नरखेड, काटोलच्या संत्र्यांचा गोडवा अधिक वाढणार, विक्रीसाठी जाणार देश-विदेशात

सुधीर बुटे/मनोज खुटाटे
Monday, 5 October 2020

विदर्भाचा कॅलिफोर्निया, अशी बिरुदावली मिरविणाऱ्या नरखेड व काटोल तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात संत्री पिकतात. या दोन्ही तालुक्यात जवळपास ३० हजार हेक्टरमध्ये संत्राबागा आहेत. इथल्या आंबटगोड मधुर चवीच्या संत्र्याला जगभरात मोठी मागणी आहे.

जलालखेडा/काटोल (जि.नागपूर) : विदर्भातील ‘कॅलिफोर्निया’ म्हणून ओळख असलेल्या नरखेड व काटोल तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना आता सुगीचे दिवस येणार आहेत. नरखेड व काटोल येथील रेल्वे स्थानकावरून रेल्वेमार्ग संत्रा वाहतुकीसाठी खुला होणार असल्याने आता शेतकऱ्यांना देश व विदेशापर्यंत संत्री नेता येणार आहे. त्यामुळे देशभरातील मोठ्या बाजारपेठांशी शेतकरी प्रत्यक्ष जोडला जाणार असल्याने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक सुबत्ता मिळणार असून संत्र्यांची महती व गोडवा अधिक वाढणार आहे.

अधिक वाचाः तलावात उडी घेऊन दोन सख्ख्या भावांनी दिले थेट मृत्यूला निमंत्रण

जलद रेल्वेवाहतूकीचा पर्याय होणे गरजेचे
 विदर्भाचा कॅलिफोर्निया, अशी बिरुदावली मिरविणाऱ्या नरखेड व काटोल तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात संत्री पिकतात. या दोन्ही तालुक्यात जवळपास ३० हजार हेक्टरमध्ये संत्राबागा आहेत. इथल्या आंबटगोड मधुर चवीच्या संत्र्याला जगभरात मोठी मागणी आहे. मात्र शेतकऱ्यांनी पिकविलेली संत्री स्वतःच देशभरातील बाजारपेठांमध्ये नेऊन विकण्याची सोय नसल्याने आतापर्यंत स्थानिक व्यापाऱ्यांकडून संत्री विकत घेतली जात होती. यात शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत होते. त्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यात शेतकऱ्यांची संत्री थेट नेता यावी, यासाठी जलद रेल्वेवाहतूक हा पर्याय उपलब्ध होणे गरजेचे होते.
 
रेल्वेच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
संत्र्याला जागतिक बाजारपेठ उपलब्ध असून त्याच्या वाहतुकीतील अडथळे दूर करून संत्रा वाहतुकीसाठी किसान रेल्वेचा पर्याय उपलब्ध करून देता येईल का, यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या निर्देशानुसार काटोल- नरखेड मतदारसंघातील शेतकऱ्यांचा व व्यापाऱ्यांचे संत्रा, मोसंबी, कोबी व इतर भाजीपाला रेल्वेने मुख्य बाजारपेठेला कमीत कमी वेळात व कमीत कमी खर्चात पाठविण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख यांनी नागपूरला दोन दिवसाआधी ( ता.२९ सप्टेंबर ) रेल्वे विभागात बैठक घेतली होती. त्या बैठकीनुसार १ ऑक्टोबरला  बाजार समिती काटोल येथे रेल्वेच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक करण्यात आली. त्यात मागणी आधारीत व्हेगन उपलब्ध करून देण्यात येतील, असे संबंधित रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या बैठकीला बाजार समिती काटोलचे सभापती तारेश्वर  शेळके, जि. प. सदस्य चंद्रशेखर कोल्हे, नरखेड पं. स. चे उपसभापती वैभव दळवी, सदस्य सुभाष पाटील, पंचायत समिती काटोलच्या सदस्या  नीलिमा ठाकरे, सतीश रेवतकर, अतुल पेठे,  डॉ. अनिल ठाकरे, रेल्वेचे अधिकारी सुमित, घोटकर, सुस्कार व व्यापारी तसेच शेतकरी उपस्थित होते. यामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचा हा प्रश्‍न सुटण्याची आशा दिसू लागली आहे.

हेही वाचाः हिंगणा एमआयडीसीत चालते श्रमिकांच्या घामावर ठेकेदारांची सावकारी

मालगाडीची वैशिष्टये
-१४ ऑक्टोबरला किसान रेल्वेची सुरुवात
-शेतकऱ्यांना५० टक्के  गाडे सवलत मिळणार
-काटोल, नरखेडकरीता स्वतंत्र २ बोगी

संपादनःविजयकुमार राऊत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The sweetness of Narkhed, Katol's oranges will increase and will go abroad for sale