crime
crime

उत्तर प्रदेश ते नागपूर कनेक्‍शन होते चोरांचे! असा झाला पर्दाफाश

नागपूर : नागपुरात ज्वेलर्सचे दुकान फोडून आणि दोन ठिकाणी घरफोडी करून उत्तर प्रदेशात पळून गेलेल्या तीन चोरट्यांना दोन पिस्तुलांसह अटक करण्यात आली. ही धडाकेबाज कामगिरी गुन्हे शाखा युनिट-4च्या पथकाने केली.
जगदीशकुमार नारदप्रसाद पांडे (21) मलवा, वशिष्टप्रसाद ऊर्फ कुलदीप अशोकमणी त्रिपाठी ऊर्फ तिवारी (30) गोविंदपूर आणि प्रदीपकुमार ऊर्फ रोहित नारदप्रसाद पांडे (18) मलवा (उत्तर प्रदेश), अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. मुख्य आरोपी अभिजित सोमनाथ पांडे (रा. खरबी, वाठोडा) हा एका गुन्ह्यात उन्नाव कारागृहात असल्याने त्याला अटक करता आली नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शारदानगर, चक्रपाणीनगर येथील दिलीप केशवराव बांगरे (57) यांच्या राहत्या घरीच श्रीगुरुमाउली नावाचे ज्वेलर्सचे दुकान आहे. 16 आणि 17 जानेवारीच्या मध्यरात्री चोरटे हे चेहऱ्याला कापड बांधून कारमधून दुकानात आले. चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची दिशा बदलविली. दुकानाच्या शटरच्या हुकमधून लोखंडी रॉड टाकून शटरची पट्टी तोडली. शटर एका बाजूने उचलून एक जण दुकानात शिरला. दुकानातील सोनेचांदीचे दागिने, गणेश आणि लक्ष्मीची मूर्ती, चांदीचे ताट, वाट्या, ग्लास आणि रोख 50 हजार रुपये असा 4 लाख 43 हजार 302 रुपयांचा ऐवज चोरून चोरटे पळून गेले. हुडकेश्‍वर पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल होता. शहर गुन्हे शाखा युनिट-4 चे पथकदेखील याच गुन्ह्याचा समांतर तपास करीत होते. गुन्हे शाखेने मोठ्या शिताफीने आरोपींना अटक केली. ही कामगिरी पोलिस निरीक्षक अशोक मेश्राम, एपीआय दिलीप चंदन, किरण चौगले, उपनिरीक्षक पुरुषोत्तम मोहेकर, हवालदार अजय रोडे, सुधाकर धंदर, अजय बघेले, बबन राऊत, प्रशांत कोडापे, नितीन आकोटे, सूरज भोंगाडे, सुहास शिंगणे, आशीष पाटील, दीपक झाडे यांनी केली.

सीसीटीव्ही फुटेजमधून मिळाला धागा
युनिट-4 च्या पथकाचे पीआय अशोक मेश्राम हे तपास करीत असताना त्यांना घटनास्थळापासून काही अंतरावर असलेल्या एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात एक इंडिका कार दिसून येत होती. कारचा क्रमांकदेखील स्पष्टपणे दिसत होता. त्यावरून पोलिस पथक कारच्या मूळ मालकापर्यंत पोहोचले. त्या वेळी कारमालकाने काही दिवसांपूर्वी ही कार उत्तर प्रदेशातील जगदीश पांडे यास विकल्याचे सांगितले. एवढी माहिती मिळताच पोलिस पथक उत्तर प्रदेशला रवाना झाले. पोलिसांनी सातत्याने सहा दिवस परिश्रम घेऊन सर्वप्रथम जगदीश यास ताब्यात घेतले. त्यानंतर अन्य आरोपींना ताब्यात घेतले.

उत्तर प्रदेश ते नागपूर कनेक्‍शन
ज्वेलर्सचे दुकान फोडण्यात खरबी येथील अभिजित पांडे हादेखील सहभागी होता, असे आरोपींनी सांगितले. 5 ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र, 3 किलो 318 ग्रॅम वजनाच्या चांदीच्या वस्तू, 5 मोबाईल, गुन्ह्यात वापरलेली इंडिका कार, दोन पिस्तुले, 5 जिवंत काडतुसे असा 6 लाख 93 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या आरोपींनी नागपुरात वाठोडा, नंदनवन आणि हुडकेश्वर येथे तीन ठिकाणी घरफोडी आणि दोन ठिकाणांहून मोबाईल चोरल्याची कबुली दिली. आरोपींची 18 मार्चपर्यंत पोलिस कोठडी घेतली असून, त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्‍यता आहे.

25 हजारांचे बक्षीस
परप्रांतात जाऊन उल्लेखनीय कामगिरी करीत चोरट्यांना अटक केल्याप्रकरणी अपर पोलिस आयुक्त नीलेश भरणे आणि पोलिस उपायुक्त गजानन राजमाने यांनी युनिट-4 पथकाचे अभिनंदन केले. त्याचप्रमाणे डीसीपी राजमाने यांनी या पथकाला 25 हजारांचे बक्षीस जाहीर केले. डीसीपी निर्मला देवी यांचेही पथक या तपासात काम करीत होते; परंतु त्यांना यश आले नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com