उपराजधानीपासून अगदी जवळच्या हिंगणा तालुक्याने कामठीलाही सोडले मागे...

file
file

नागपूर ग्रामीणः गेल्या तीन महिन्यांपासून जिल्ह्यातील कामठी तालुक्यात कोरोना बाधित रुग्णाच्य बाबतीत कहर केला होता. दिवसेंदिवस येथील बाधितांची संख्या वाढतच चालली होती. अखेर सप्टेंबरच्या चालू आठवडयात मात्र कामठी तालुक्यावर अचानक हिंगणा तालुक्याने सरशी घेतली. कामठी तालुक्याची बाधितांची एकूण संख्या आता १८०८ इतकी झाली, मात्र आता हिंगणा तालुका जिल्हयात अव्वल स्थानी आला आहे. हिंगणा तालुक्यातील आजवरची रुग्णसंख्या २५००च्या वर पोहोचली आहे. कामठी तालुक्यातील मृतांची संख्या मात्र अधिकच आहे. येथे आजवर ६३ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. हिंगणा तालुक्यातील मृतांचा आकडा ३९ इतका आहे.

श्वास गुदमरून मृत्यू होण्याच्या घटना वाढल्या
हिंगणा  : कोरोनाचा‘ हॉटस्पॉट ’ बनलेल्या तालुक्यात आज ७३ कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले. तालुक्यात आतापर्यंत कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या २,४४२ च्या घरात पोहचली आहे. कोरोनामुळे ३५ जणांचा मृत्यू झाला आहे. बाधित रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. कोविड रुग्णालय ‘हाउसफुल’ झाल्याने नव्या रुग्णांना भरती होण्यासाठी आता भटकंती करावी लागत आहे. ऑक्सिजन तुटवडा असल्याने काही रुग्णांचा श्वास गुदमरून मृत्यू होण्याच्या घटना घडत आहेत. यामुळे ग्रामीण भागातही कोरोनाची धास्ती जनतेने घेतली आहे‌. तालुक्यातील आरोग्य व्यवस्थेवर कमालीचा ताण पडत आहे. मागील सात महिन्यांपासून तालुक्यातील वैद्यकीय अधिकारी व इतर कर्मचारी सातत्याने कोविडच्या कामात कार्यरत आहेत. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण बडवे यांनी कोरोनावर प्रतिबंध घालण्यासाठी विविध उपाययोजना राबविणे सुरू केले आहे. यामुळे जनतेने कोरोनाची लक्षणे दिसताच तपासणी करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

कळमेश्वरसह तालुक्यात आज २३ बाधित  
कळमेश्वरः कळमेश्वरसह तालुक्यात एकूण २३ बधितांची संख्या घेण्यात आलेल्या चाचणीमध्ये आढळून आली. यामध्ये कळमेश्वर पालिका हद्दीतील १९ रुग्णाचा समावेश असून ग्रामीण भागातील ४ बधितांचा समावेश आहे. आता ही संख्या कळमेश्वर सह तालुक्यातील ११७५ वर पोहचली असून आजवर एकूण १० रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

मौदा तालुक्यात १२ पॉझिटिव्ह
मौदाः तालुक्यात १२ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४४६ वर पोहचली आहे. तर कोरोनाचे १४ बळी झालेले आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता मौदा शहरात तीन दिवसाचे जनता कर्फ्यू लावण्यात आला. आज पहिला दिवस होता. आज जनतेने कर्फ्यूला साथ दिली. सर्वच व्यापारांनी  दुकाने बंद ठेऊन प्रतिसाद दिला. सोमवार, मंगळवार व बुधवारी (२१ सप्टेंबर ते २३ सप्टेंबर) संपूर्ण मौदा बंद ठेवण्यात येणार आहे.  दवाखाना, मेडिकल व डेअरी (दूध विक्रते) हे सुरू होते. बँक व शासकीय कार्यालय सुरू होते. जनतेचे सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांचे आभार मानले.

अधिक वाचाः नागपूर जिल्ह्यातील मोक्षघाट किल्ले कोलार’ ठरतोय ‘मौत का कुवॉं’

पारशिवनीत कर्फ्यू लावण्याची मागणी
टेकाडी : पारशिवनी तालुक्यात संसर्ग प्रचंड वाढत आहे. बाधित रुग्णांचा एकूण आकडा हजारांवर पोहचला आहे. यात सर्वाधिक बाधित आणि मृत हे तालुक्यातील कन्हान परिसरातील आहे. अशात संसर्ग रोखणे अत्यंत गरजेचे झाले असताना त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनता कर्फ्यू जाहीर करण्यासंदर्भात कन्हान शहरातील सत्यशोधक संघ, भारतीय युवक काँग्रेस, कन्हान शहर विकास मंचसोबत अनेक सामाजिक व राजकीय संघटनांनी कन्हान, कांद्री आणि टेकाडी परिसरांमध्ये दोन दिवसांचा जनता कर्फ्यू लावून संसर्गाची साखळी तोडण्यासाठीचे प्रयत्न करण्याचे निवेदन कन्हान पोलिस स्टेशन, कन्हान, तहसीलदार, ग्रामपंचायत कांद्री, टेकाडी, नगर परिषद कन्हान यांना दिले.

भिवापूर तालुका २७७ पार
भिवापूरः कोविड १९ या आजाराची लागण झालेल्यांचा आकडा २७७ वर तर मृत पावलेल्यांची संख्या पाचवर पोहचल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. तालुक्याच्या तुलनेत शहरात रुग्णांचा दर झपाट्याने वाढत आहे. २‍१ सप्टेंबरपर्यंत शहरात १२१ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद करण्यात आली. ग्रामीण भागातील एकूण रुग्णसंख्या १५६ एवढी आहे. शहरात मृत पावलेल्यांची संख्या  ३ व ग्रामीणमध्ये २ इतकी आहे. रविवारी रात्री शहरातील एका कापड व्यापाऱ्याचा कोरोनाने मृत्यू झाल्याने व्यापाऱ्यांकडून सोमवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. शहरातील वाढत्या रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी काय उपाययोजना राबविता येतील, यावर विचार करण्यासाठी सोमवारी तहसील कार्यालयात उपविभागिय अधिकारी झिरवाड, तहसीलदार कांबळे, नगराध्यक्षा किरण नागरिकर, मुख्याधिकारी सुवर्णा दखणे यांच्या उपस्थितीत स्थानिक व्यापारी व विविध पक्षाचे पदाधिकारी यांची सभा पार पडली. यात वेगवेगळ्या उपायांवर चर्चा करण्यात आली.

संपादनः विजयकुमार राऊत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com