कोरोना काळातही शिक्षकांना बोलावले शाळेत; यांच्याकडे केली तक्रार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 जून 2020

सीबीएसईच्या वतीने शाळा प्रवेशासंदर्भात अद्याप कुठल्याही सूचना आलेल्या नाहीत. त्यामुळे कोरोनाचे संकट असताना काही शाळांनी शिक्षकांना शाळेमध्ये बोलावण्याने विरोध होत आहे. यासह शाळेत न आल्यास कारवाई करण्याची धमकी शिक्षकांना दिली जात असल्याचा आरोप संघटनेद्वारे करण्यात आला आहे.

नागपूर : सीबीएसई शाळांनी ऑनलाइन शिक्षणाला सुरुवात केली आहे. त्यासाठी उपराजधानीतील काही खासगी तसेच केंद्रीय शिक्षण मंडळाच्या शाळांकडून शिक्षकांना शाळेत बोलावले जात आहे. कोरोनाच्या काळात अशाप्रकारे शिक्षकांना बोलाविण्यात येत असल्याने ही बाब नियम भंग करणारी असून, या शाळांविरोधात जिल्हाधिकारी व मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. अशा शाळांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी सीबीएसई स्कूल स्टाफ वेल्फेअर असोसिएशनच्या अध्यक्षा दीपाली डबली यांनी केली आहे. 

कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. मात्र, सीबीएसई शाळांकडून विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे. कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांना बोलावणे शक्‍य नसल्याने त्यांना ऑनलाइन शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षण देत, अभ्यासक्रम पूर्ण करण्यावर शाळांचा भर आहे. त्यातूनच शाळांमध्ये तांत्रिक कर्मचारी आणि शिक्षकांना बोलाविण्यात येत आहे.

मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी जनतेशी संवाद साधताना शाळा सुरू करणे आवश्‍यक असले तरी सध्या तशी स्थिती नसल्याचे स्पष्ट केले. यासह आवश्‍यक सुविधा असणाऱ्या भागामध्ये ऑनलाइन वर्ग सुरू करण्याचा विचार मांडण्यात आला. तसेच ज्या ग्रामीण भागात ऑनलाइन वर्गांची सुविधा नाही अशा ठिकाणी समाज अंतर पाळून शाळा सुरू करण्यात येतील असेही सांगण्यात आले. सीबीएसईच्या वतीने शाळा प्रवेशासंदर्भात अद्याप कुठल्याही सूचना आलेल्या नाहीत. त्यामुळे कोरोनाचे संकट असताना काही शाळांनी शिक्षकांना शाळेमध्ये बोलावण्याने विरोध होत आहे. यासह शाळेत न आल्यास कारवाई करण्याची धमकी शिक्षकांना दिली जात असल्याचा आरोप संघटनेद्वारे करण्यात आला आहे.

 

विशेष म्हणजे, सर्व खासगी संस्थांमधील शिक्षक घरून ऑनलाइनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे वर्ग घेत असल्याने अशा शाळांवर कारवाई करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे. दरम्यान, यासंदर्भात संबंधित शाळांना विचारणा केली असता, नियमानुसारच शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना बोलाविण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

निवेदन बघितल्यावरच कारवाई 
संबंधित शाळांविरोधात आलेले निवेदन बघितल्याशिवाय प्रतिक्रिया देणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे ते बघितल्यावरच नेमकी काय? कारवाई करायची हे स्पष्ट होईल. मात्र, शाळांकडून नियम पाळूनच ऑनलाइन शिक्षणाचे काम करणे अपेक्षित आहे. 
-रवींद्र ठाकरे, जिल्हाधिकारी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Teachers called the school