अख्ख्या गावात पेटली नाही एकही चूल, कारण गावातला प्रत्येकच झाला होता शोकाकूल

गजेंद्र डोंगरे
Tuesday, 13 October 2020

निर्ढावलेला पाऊस अचानक मनसोक्त कोसळू लागला अचानक मनसोक्त कोसळू लागला. परतीचा पावसासोबत आभाळही अधिकच निष्ठूर होत आकांत करीत होते. विजांच्या कडकडात शिवा येथील शेतकरी श्रावण इंगळे यांच्या शेतात गावातील काही महिला कापूस वेचणी करण्यासाठी गेल्या होत्या. पण अचानक सायंकाळी कडकडणाऱ्या विजांनी घात केला.

बाजारगाव (जि.नागपूर) : रविवारी (ता.११) निर्ढावलेल्या मनाने अचानक मनसोक्त पाऊस कोसळू लागला. परतीचा पावसासोबत आभाळही अधिकच निष्ठूर होत आकांत करीत होते. विजांच्या कडकडात शिवा येथील शेतकरी श्रावण इंगळे यांच्या शेतात गावातील काही महिला कापूस वेचणी करण्यासाठी गेल्या होत्या. पण अचानक सायंकाळी कडकडणाऱ्या विजांनी घात केला. आगीचा एक मोठा लोळ कडकडाट करीत काम करीत असलेल्या पाचही महिलांच्या अंगावर कोसळला. यात अर्चना तातोडे (३५), शारदा दिलीप उइके (३६) व संगीता गजानन मुंगभाते (३५) या तिन्ही महिलांचा नागपूरला उपचारार्थ नेत असताना वाटेतच मृत्यू झाला. दोन महिलांवर नागपूर येथे उपचार सुरू आहेत. कालपासूनच गावात दु:खाचे वातावरण असल्याने एकही चूल पेटली नव्हती.

अधिक वाचाः ऐन हंगामात शेतकरी विचारतात, कुठे गेला युरिया?
 
शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार
दुर्घटना घडताच आज सकाळपासूनच गावात परिवारास भेटण्यासाठी नातलगांनी रीघ  लावली होती. मृत तिन्ही महिलांचे मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी शासकीय महाविद्यालय व रूग्णालयात पाठविण्यात आले. परंतू त्याआधी कोविड-१९ ची चाचणी करण्यात आली. त्यात अर्चना तातोडे या महिलेची चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यामुळे फक्त संगिता गजानन मुंगभाते व शारदा दिलीप उइके या दोघींचे शव गावात आणण्यात आले व सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार उरकविण्यात आले. संगिता मुंगभाते हिला पती व दोन (१३व११ वर्षे) मुले आहेत, तर शारदा उइके यांना दोन मुले व एक मुलगी (१३, १०, व ७ वर्षे) आहे. गरीब व होतकरू कुटुंबातील महिलांना नियतीने डाव साधून त्यांच्या कुटुंबापासून  हिरावल्यामुळे ग्रामपंचायत शिवा (सावंगा) यांनी तातडीची मदत म्हणून प्रत्येक कुटुबासाठी ५००१ रुपये मदत करण्यात आली. तिन्ही कुटुंबांना लवकरच शासकीय मदत देण्यात येणार असल्याची माहिती मिळाली.

अधिक वाचाः भिवापूरचे बसस्थानक होणार म्हणजे होणारच, आमदार राजू पारवे यांचा संकल्प

मातेच्या निधनाने मुलीच्या आनंदावर विरजन
कालच्या घडलेल्या दुर्दैवी घटनेत अर्चना उमेश तातोडे (३५) या महिलेचा मृत्यू झाला. परंतू शवविच्छेदन करण्याआधी करण्यात आलेल्या कोविड  १९च्या चाचणीत ती पॉझिटिव्ह  निघाली. त्यामुळे अर्चनावर नागपुरातच अंत्यसंस्कार उरकविण्यात आला. अर्चना हिला पती व १८ व१६ वर्षाच्या दोन मुली आहेत. अर्चना ही पहिल्यांदाच कामावर गेली होती. तिच्या मुलीचा पुढील महिन्यात साक्षगंधाचा कार्यक्रम ठरलेला  होता. परंतू आईच्या  अचानक निधनाने मुलीच्या आनंदावर दु:खाचा डोंगर कोसळला. अर्चनावर अंत्यसंस्कार करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य व पती व दोन्ही मुली नागपूरला गेल्या होत्या. परंतू कोविड-१९ मुळे लांबूनच दर्शन घ्यावे लागले. तेव्हा दोन्ही मुली धाय मोकलून रडत होत्या.

संपादनःविजयकुमार राऊत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: There was not a single fire in the whole village, because everyone in the village was in mourning