काटोलमध्ये शिक्षणाची गंगा प्रवाहित करणारे सुनील शिंदे

sunil shinde
sunil shinde

नागपूर : काटोल-नरखेड भागात शिक्षणाची योग्य सोय नसल्याने मुली शिक्षणात मागे पडल्याचे माजी आमदार सुनील शिंदे यांच्या निदर्शनास आले अन्‌ त्यांनी 1990 च्या काळात शिक्षण संस्थेची स्थापना केली. या कार्यामुळे तालुक्‍यात शिक्षणाची क्रांती घडलीच पण असंख्य गरजू हातांना रोजगार मिळाला.
मुलांचे भविष्य उज्ज्वल झाले. गेली अनेक वर्षे ग्राम पंचायत, सावरगाव येथे त्यांची सत्ता होती. आमदार म्हणून सावरगावसह काटोल विधानसभेत त्यांनी विकासकामांची गंगा आणली. त्यामुळे तालुक्‍यातील डोंगरगाव येथे औद्योगिक क्रांतीला देखील सुरुवात झाली. संत्रा कारखाना हा सुनील शिंदे यांच्या प्रयत्नांचा महत्त्वाचा टप्पा मानला गेला आहे. त्यांच्या जाण्याने शेतकऱ्यांसाठी झटणारा नेता गेल्याची हळहळ व्यक्‍त होत आहे.

कटोलचे माजी आमदार, म्हाडाचे सभापती तसेच शेतकरी, संत्रा उत्पादकांसाठी सातत्याने झटणारे सुनील शिंदे यांचे गुरुवारी (ता.11) काटोल येथे निधन झाले. मृत्युसमयी ते 86 वर्षांचे होते. उद्या शुक्रवारी सकाळी अकरा वाजता सावरगाव येथील मोक्षधामवर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

सोनू बाबा म्हणून सर्वत्र परिचित असलेले शिंदे यांच्या मागे पत्नी, तीन मुले असा मोठा आप्त परिवार आहे. शेतकऱ्यांसाठी झटणारा नेता निघून गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या जात आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे अत्यत निकटवर्तीय म्हणून सुनील शिंदे यांची ओळख होती. पवार नागपुरात असताना ते हमखास एकमेकांची भेट घ्यायचे.
काटोल विधानसभा मतदारसंघाचे 1984 ते 94 असे दहा वर्षे ते आमदार होते. या दरम्यान त्यांनी संत्रा उत्पादकांच्या प्रश्‍नाकडे लक्ष वेधण्यासाठी सातत्याने आंदोलने केली. हिवाळी अधिवेशन विधान भवन परिसरात त्यांनी उपोषण केले होते. त्यानंतर संत्रा उत्पादकांसाठी काटोल येथे संत्रा उत्पादन प्रक्रिया केंद्र सुरू करण्यात आले होते. दुदैवाने काही तांत्रिक अडचणींमुळे ते बंद पडले. मात्र त्यास पुनर्जिवित करण्यासाठी शिंदे सातत्याने प्रयत्नशील राहीले.
संत्रा उत्पादकांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी हिवाळी अधिवेशनात मंत्री, आमदार, अधिकारी यांना ते संत्रा भेट देत असत. गेल्या काही वर्षांपासून ते आजारी होते. त्यातही शेतकऱ्यांच्या बैठकांना आवर्जुन उपस्थित राहात. त्यांचा राजकीय आणि शैक्षणिक वारसा पुत्र जिल्हा परिषदेचे माजी कृषि सभापती सतीश शिंदे पुढे चालवत आहे.

सरकारी जमिनी वाचवल्या
सुनील शिंदे म्हाडाचे सभापती असताना काही पुढारी, अधिकारी यांना सरकारी जमिनी लाटल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याविरोधात त्यांनी थेट उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालयाने याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी आयोग नेमण्याचे सरकारला आदेश दिले होते. याकरिता शिंदे यांनी सातत्याने पाठपुवरा केल्यानंतर बट्टा आयोग नेमण्यात आला होता. बट्टा आयोगाने शिंदे यांच्या शंकेवर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे अनेक पुढाऱ्यांना लाटलेल्या सरकारी जमिनी परत कराव्या लागल्या आहेत.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com