'कोरोना इफेक्‍ट'मध्येही नागपूर बोर्डाचा धडाका; हे बोर्ड पिछाडीवर 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 जून 2020

जवळपास 99 टक्के उत्तरपत्रिका तपासून झालेल्या आहेत. शुक्रवारपर्यंत उत्तरपत्रिका तपासून त्याबाबत तयार करण्यात येणारी "काउंटर फाइल' औरंगाबादला पाठविण्यात येणार आहे. 

नागपूर : दहावी आणि बारावीच्या निकालाबाबत अनिश्‍चितता असताना नागपूर विभागीय शिक्षण मंडळाकडून आनंदाची बाब समोर आली आहे. विभागाचे निकालाचे कामकाज जवळपास 99 टक्के पूर्ण झाले असल्याची माहिती विभागाचे प्रभारी अध्यक्ष रविकांत देशपांडे यांनी दिली आहे. 

राज्यात 18 फेब्रुवारीपासून बारावीच्या तर 1 मार्चपासून दहावीच्या पेपरला सुरुवात झाली. बारावीचे पेपर सुरळीत पार पाडल्यावर राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता, 23 मार्च रोजी होणारा दहावीचा भूगोलचा पेपर रद्द करण्यात आला होता. याशिवाय राज्यभरात टाळेबंदी असल्याने शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. या प्रकाराने जवळपास दीड महिना दहावी आणि बारावीच्या उत्तरपत्रिका केंद्र आणि पोस्ट ऑफिसमध्ये पडून असल्याची माहिती समोर आली होती. 

या प्रकाराने उत्तरपत्रिका वेळेवर तपासल्या जातील काय, हा प्रश्‍न समोर आला होता. याशिवाय त्यामुळे जवळपास निकालाला उशीर होईल, असाही कयास व्यक्त करण्यात आला होता. मात्र, मंडळाकडून जिल्हास्तरावर उत्तरपत्रिकांचे संकलन करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार जिल्हास्तरावर उत्तरपत्रिका संकलनाचे काम करण्यास सुरुवात झाली. याशिवाय जिल्हानिहाय उत्तरपत्रिकांच्या तपासणीलाही सुरुवात झाली. 

विभागात दहावीसाठी 1 लाख 87 हजार 797 तर बारावीसाठी 1 लाख 68 हजार 508 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. या विद्यार्थ्यांच्या एकूण 24 लाख 54 हजार 504 उत्तरपत्रिका तपासण्यासाठी बोर्डाकडे आल्या होत्या. त्यापैकी जवळपास 99 टक्के उत्तरपत्रिका तपासून झालेल्या आहेत. शुक्रवारपर्यंत उत्तरपत्रिका तपासून त्याबाबत तयार करण्यात येणारी 'काउंटर फाइल' औरंगाबादला पाठविण्यात येणार आहे. 

हेही वाचा : बेसा पॉवर हाऊस परिसरात फिरत होता रमजान, पोलिसांना समजताच... 

मुंबई, पुणे, औरंगाबाद पिछाडीवर 
राज्यात मुंबई, पुणे विभागात सर्वाधिक विद्यार्थ्यांचा समावेश असतो. मात्र, या भागात कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक असल्याने अद्याप येथील बोर्डाची निकालासंदर्भातील पन्नास टक्केही कामे पूर्ण झालेली नसल्याचे समजते. यापाठोपाठ औरंगाबाद विभागातही जवळपास अशीच परिस्थिती असल्याचे दिसून येते. 

वर्ग - विद्यार्थिसंख्या 
दहावी - 1,87,797 
बारावी - 1,68,508 
उत्तरपत्रिका 
दहावी- 13,07,431, 
बारावी - 9,47,073 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tenth, twelth result work completed