अचानक का गुदमरतोय श्‍वास? उमरेडकरांना आता नकोसे झाले वायुप्रदूषण !

सतिश तुळस्कर
Wednesday, 28 October 2020

काही कारखान्यात नियमबाह्य पद्धतीने टायर जाळून तेल काढताना मोठ्या प्रमाणात काळाकुट्ट धूर विनाचिमणी सोडला जात असल्याचे निदर्शनास आले. महत्वाचे म्हणजे त्याठिकाणी एक महिला व तिचे ४ वर्षाचे चिमुकले बाळ वास्तव्यास होते. त्यासंदर्भात बातमी प्रकाशित होताच सर्वत्र चर्चा झाली आणि परिणामी ‘त्या’ मातेची व तिच्या बाळाची तेथून अन्यत्र रवानगी करण्यात आल्याचे समजले.

उमरेड (जि.नागपूर) : गेल्या तीन दिवसांपूर्वी मिळालेल्या तक्रारीवरून ‘सकाळ’ प्रतिनिधीने एमआयडीसी परिसरात धाव घेतली आणि त्याठिकाणी काही कारखान्यात नियमबाह्य पद्धतीने टायर जाळून तेल काढताना मोठ्या प्रमाणात काळाकुट्ट धूर विनाचिमणी सोडला जात असल्याचे निदर्शनास आले. महत्वाचे म्हणजे त्याठिकाणी एक महिला व तिचे ४ वर्षाचे चिमुकले बाळ वास्तव्यास होते. त्यासंदर्भात बातमी प्रकाशित होताच सर्वत्र चर्चा झाली आणि परिणामी ‘त्या’ मातेची व तिच्या बाळाची तेथून अन्यत्र रवानगी करण्यात आल्याचे समजले. आमदार राजू पारवे यांनी या प्रकरणात पुढाकार घेऊन उमरेडकरांचा श्‍वास मोकळा करण्याचा निर्धार केला.

हेही वाचाः उमरेडच्या एमआयडीसीत येतात नेहमी काळेकुट्ट ढग !

कंपनीने नाकारला आरोप
एकंदर सर्व परिस्थितीचे आकलन केले असता अनेकांनी प्रतिक्रियांना वाट मोकळी करून दिली. कंपनीचे विश्वस्त सौरभ भिवंगडे यांच्याकडून कंपनीबाबत माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता ते म्हणाले की, या कंपनीत निकामी झालेले सर्व वाहनांचे टायर खरेदी करून आणले जाते. त्यानंतर त्या टायरच्या ढिगाला बॉयलरमध्ये टाकले जाते आणि मग खालून लाकडांची भट्टी लावून बॉयलर यंत्राला सुरू केले जाते. त्यामुळे आगीच्या साहाय्याने टायर आतल्या आत भाजले जातात आणि त्यातून तेल, काळ्या रंगाची भुकटी आणि तार वेगळा केला जातो. त्यानंतर निघणारे तेल हे डांबर कारखान्यात विकले जाते तर भुकटी ही वेगवेगळ्या कारखान्यांमध्ये जाळण्यासाठी विकली जाते. तार हा भंगार म्हणून विकला जातो. या व्यतिरिक्त आम्ही कंपनीमध्ये चिमणीच्या उभारणीसाठी लागणारे सुटे भाग बोलावून ठरवले आहेत. मात्र त्याच्या स्थापनेसाठी स्थानिक भागात मजूर मिळत नसल्यामुळे मध्यप्रदेशातून त्या कामात तरबेज असणारी एक चमू लवकरच येईल आणि चिमची उभारणी करून देईल, अशी माहिती सौरभ भिवंगडे यांनी दिली .

योग्य ती कारवाई केली जाईल !
‘त्या’ कारखान्यांची चौकशी करून कामाची पाहणी केली जाईल आणि बेकायदेशीर कामावर निर्बंध घालून योग्य  कारवाई केली जाईल.
राजू पारवे
आमदार

पर्यावरणालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान   
‘त्या’ कारखान्यातून निघणारा धूर हा मानवी जीवनावर आघात करणारा आहे. त्या जागी काम करणाऱ्या कामगारांना तसेच सभोवतालच्या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांना मोठा धोका उद्भवू शकतो. त्यांना श्वसनाचा त्रास होऊ शकतो आणि पर्यावरणालासुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते.
डॉ.जगदीश तलमले  

बेकायदेशीर कामाची चौकशी करू
बुधवारी ‘त्या’ एमआयडीसी परिसरातील कारखान्याला भेट देऊ आणि तिथे चालणाऱ्या बेकायदेशीर कामाची चौकशी करू .
 जयसिंग जाधव
खंडविकास अधिकारी

संपादनःविजयकुमार राऊत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sudden suffocation? Umredkar no longer hates air pollution!