सांगा, विद्यार्थ्यांचे आधार अपडेट करायचे कधी?

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 जून 2020

गेल्या सरकारमध्ये शालेय शिक्षणमंत्री असलेले ऍड. आशिष शेलार यांनी 2019-20 या काळातील संचमान्यता करण्यात येणार नाही असे आदेश काढले होते.

नागपूर : कोरोनामुळे शाळा आणि शिकवणी बंद असताना, शालेय शिक्षण विभागाने मागच्या वर्षीसह यावर्षीची संचमान्यता करण्याच्या निर्णय घेतला. त्यात विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट करण्याची अट टाकण्यात आली आहे. त्याशिवाय शाळांची संचमान्यता होणार नसल्याचे निर्देश देण्यात आले आहे. त्यामुळे करोनाच्या काळात विद्यार्थ्यांचे आधारकार्ड अपडेट करायचे कसे? हा प्रश्‍न शाळा आणि शिक्षकांना पडला आहे.

गेल्या सरकारमध्ये शालेय शिक्षणमंत्री असलेले ऍड. आशिष शेलार यांनी 2019-20 या काळातील संचमान्यता करण्यात येणार नाही असे आदेश काढले होते. सहा महिन्यातच सरकार बदलल्याने आघाडी सरकारने या निर्णयात बदल करून 2019-20 आणि 2020-21 या काळातील संचमान्यता करण्याचे आदेश काढले. मात्र, हा आदेश काढताना, त्यात एक अट टाकण्यात आली.

गोठ्यात आगीचे तांडव! जनावरांचा चारा, खत व शेती अवजारे जळून खाक

या अटीनुसार संचमान्यता करताना त्यात विद्यार्थ्यांचे आधारकार्ड अपडेट असणे आवश्‍यक करीत, त्याशिवाय दोन्ही वर्षाच्या संचमान्यता होणार नसल्याचे स्पष्ट केले. कोरोनामुळे जिल्हापरिषद, महापालिका, नगरपालिका व इतर सरकारी शाळेत शिकणारी परप्रांतीय मुले आपापल्या शहरात कुटूंबासह निघून गेलेली आहेत.

जे विद्यार्थी शिल्लक आहेत, त्यांची संचमान्यता केल्यास शिक्षकांवर अतिरिक्त होण्याची वेळ येणार आहे. याशिवाय जे विद्यार्थी गेल्यावर्षी उपस्थित होते, ते आता नसल्याने त्यांची संचमान्यता करायची कशी? असा प्रश्‍न शिक्षकांसमोर पडला आहे. यावर शालेय शिक्षण विभागाकडून अशा प्रकारची सक्ती करण्यात येत असल्याने शिक्षक आणि शाळांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे.

 

मानसिक त्रास देण्याचे धोरण
सरकारने परिस्थितीचा आढावा घेऊनच कुठलाही निर्णय घेण्याची गरज असते. जो निर्णय रद्द झालेला आहे, तो पुन्हा जीवित करून शिक्षकांना मानसिक त्रास देण्याचे धोरण चुकीचे असल्याने गेल्यावर्षीची आणि यावर्षीची संचमान्यता रद्द करण्यात यावी.
पुरुषोत्तम पंचभाई, राज्य उपाध्यक्ष, राष्ट्रवादी शिक्षक संघ

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Teachers ask, when to update student aadhar card?