आहे की नाही चमत्कार! हात न लावताच वाजते मंदीरातील घंटा

स्वाती हुद्दार
Wednesday, 16 September 2020

देवावर श्रद्धा असणारे भक्तगण मात्र बंद दारासमोर उभे राहून त्याच श्रद्धेने नित्यनेमाने देवाचे दर्शन घेऊन समाधान मानतात. आणि कधीतरी देवाचे प्रत्यक्ष दर्शन होईल, हा विश्वास बाळगतात. आणि कोरोनाचे हे संकट लवकर दूर व्हावे, अशी देवाकडे प्रार्थना करतात.

नागपूर : कोरोनाच्या आपत्तीने जगरहाटी थांबली. देशभर लॉकडाऊनची घोषणा झाली. शाळा, महाविद्यालय, कार्यालय, सिनेमा टॉकीज, हॉटेल-रेस्टॉरेट्स, बाग-बगीचे यांच्यासह मंदीरातले देवही कुलुपांमध्ये बंद झाले. कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गहिरे होत असताना हळुहळु अनलॉकची प्रक्रीया सुरू झाली. एकेक संस्था सुरू होऊ लागल्या. मंदीरे मात्र बंद आहेत. मंदीरे उघडावी म्हणून भाजपने मध्यंतरी राज्यव्यापी घंटानाद आंदोलनही केले. मात्र त्या आंदोलनाला यश आले नाही आणि मंदीराची कवाडे काही उघडली नाहीत.

देवावर श्रद्धा असणारे भक्तगण मात्र बंद दारासमोर उभे राहून त्याच श्रद्धेने नित्यनेमाने देवाचे दर्शन घेऊन समाधान मानतात. आणि कधीतरी देवाचे प्रत्यक्ष दर्शन होईल, हा विश्वास बाळगतात. आणि कोरोनाचे हे संकट लवकर दूर व्हावे, अशी देवाकडे प्रार्थना करतात.

मंदीरात गेल्याबरोबर घंटानाद करण्याची परंपरा हिंदू संस्कृतीत आहे. मात्र सध्या मंदिरे बंद असल्याने घंटानादापासून भक्त वंचित आहेत. त्यामुळे आपले दर्शन अपुरे असल्याची रुखरुख भक्तांच्या मनाला लागून राहते. त्यावर एका परम भक्ताने उपाय शोधून काढला आहे. आपले नाव कुठेही जाहीर होणार नाही, याची काळजी घेत या हनुमान भक्ताने रामनगरच्या हनुमान मंदीरात प्रवेश दारा बाहेर हाताचा स्पर्श न करता सेंसरवर चालणारी यंत्रणा स्वतःकडुन लाऊन दिली. त्या सेंसर समोर हात नेला असता मंदीरात घंटानाद होतो. नागपुरात केवळ सेंसरवर घंटानादाची सोय असलेले हे पहिलेच मंदिर आहे. विशेष म्हणजे या भक्ताने प्रसिद्धी पराड.मुख राहून हे कार्य केले आहे.

सविस्तर वाचा - कशामुळे ढासळली अर्थव्यवस्था.. सविस्तर वाचा

रामनगरातील पश्चिमेश्वर हनुमान मंदीर हे अनेकांचे श्रद्धास्थान आहे. मंदीर सुरू असताना इथे कायम भक्तांची वर्दळ असते. शनिवारी तर या मंदीरात जत्राच भरते. इथे हनुमानाच्या मुर्ती सोबतच शिवलिंग, गणपती, देवी, शनी यांच्याही मुर्ती आहेत. अनेक भक्त नेहमीच आपली सेवा कुठल्या ना कुठल्या रुपात इथे अर्पण करीत असतात. दर शनिवारी भक्तमंडळींकडून इथे महाप्रसादाची व्यवस्था करण्यात येते.

सेंसरवर वाजणारी अशीच घंटा मध्यप्रदेशातील मंदासौर येथील शिवमंदीरात आहे आणि ती एका मुस्लिम भक्ताने दान दिली आहे, हे विशेष.

संपादन - स्वाती हुद्दार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Temple bell on sensor in Nagpur