अचानक कानठळ्या बसविणाऱ्या बंदुकीच्या आवाजाने उडाला उमरेडकरांचा थरकाप

सतिश तुळस्कर
Tuesday, 22 September 2020

संताजी जगनाडे चौकात कानठळ्या बसविणारे आवाज घुमतायेत. कोणालाही प्रश्‍न पडणार की हा आवाज नेमका आहे कशाचा?  माहिती घेतली असता बंदुकीतून बार उडविण्याचा आवाज येत असल्याचे समजले आणि उमरेडकरांचा थऱकाप उडाला. सर्वांना एका अनामिक भीतीने ग्रासले. काय झाले असावे, या प्रश्‍नानंतर माहिती घेण्यासाठी प्रत्येक जण अस्वस्थ झाला.

उमरेड (जि.नागपूर) : गेल्या दोन-तीन दिवसांपासून शहरातील वर्दळीचा चौक म्हणून ओळखला जाणाऱ्या संताजी जगनाडे चौकात कानठळ्या बसविणारे आवाज घुमतायेत. कोणालाही प्रश्‍न पडणार की हा आवाज नेमका आहे कशाचा?  माहिती घेतली असता बंदुकीतून बार उडविण्याचा आवाज येत असल्याचे समजले आणि उमरेडकरांचा थऱकाप उडाला. सर्वांना एका अनामिक भीतीने ग्रासले. काय झाले असावे, या प्रश्‍नानंतर माहिती घेण्यासाठी प्रत्येक जण अस्वस्थ झाला.   

अधिक वाचाः  बाधितांच्या संख्येपुढे दम टाकताहेत जिल्ह्यातील कोविड रुग्णालये, उपचारांच्या ‘ऑक्सिजनची गरज
 

शेतातील पिक झाले फस्त
अलीकडे संपूर्ण जगातच नव्हे तर आता ग्रामीण भागात देखील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसून येत आहे. कोरोना महामारीमुळे दररोज बधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून मृतांची संख्यादेखील वाढत आहे. याशिवाय शेतमालावर लागलेली कीड यामुळे शेतकरी पुरता अडचणीत आला आहे. शेतात उभे असलेले उर्वरित पीक आजूबाजूच्या जंगल परिसरातील रानडुकरे व माकडांचे कळप शेतात जाऊन पिकाची नासधूस करतात. त्यापासून बचाव करण्यासाठी आता बाजारात विक्रीस आलेली आवाज करणारी बंदूक सोमवारी आठवडी बाजाराच्या दिवशी रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांना आकर्षित करीत होती.

अधिक वाचाः डिसेंबर अखेरपर्यंत राहणार बोर अभयारण्याचे प्रवेशद्वार लाॉकडाउनच...

रानडुकरांचे कळप काढतात पळ
सावनेर येथून आलेला बंदुकविक्रेता अविनाश हा गावोगावी फिरून ही शेतकऱ्यांच्या उपयोगात येणारी बंदूक विक्रीचा व्यवसाय करतो. त्याच्या सोबत त्याच्या कुटुंबातील अन्य सदस्य देखील या व्यवसायात हातभार लावत असल्याचे दिसून येते. १५० रुपये किमतीला मिळणारी ही बंदूक सोबत ‘कार्बोनेट’च्या गोळ्यांचे पाकीट, अशा वस्तू देतो. गोळी बंदुकीत ठासून त्यावर पाण्याचे थेंब टाकून त्यानंतर तिला हलवून बार उडविला जातो. कानठळ्या बसविणारा आवाज बार उडताच येतो. त्यामुळे शेतात येणारे माकडं तसेच रान डुकरांचे कळप पळ काढतात. शेतकऱ्यांच्या शेतमालाचे रक्षण करणारी ही बंदूक अत्यंत उपयोगी असल्याचे अविनाशने सांगितले.

शेतात वाढला वन्यप्राण्यांचा धुमाकुळ
जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात वन्यप्राण्यांचा शेतात धुमाकूळ वाढत चालला आहे. एकदा हे वन्यजिव शेतात शिरले की अख्खे पिक उद्वस्त करून टाकतात. अनेक उपाययोजना अंमलात आणण्याचा शेतकऱ्यांनी प्रयत्न केला, तरी वन्यप्राण्यांचा बंदोबस्त झाला नाही. नरखेड, काटोल, सावनेर, हिंगणा या तालुक्यात पिकाच्या नुकसानीचे प्रकार वाढले आहेत. नुकसान झाल्यानंतर त्याची नुकसाभरपाई मिळविण्याकरीता शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागतात. तरीही काही उपयोग होत नाही. पिकाच्या किमतीत नुकसाभरपाई अत्यल्प असते.वन्यप्राण्यापासून शेतकरी मोठ्या प्रमाणात त्रस्त आहेत.
 
संपादनः विजयकुमार राऊत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Suddenly, the sound of gunfire hitting Umredkar's trembling