा - अंकिता जळीतकांड : पहिल्याच दिवशी आरोपीचे वकील गैरहजर; गुरुवारी देतील आरोपावर उत्तर

नागभीड येथील डॉक्टरांनी नागपुरातील एका खासगी रुग्णालयात रेफर केले पण या रुग्णालयात येणारा खर्च या कुटुंबाच्या आवाक्यात नव्हता. यामुळे अखेर आई-वडिलांनी मेडिकल गाठले. एक्‍स रे, सोनोग्राफीतून गुंतागूंत असल्याचे स्पष्ट झाले. मेडिकलमधील बालशल्यक्रिया विभागातील डॉक्टरांनी तत्काळ शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रियेनंतर बाळाला सलाईन लावण्यात आले. सद्या बाळ ठणठणीत आहे. वॉर्ड क्रमांक ३ मध्ये बाळावर उपचार सुरू आहेत.

आभाराने भरलेले शब्द ‘डॉक्‍टरसाहब’

दोन दिवसांच्या बाळावर केलेली शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याची माहिती डॉक्टरांनी नातेवाईकांना दिली. नातेवाईकांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. नातेवाईकांच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते. डॉक्‍टरचे आभार कसे मानावे हेच कळत नव्हते. वडील स्वप्नील यांनी दोन्ही हात जोडून ‘डॉक्टरसाहेब...’ असे शब्द उच्चारले. त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. स्वप्नील यांनी मनापासून डॉक्‍टरांचे आभार मानले. डॉक्टरांचेही डोळे भरून आले.

अधिक माहितीसाठी - युवकाची विवाहितेकडे लग्नासाठी अजबगजब मागणी; पतीला बघून काढला पळ

गरिबांच्या रुग्णसेवेत मिळणारे समाधान मोठे
मेडिकल असो की, सुपर स्पेशालिटी. ही रुग्णालये गरिबांसाठीच आहेत. येथील प्रत्येक विभागात गुणात्मक बदलातून रुग्णसेवेचा धर्म पाळला जातो. अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांच्यासह सर्वच विभागाचे विभागप्रमुखांकडून मोलाचे सहकार्य मिळते. इमर्जन्सी सेवेचा वसा मेडिकलने स्वीकारला आहे. गरीब रुग्णांचे हित मेडिकलमध्ये साधले जाते. गरिबांच्या रुग्णसेवेत मिळणारे समाधान मोठे आहे. 
- डॉ. अविनाश गावंडे,
वैद्यकीय अधीक्षक, मेडिकल

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Successful surgery on a four-day-old baby in Nagpur