ताई, दादा, मावशी, घ्या हो फुले! दुकानदारांचा आवाज हरवला

संदीप भुयार
Tuesday, 27 October 2020

मोठ्या आशेने हार, फुले, प्रसाद विकायला आलेल्या लोकांचे आवाजही ऐकायला मिळत नाहीत. आदासा येथील गणपती प्रत्येकाला नवीन ऊर्जा देतो. शिस्तीने दर्शन घेण्यासाठी महिला व पुरुषांच्या स्वतंत्र रांगा असायच्या, आता दर्शनार्थीच नसल्याने परिसर सुना-सुना आहे. भाविक दर्शनासाठी येत असताना फुले, प्रसाद, पूजेचे साहित्य विकण्यासाठी धडपड करताना येथील काही विक्रेते आजवर दिसत होते. अशा विक्रेत्यांपैकी प्रत्येक जण रांगेत उभ्या असलेल्या लोकांना ते आपलेच नातेवाईक म्हणून आवाज द्यायचे.

कळमेश्वर (जि.नागपूर):  एखाद देवस्थान म्हटल की, त्यावर अनेकांचा चरितार्थ चालतो़  येणाऱ्या भाविकांनी आपल्या दुकानातून फुले, हार, प्रसाद घ्यावा म्हणून त्यांच्या नजरा प्रत्येकाकडे खिळलेल्या असतात़ हे विक्रेते काका, ताई, दादा, आजोबा, मावशी या नावाने हाक मारताना दिसतात़  पण आज अशा आवाजांना आता ‘ब्रेक’ लागला आहे.

हेही वाचाः कुणीतरी विचारा त्यांना!  रस्ते, नाल्या बांधकामाचा दर्जा काय?

उत्सवांवर कोरोनाचे सावट
यावर्षीच्या उत्सवांवर कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे मोठ्या आशेने हार, फुले, प्रसाद विकायला आलेल्या लोकांचे आवाजही ऐकायला मिळत नाहीत. आदासा येथील गणपती प्रत्येकाला नवीन ऊर्जा देतो. शिस्तीने दर्शन घेण्यासाठी महिला व पुरुषांच्या स्वतंत्र रांगा असायच्या, आता दर्शनार्थीच नसल्याने परिसर सुना-सुना आहे. भाविक दर्शनासाठी येत असताना फुले, प्रसाद, पूजेचे साहित्य विकण्यासाठी धडपड करताना येथील काही विक्रेते आजवर दिसत होते. अशा विक्रेत्यांपैकी प्रत्येक जण रांगेत उभ्या असलेल्या लोकांना ते आपलेच नातेवाईक म्हणून आवाज द्यायचे. नागरिकांनी पादत्राणे आपल्याजवळ ठेवली म्हणजे ते फुले, प्रसाद, इतर सामग्री आपल्या जवळून खरेदी करतील, अशी आशा हे लोक करायचे. रांगेत उभे राहिल्यानंतर फुले, प्रसाद, इतर साहित्य विकणारी छोटी, छोटी निरागस मुले, मुली गर्दीत घुसून लोकांपर्यंत यायची. तासनस उभे राहून ती आपल्याकडील सामग्री विकायची. त्या चिमुकल्या जवळची सामग्री एखाद्या भाविकाने घेतली तर ती आनंदाने दिलेली रक्कम आपल्या पालकांजवळ देऊन पुन्हा दुसरा हार विक्रीसाठी गर्दीत घुसायची. त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद अनेकांना सुखावून टाकत असे़.  नऊ दिवसांत एक-एक पैसा जमा करून दहाव्या दिवशी अशा कुटुंबातील विजयादशमीचा सण साजरा व्हायचा. अशी कुटुंबे नवरात्रोत्सवाच्या यात्रेनिमित्त आपला चरितार्थ चालवित होती़. मात्र, आदासा येथे  होणारा हा कल्लोळ आज दिसत नाही़.  कोरोनामुळे भाविकांच्या रांगेच्या ठिकाणी रस्ता अडविणारे बॅरिकेट, बांबूचे कठडे तेवढे दिसतात.

अधिक वाचाः उमरेडच्या एमआयडीसीत येतात नेहमी काळेकुट्ट ढग !

दुकानाच्या भरवशावर कुटुंबाचा चालतो गाडा
शेती नाही, दुकानाच्या भरवशावर कुटुंबाचा गाडा चालतो. दिवसाला हजार दोन हजाराची कमाई होते़. गेल्या सहा महिन्यापासून कुठलेच काम नसल्याने घरीच आहे़. पैशाची चणचण निर्माण झाली आहे़  परंतु, मंदिर उघडले नसल्याने कुठलाही पर्याय नाही. त्यामुळे लवकरात लवकर शासनाने मंदिर उघडले पाहिजे़, अशी मागणी निलेश नाचनकर या आदासा मंदिर परिसरातील  फुलविक्रत्यांने केली. गावात शेती व्यक्तीरिक्त इतर व्यवसाय नाहीत. परंतु, मंदिरामुळे परिवाराचा भरणपोषण होते़. मात्र, गेल्या सहा महिन्यांपासून मंदिर भाविकांसाठी बंद असल्याने प्रसार विक्रीच्या व्यवसायावर मार पडला आहे़  त्यामुळे शासनाने भाविकांच्या दर्शनासाठी मंदिर उघड करावे अशी अपेक्षा किशोर काकडे या प्रसाद विक्रेत्याने व्यक्त केली. मंदिराच्या भरवशावर कुटुंब चालवावे लागले़.  आता भाविकांची गर्दीही ओसरली आहे़  ज्यावेळी भाविकांची गर्दी असते, तेव्हा व्यवसाय चांगला चालतो़, मात्र, लॉकडाउनमुळे शासनाने मंदिर बंद केल्याने व्यवसाय ठप्प पडला आहे़, अशी चिंता पुजा भंडारचे संचाकल अनंत आढूळकर यांनी व्यक्त केली.

मद्याची दुकाने सुरू, मंदिर का नाही?
शासनाने मद्यविक्रीची दुकाने सुरू केली आहे़त.  मात्र, ज्या ठिकाणी नागरिकांची श्रध्दा आहे, अशी देवालये अद्यापही बंद आहेत. त्यामुळे शासनाने असा भेदभाव न करता हिंदू धर्मिंयाच्या अस्ता असलेल्या मंदिराना सुरू करावे, कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी दिवसाला किमान २५ जणांनाच मंदिरात प्रवेश द्यावा़, या भाविकांना सहा फुटाचे अंतर पाळण्याच्या सूचना कराव्या़,  या मंदिराच्या भरवशावर अनेकांच्या कुटुंबाचा गाडा चालत असल्याने शासनाने लवकरात लवकर मंदिरे उघडावी़.
-दिलीप धोटे
  सामाजिक कार्यकर्ते

संपादनःविजयकुमार  राऊत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tai, Dada, Mavshi, take yes flowers! The shopkeepers lost their voices